बुरशी घेऊ शकेल प्लॅस्टिकची जागा

प्लॅस्टिकला पर्याय म्हणून विघटनशील आणि नैसर्गिक पर्यायांचा शोध जगभर घेतला जात आहे. यामध्ये बुरशींचे तंतू अत्यंत मोलाची भूमिका निभावू शकतात. भविष्यात बुरशीपासून बनविलेल्या प्लॅस्टिक, चामडी (लेदर), स्टायरोफोम, मांस आधारित विविध उत्पादने बाजारात येणार आहेत. या नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक अशा उत्पादनांची माहिती घेऊ.
बुरशी घेऊ शकेल प्लॅस्टिकची जागा
FungusAgrowon

समीर बा. झाडे, डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर

बुरशी घेऊ शकेल प्लॅस्टिकची जागासध्या पर्यावरणासाठी प्लॅस्टिक ही एक मोठी समस्या झालेली आहे. अनेक बंधने, बंदी असूनही सुविधाजनक, टिकाऊपणाच्या क्षमतेमुळे प्लॅस्टिकचा वापर वेगाने वाढत आहे. जमिनीवरील कचरा डेपोंमध्ये सर्वत्र प्लॅस्टिक पसरलेले दिसते. तसेच अनेक देशांनी प्लॅस्टिकची विल्हेवाट ही समुद्रामध्ये लावलेली असल्याने सागरी जिवांसाठीही धोका निर्माण झाला आहे. हे सूक्ष्म प्लॅस्टिक अन्नसाखळीमध्ये येत असून, त्याचा अंतिम परिणाम मानवांसह सर्व सजीवांना भोगावा लागणार आहे.

२०१४ मध्ये जागतिक पातळीवर सुमारे ३१ कोटी टन प्लॅस्टिक उत्पादन झाले होते. हेच उत्पादन २०५० पर्यंत ११२४ दशलक्ष टनापर्यंत पोचण्याचा अंदाज वर्तवला जातो. शास्त्रज्ञांच्या एका अनुमानानुसार, २०५० मध्ये समुद्रामध्ये माशांच्या वजनापेक्षा प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण जास्त असू शकेल. २०१८ मध्ये एकूण प्लॅस्टिक वापरापैकी ४० टक्के फक्त पॅकेजिंगसाठी वापरले गेले. त्यातील केवळ १३.६ टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर झाला. म्हणजे उर्वरित ७९ टक्के प्लॅस्टिक कचऱ्याच्या स्वरूपात राहिला. प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात आणि या विघटनादरम्यान अनेक घातक रसायने जमिनीत व हवेत मिसळली जातात. म्हणजेच दोन्ही प्रकारे पर्यावरणाला धोका निर्माण होतो.

प्लॅस्टिकला पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यासाठी जागतिक आर्थिक मंचाने पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक परिसंस्था आणि चक्रीय अर्थव्यवस्था यांच्या निर्मितीसाठी अनेक नवकल्पनांवर काम सुरू आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बुरशी, समुद्री शेवाळ, सागरी वनस्पती, तणे आणि लाकडाचा वापर यावर काम केले जात आहे.

१) इबेन बायर यांनी स्थापन केलेल्या इकोवेटीव डिझाइन कंपनीने जैविक प्लॅस्टिक निर्मितीसाठी मायसेलियम तंत्रज्ञान २००७ मध्ये विकसित केले. त्यासाठी ३१ देशात ४० पेक्षा जास्त पेटंट मिळवले आहेत. या कंपनीने बुरशीचे तंतू (मशरूम मायसेलियम) घेऊन १०० टक्के विघटन होणारे प्लॅस्टिक, चामडी (लेदर), स्टायरोफोम, मांस अशी काही उत्पादने बनवली. या तंत्रज्ञानात बुरशीच्या काही विशिष्ट प्रजातीचा अळिंबी (प्लुरोटस), गॅनोडेर्मा, झायलेरिया, मॉरशेला, हायफोलोमा इ.चा वापर केला गेला.

२) नॉटप्ला (NOTPLA) या लंडनस्थित कंपनीने समुद्रातील वनस्पती, सागरी शेवाळ यापासून खाण्यायोग्य अशा प्लॅस्टिकची निर्मिती केली. हे प्लॅस्टिक सजीवासाठी आणि पर्यावरणासाठी पूरक आहेत. आरोग्याला काही धोका नाही. हे प्लॅस्टिक खाद्यपदार्थ साठवणूक आणि वितरणासाठी उपयोगी आहे.

मायसेलियम पासून तयार केलेले साहित्य

१) बांधकाम साहित्य :

बुरशीचे मायसेलियम आणि शेतातील काडीकचरा यांच्या मिश्रणातून इमारतीला लागणाऱ्या विटा, फर्निचर, प्लायवूड यांची निर्मिती केली जाते. इकोवेटिव्ह कंपनीने २०१४ मध्ये न्यूयॉर्कच्या संग्रहालयातील प्रदर्शनामध्ये मशरूम मायसेलियमपासून तयार केलेल्या विटांचा एक कंपोस्टेबल टॉवर उभारला होता. त्याला पुरस्कारही मिळाला होता.

२) टिकाऊ कपडे :

कपडे उद्योगामध्ये मायसेलियमपासून बनवलेल्या कपड्यांचा वापर वाढू लागला आहे. मायसेलियम कपडे, लेदर हे उत्तम नैसर्गिक पर्याय ठरू शकतात. त्यामुळे कपडे व फॅशन उद्योगातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल. कापड उद्योग हाही प्रदूषणकारी उद्योग बनत चालला आहे. विविध प्रचलित कंपन्या या तंत्रज्ञानावरील लेदर, कपडे, पादत्राणे यांची निर्मिती करत आहेत.

२) पॅकेजिंग साहित्य :

मायसेलियम तंत्रज्ञानाने १०० टक्के विघटन होणारे पॅकेजिंग साहित्यनिर्मिती शक्य आहे. त्यामुळे सध्या यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि पॉलिइस्टिरीनवरील अवलंबित्व कमी होईल.

३) प्राणीमुक्त मांस :

मशरूम मायसेलियमपासून वनस्पती आधारित मांसांची निर्मिती करता येते. सध्या मांसासाठी पशुपक्षीपालन केले जाते. त्यासाठी जमीन, पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र मायसेलियम मांसासाठी पारंपरिक मांसाच्या तुलनेमध्ये पाणी ९९ टक्क्यांपर्यंत कमी लागते. तर कर्ब उत्सर्जनही केवळ एक टक्के होते.

४) वैद्यकीय, आरोग्य सेवेची उत्पादने :

मास्क, स्पंज, फोम व एकदाच वापरण्ययोग्य चप्पल अशा अनेक वस्तू तयार करता येतात.

५) मायसेलियम फोम :

पॉलिइस्टिरीन फोमला पर्याय म्हणून वापरले जाणारे मायसेलियम फोम हे वजनाने हलके, मजबूत आहे. वेगवेगळ्या साच्यात टाकून त्यापासून विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. उदा. पॅकेजिंग मटेरिअल, शोभिवंत वस्तू इ.

इतर उपयोग : ३ D प्रिटिंग, प्रकाश दिव्यावरील आवरण, बेंचेस, इलेक्ट्रिक बोर्ड, बॅग, कार मधील फोम, शवपेटी

उत्पादन प्रक्रिया :

शेतातील पिकांचे शिल्लक अवशेष, काडीकचरा गोळा करावा. उदा. कुटार, लाकडी भुसा, मक्याचे धसकटे, ताग अंबाडीचे तंतू इ. त्याचे लहान तुकडे केल्यानंतर निर्जंतुकीकरण केले जाते. त्यात अळिंबी किंवा बुरशीचे बीजाणू टाकले जातात. हे मिश्रण एका विशिष्ट आकाराच्या साच्यामध्ये भरले जाते. बुरशीचे बीजाणू या टाकाऊ कचऱ्यातील सेंद्रिय घटकांवर वाढून, मायसेलियमचे तंतूचे जाळे तयार करते. या मिश्रणाला एक कठीण, टणक आकार देते. ही प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी हे मिश्रण एका नियंत्रित कक्षामध्ये ठेवले जाते. तिथे त्याला नियंत्रित तापमान, आर्द्रता, ओलावा, अंधार पुरवला जातो. काही आठवड्यातच फोम तयार होतो. नंतर हा फोम साच्यामधून बाहेर काढला जातो. त्याला एका विशिष्ट तापमानामध्ये ठेवून सुकवले जाते.

मायसेलियम फोमचे गुणधर्म आणि फायदे :

-जैविक विघटन लवकर होते.

-मजबूत, हलके आणि कोणत्याही आकारात सहज रूपांतरित करता येते.

-हे हायड्रोफोबिक आणि आग प्रतिरोधक आहे.

-हे लवचिक, उष्णतारोधक, आणि हवेची देवाणघेवाण करण्यायोग्य आहे.

-हे टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणात उत्पादित करता येणारे असून, भविष्यात अत्यंत स्वस्त पडू शकते.

समीर बा. झाडे (आचार्य पदवी विद्यार्थी), ८८५५८२३५४६ (वनस्पतीरोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.