
आंध्र प्रदेश सरकारने खरीप हंगामापूर्वी वायएसआर यंत्र सेवा (YSR Yantra Seva) योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानापोटी ट्रॅक्टर आणि बहुपयोगी हार्वेस्टरचे वाटप सुरु केले आहे. ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर खरेदीसाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे.
मंगळवारी (तारीख ७ जून) मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आर. रामचंद्र रेड्डी, अंबाती रामबाबू, विदादाला रजनी, की. नागेश्वर राव आदी मंत्री यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री रेड्डी यांनी ५२६० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत अनुदानापोटी १७५ कोटी रुपयांची रक्कम जमा करून या योजनेचा शुभारंभ केला. त्यानुसार ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १२०० ट्रॅक्टर आणि २० हार्वेस्टर वितरीत करण्यात आले.
वायएसआर यंत्र सेवा (YSR Yantra Seva) योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) कृषी उपकरण खरेदीसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम उभी करण्यासाठी बँका त्यांना अल्प व्याजदरात कर्ज देणार आहेत. या कंपन्यांना १० टक्के रक्कम भरली की कृषी उपकरणे खरेदी करता येणार आहेत.
वायएसआर यंत्र सेवा योजने (YSR Yantra Seva) अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांवर अनुदानित कृषी उपकरणे खरेदीसाठी जी बंधने होती, ती काढून टाकण्यात आली आहेत. शेतकरी स्वतःच्या मर्जीनुसार उपकरणे निवडतील आणि सरकार केवळ अनुदान देण्याचे काम करेल, असे मुख्यमंत्री रेड्डी यांनी सांगितले.
आतापर्यंत रयतू भरोसा केंद्रांना (RBK) ३८०० ट्रॅक्टर्स पुरवण्यात आले आहेत. येत्या काळात सर्वच रायतू भरोसा केंद्रांकडे ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर्स असतील. राज्यातील सर्व रयतू भरोसा केंद्रांत एकूण १०७५० वायएसआर यंत्र सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी २०१६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याखेरीज भातपिकाची लागवड करणाऱ्या परिसरात क्लस्टरनिहाय १६१५ यंत्र सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हव्या त्या हार्वेस्टरचा पुरवठा केला जाणार असल्याचेही रेड्डी यांनी नमूद केलं आहे.
देशभरात शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातही आंध्र प्रदेशातील रयतू भरोसा केंद्र या संकल्पनेची सर्वत्र विशेष चर्चा होते आहे. शेतकऱ्यांच्या सर्व गरजा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे केंद्र म्हणून या रयतू भरोसा केंद्रांची (RBK) लोकप्रियता वाढते आहे.
शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, रसायने, बियाणे, पिककर्जापासून ते ट्रॅक्टर, हार्वेस्टरपर्यंत आणि शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी कारण्यापर्यंतच्या सगळ्या सेवा या रयतू भरोसा केंद्रांत उपलब्ध करून दिल्या जातात. शेती आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या गोष्टींची एकाच ठिकाणी पूर्तता करण्याच्या हेतूने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी राज्यात ही संकल्पना राबवली. आजमितीस आंध्र प्रदेशात १०,७७८ रयतु भरोसा केंद्रे (RBK) शेती आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या गरजांची पूर्तता करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.