भात पिकासाठी विना नांगरणी शेती

विना नांगरणी अगर संवर्धित शेती कोणत्याही पिकात यशस्वीपणे करणे शक्‍य आहे. या पद्धतीत पीकवार करण्याच्या पद्धतीत थोडा-थोडा फरक करावा लागतो. हे एक कौशल्याचे काम आहे. पावसाळा जवळ आला असल्यामुळे पीकवार संवर्धित शेतीचा अभ्यास करूयात.
Paddy
PaddyAgrowon

भात लागवडीच्या (Paddy Cultivation) पारंपरिक पद्धतीत घाटमाथ्यावरील अगर कोकण पट्टी, पूर्व विदर्भातील भागात राब, रोप, चिखलणी आणि लावणी (Transplanting) या पद्धतीने भात शेती केली जाते. आजही अनेक भागात ही पद्धत रूढ आहे. ही पद्धत विकसित होण्यामागे पूर्वजांनी भरपूर अभ्यास केला असला पाहिजे. आपल्याला ही पद्धत बंद करून पेरभात शेतीकडे जावयाचे आहे. यासाठी प्रथम पारंपरिक पद्धतीचा तळापर्यंत जाऊन अभ्यास करणे गरजेचे आहे.

१) राब करणे ः

- राबासाठी संपूर्ण उन्हाळाभर शेणाचे गोळे करणे, झाडाच्या फांद्या तोडून वाळवून ठेवणे आणि मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपे तयार करण्याची जागा हे जळण पेटवून भाजून काढली जाते. कृषी विद्यापीठाची शिफारस सांगते राब करणे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. गादी वाफ्यावर रोप तयार केले पाहिजे.

- १९७०मध्ये विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वीही राब न करण्याची शिफारस केली जात होती. असे असता शेतकरी राब जाळण्याची पद्धत का सोडत नाही. राब करण्याशी शेतकरी का ठाम आहे? यावर तळापर्यंत जाऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. कोकणात तणे मोठ्या प्रमाणावर उगवतात. राब जाळल्याने हे तणांचे बी जळून जाते. राब न जाळल्यास भात व तणे एकदमच उगवतील आणि तणांच्या गर्दीत भात शोधावे लागेल. हे काम केवळ अशक्‍य कोटीतील आहे. याव्यतिरिक्त राब केल्याने जमीन भाजली जाते. त्यातील सेंद्रिय पदार्थ जळून जातात. अशा जमिनीतील पाणी लवकर निचरून जाते.

- भात पिकाची सुरवातीच्या एक महिन्याची गरज इतर पिकांप्रमाणे वापश्‍याच्या जमिनीची आहे. भाजलेल्या जमिनीतून अतिरिक्त पाण्याचा निचरा जलद होतो. याचा रोपाच्या वाढीसाठी फायदा होतो. रोपे उपटून काढणे भाजवळ केल्यामुळे कमी श्रमात होते. पुढे या रोपाच्या पेंढ्या बांधून लावणी करण्यासाठी नेल्या जातात.

- प्रत्यक्ष लावणी करण्यापूर्वी या पेंढ्याची मुळे वाहत्या पाण्यात धुतली जातात. रोपांबरोबर आलेली माती भाजवळ केल्यास जलद रिकामी सुटी होऊन वाहत्या पाण्याबरोबर वाहून जाते. रोपांची मुळे रिकामी होतात. रोपांच्या गड्ड्यातून तीन-चार काड्या बाजूला करणे सहज शक्‍य होते. यामुळे रोप लावणीचे काम जलद आटोपते. प्रत्यक्ष स्वतः काम केल्याशिवाय वरील बारकावे लक्षात येत नाहीत.

- राब करणे हे भरपूर कष्टदायक, वेळ, पैसा खाणारे असले, पर्यावरणाची हानी करणारे असले तरी शेतकरी सोडण्यास तयार नाहीत.

चिखलणी ः

- पाऊस पडून जमीन ओली झाल्यानंतर जमिनीची पहिली नांगरणी केली जाते. त्यानंतर रोपे लावणीच्या अगोदर चिखलणी केली जाते. वाफ्यात ८-१० सें.मी. पाणी उभे करून उभे-आडवे नांगराने संपूर्ण उगवलेले तण चिखलात दाबले जाते. चिखलावर ५-७ सें.मी. पाणी ठेवले जाते. चिखलात रोपे लावल्यानंतर परत तणांचा त्रास फारसा होत नाही. त्या काळात तणनाशके नव्हती. अशा पद्धतीने तण नियंत्रण केल्याने भातशेती करणे शक्‍य झाले.

- चिखलामध्ये उभे राहून ३-४ रोपांचा चूड सहज लावता येतो. यामुळे लावणीचे काम उरकते. चिखलणीपूर्वी बैलाकडून व आता पॉवर टिलरकडून केली जाते. चिखलणी करीत असता मोठ्या प्रमाणात रानाबाहेर पाणी वाहते ठेवले जाते. या पाण्यातून अंदाजे ३० टक्के रानातील सुपीक माती वाहून जाते. यातून होणारी जमिनीच्या सुपिकतेची हानी कळत असूनही तिकडे डोळेझाक केली जाते.

- राब व चिखलणी ही कामे काही कोणाच्या सुपीक डोक्‍यातून एकदम तयार झाली नाहीत. कित्येक पूर्वजांच्या सर्जनशीलतेतून या तंत्राचा विकास झालेला असावा. चिखलणी व लावणी ही प्रचंड

कष्टदायक कामे आहेत. भरपूर कष्ट करून एखादे चांगले पीक पाहावयास मिळावे या आशेने हे कष्ट आनंदाने शेतकरी करीत असतो.

एसआरटी पद्धतीने भात लागवड ः

माझी खूप वर्षांपासून अशी इच्छा होती, की ही राब, रोप, चिखलणी, लावणी ही कामे बंद होऊन देशावरील पद्धतीप्रमाणे कोकणात पेरभात शेती करणारे तंत्र विकसित झाले पाहिजे. पुढे मालेगाव नेरळ( ता. कर्जत, जि. रायगड) येथील चंद्रशेखर भडसावळे यांनी कोकणात पेर भात शेती करणारे सगुणा भात तंत्रज्ञान विकसित केले. हे तंत्र शेतकऱ्यांमध्ये रुजू लागले आहे.

- या पद्धतीत फक्त एकदाच सुरवातीला नांगरणी करून तळात १५० सेंमी आणि डोक्‍यावर १२० सेंमी चे गादी वाफे तयार करून घ्यावयाचे. त्यावर खास तयार केलेल्या साच्याने भोके पाडून त्यात बी पेरावयाचे. (टोकण किंवा डोबणी) गादी वाफ्यावर बी टोकण करण्याचे कारण पाऊस जास्त पडल्यास दोन वाफ्यांमधील नाल्यातून जादा पाणी खाचराबाहेर निघून जाते व सुरवातीचे २५ ते ३० दिवस भाताचे जादा पाण्यापासून संरक्षण होते. त्यानंतर पाणी बाहेर पडणारे तोंड थोडे बंद केले म्हणजे खाचराप्रमाणे पाणी उभे ठेवणे शक्‍य होते.

- याच गादी वाफ्यावर भातानंतर हिवाळी व उन्हाळी पीक घेऊन परत पुढील पावसाळ्यात मागील चुडाच्या मध्ये नवीन भोके पाडून टोकण करीत राहावे. फक्त मोडलेल्या नाल्या दुरुस्त करून त्याच गादी वाफ्यावर वर्षानुवर्षे कोणतीही मशागत न करता पुढील पिके घेता येतात.

- पूर्वीची राब, चिखलणी आणि लावणी ही तण नियंत्रण करणे हा मध्य धरून विकसित झालेली भात लागवड पद्धत होती. आता विना नांगरणीमध्ये तण नाशकाकडून तणांचे नियंत्रण करणे शक्‍य झाल्याने संवर्धित शेती करणे शक्‍य आहे. दोन पिकांमधील काळात वाढलेले तण ग्लायफोसेट तण नाशकाने तसेच भात व तणे उगविल्यानंतर भातासाठी उपलब्ध असणारी बी व तण उगविण्यापूर्वीची आणि बी व तणे उगविल्यानंतर वापरण्याची तणनाशके उपलब्ध असल्यानेच विनानांगरणी पद्धत शक्‍य आहे. या तणनाशकांचे विषारी अवशेष पिकाचे जमिनीखालील अवशेष कुजत असता निर्माण होणाऱ्या रसायनामुळे नष्ट होतात. शेती उत्पादनात असे अवशेष राहत नाहीत.

- मशागत नाही, सेंद्रिय खताचा वापर नाही, निंदणी नाही यामुळे कमी उत्पादनखर्चात चांगले उत्पादन मिळते व जमिनीची सुपीकता दरसाल कमी न होता वाढत जाते, तीही शून्य खर्चात. हा या पद्धतीचा सर्वांत मोठा फायदा आहे.

उसानंतर भात ः

सह्याद्रीचा कोणताही घाट चढून वर आले, की घाटाकडील तालुक्‍यात आता बागायतीची सोय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. मात्र अजूनही या भागात उसानंतरचे दुसरे मुख्य पीक भातच आहे. २ ते ३ वर्षे उसाचे पीक घेतल्यानंतर भात हेच दुसरे प्रमुख पीक घेतले जाते. ऊस तुटल्यानंतर मशागत करून राब, रोप, चिखलणी आणि लावणी पद्धतीनेच भात शेती केली जाते. घाटापासून थोडे पूर्वेकडे आल्यानंतर तेथे उसानंतर मशागत करून पेरभात शेती केली जाते.

- उसानंतर फेरपालटावर भात शेती करीत असता मशागत करून सगुणा भात तंत्राप्रमाणे वाफे पाडून भात टोकणेची गरज नाही. उसाची तोड झाल्यावर पाचट पेटवावे,त्यानंतर पावसाळ्यापर्यंत रानाला विश्रांती द्यावी. या काळात शक्‍य असल्यास खोडव्यात मेंढरे चरण्यास परवानगी द्यावी. पेरणीपूर्वी १ ते १.५ महिना मेंढरे चारणे बंद करून उसाला चार पाने फुटू द्यावीत. भात पेरणीपूर्वी जमीन ओलावा पाहून ग्लायफोसेट तणनाशकाने उसाचे खोडवे मारावे.

- उसाच्या सरी वरंब्यावर दोन बाजूचे वरंब्याचे उतारावर मिळून चार ओळीत भात टोकण करावी. उगवणपूर्व व पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी तण २ ते ४ पानावर असता शिफारशीत तणनाशक फवारून तण नियंत्रण करणे शक्‍य आहे.

- कोकण अगर घाटमाथ्यावरील लावणीच्या भातापेक्षा पूर्वेकडील पेरभात शेतीचे प्रश्‍न वेगळे आहेत. लावणीच्या क्षेत्रात पोयटा मातीचे प्रमाण कमी तर लहान-मोठी वाळू जास्त असल्याने अशी राने जलद बसतात व कठीण होतात. थोडे पूर्वेला आले, की लाल माती जाऊन काळी माती चालू होते. या मातीत लहान-मोठी वाळू अत्यंत कमी, तर पोयटा व चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. अशी माती मशागत करून भात पेरले तर कोरड्या मातीत कितीही जड मेलपट (दिंड) फिरविले तरी आवळली जात नाही. पोकळच राहते. भाताची कठीण जमीन असणे ही एक महत्त्वाची गरज आहे. भात पोकळ जमिनीत उगविले तर वाढत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com