
नागपूर ः आज ऊर्जा निर्माण (Energy Generation) करताना त्यातून निर्माण होणारी प्रदूषणाची समस्या (Pollution) त्यापेक्षा भीषण आहे. त्या पार्श्वभूमीवर मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या स्वाती मैनी (Swati Maini) यांनी अनोखे हायड्रो कायनेटिक टर्बाइन तयार केले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याशिवाय कालव्याच्या पाण्यावरही ऊर्जा निर्मिती (Electricity Generation) करता येणार आहे.
देशातील ऊर्जानिर्मिती यासाठी कोळसा हे सर्वात मोठे स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. याशिवाय धरणाच्या पाण्यावरील ऊर्जा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. मात्र, त्यातून मिळणारी ऊर्जा ही पुरेशी नसल्याने राज्यासह देशात विजसंकट निर्माण होताना दिसून येते. ही समस्या लक्षात घेत स्वाती मैनी यांनी वाहत्या पाण्यावरूनही ऊर्जा निर्मिती करता यावी, यासाठी हायड्रो कायनेटिक टर्बाइन तयार केले.
या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती करता येणे शक्य होणार आहे. यासाठी स्वाती यांनी एक ते पाच किलोवॅटचे हायड्रो कायनेटिक टर्बाइन तयार केले आहेत. त्यातून कमीत कमी दररोज २४ ते १२० किलोवॉट ऊर्जानिर्मिती करता येणे शक्य होते. विशेष म्हणजे या उपकरणासाठी लागणारे ब्लेड, वायडिंग, बेअरिंग, जनरेटर, इलेक्ट्रिकल सिस्टीम हे सर्व देशातच तयार करण्यात आले असल्याने ते संपूर्णतः स्वदेशी उपकरण आहे.
त्यासाठी त्यांनी पेटंटही फाइल केले आहे हे विशेष. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर असलेल्या कालव्यात हे उपकरण बसवून विजेची निर्मिती करता येणेही शक्य होणार आहे. याशिवाय हायड्रो प्रकल्प असल्याने कुठल्याही प्रदूषणाची भीती नसून मोठे अपारंपरिक स्रोत म्हणूनही त्याचा वापर करण्यात येणार आहे.
पायलट प्रोजेक्ट सुरू
स्वाती मैनी यांच्या हायड्रो कायनेटिक टर्बाइन या प्रकल्पाचा पायलट प्रोजेक्ट सध्या पुण्यातील भैरोबा नाला येथे सुरू करण्यात आला आहे. यासाठी वॉटर रिसोर्स विभागाची परवानगीही त्यांना मिळाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.