Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी जीपीएस, जीआयएस तंत्रज्ञान

उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करणे गरजेचे आहे. जीपीएस आणि जीआयएस प्रणालीचा वापर करून साखर कारखाना स्तरावर जमीन सुपीकता नकाशे उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांच्या शिफारशी देणे शक्य आहे.
Soil Fertility
Soil FertilityAgrowon

डॉ. प्रीती देशमुख, डॉ.अमृता राऊत

Agriculture Technology जमिनीचे प्रकार आणि तिचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म लक्षात घेऊन जमीन सुपीकता व्यवस्थापनात (Soil Fertility Managemnet) सुधारणा करून शाश्‍वत आणि अधिक ऊस उत्पादन घेता येते.

साखर कारखाना स्तरावर ऊस विकास योजने (Sugarcane Development Scheme) अंतर्गत सेंद्रिय, रासायनिक आणि जीवाणू खतांचा (Organic Fertilizer) पुरवठा केला जातो, परंतु या निविष्ठांचा पुरवठा विभागवार जमिनीची सुपिकतेची पातळी लक्षात घेऊन केल्यास ऊस उत्पादकता वाढून खर्चामध्ये बचत होण्यास मदत होईल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये कारखाना स्तरावर ऊस पिकाखालील जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्धतेची माहिती तुटपुंजी आहे.

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जीपीएस, जीआयएसचा वापर ः

१) जमीन सुपीकता अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी जीपीएस आणि जीआयएस सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विभागवार जमीन सुपीकता नकाशे बनविल्यास जमीन सुपिकतेची पातळी लक्षात घेऊन उपाययोजना करता येतील.

२) जीआयएस आणि जीपीएसचा वापर करून बनविलेले जमीन सुपीकता नकाशे अन्नद्रव्यांची कमतरता व पिकाला लागणारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी एक कार्यक्षम भूस्थानिक साधन आणि तंत्र आहे.

Soil Fertility
Soil Testing : नव्या फळबाग लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण गरजेचे

३) राज्यातील सुमारे पन्नास साखर कारखान्यांवर माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. प्रत्येक मातीपरीक्षण प्रयोगशाळेत साधारणपणे दोन हजार ते अडीच हजार नमुन्यांचे मातीपरीक्षण केले जाते. परंतु अजूनही बरेच शेतकरी मातीपरीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर करताना दिसत नाही.

साधारणपणे चार एकर क्षेत्रातील समान माती असेल तर एक नमुना घेण्याची शिफारस आहे. परंतु जमीन सुपीकतेची सखोल तपासणी करायची असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात मातीचे नमुने घ्यावे लागतील.

४) कारखान्याचे कार्यक्षेत्र फार मोठे असल्यामुळे जास्तीत जास्त मातीचे नमुने काढणे आणि तपासणी करणे त्रासदायक आणि खर्चिक बाब आहे.

यासाठी जीआयएस आणि जीपीएसचा वापर करून माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असलेल्या माती परीक्षण अहवालांचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कारखाना कार्यक्षेत्रातील जमीन सुपीकता नकाशे बनविता येतील.

Soil Fertility
Soil And Water Conservation : जल मृद संधारणासाठी कोणते उपाय राबवाल?

५) जमीन सुपीकता नकाशांद्वारे ऊस पिकाखालील प्रत्येक ठिकाणाची सखोल सुपीकता कळते. अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते.

६) सद्यपरिस्थितीमध्ये क्षारयुक्त जमिनी, चुनखडीच्या जमिनी, सेंद्रिय कर्ब कमी असणाऱ्या जमिनीमध्ये समान व्यवस्थापन केले जाते. परंतु जमीन सुपीकता नकाशांचा वापर करून कारखानास्तरावर जमिनीच्या प्रकारानुसार नियोजन करू शकतो.

या नकाशांचा वापर करून कार्यक्षेत्रातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कळून सेंद्रिय खतांचे नियोजन करता येते. क्षारयुक्त जमिनीखालील क्षेत्राची माहिती कळते, प्रत्येक गावामध्ये माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करणे शक्य आहे.

७) सध्याच्या परिस्थितीमध्ये उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार होणे गरजेचे आहे.

जीपीएस आणि जीआयएस प्रणालीचा वापर करून कारखाना स्तरावर जमीन सुपीकता नकाशे उपलब्ध असल्यास मोठ्या प्रमाणात माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर होऊ शकतो.

८) एकदा कार्यक्षेत्रातील जमीन सुपीकता नकाशे बनवले तर कार्यक्षेत्रातील जमिनीची सुपीकता कळते. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येते.

साधारणपणे तीन ते चार वर्षांनी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील जमीन सुपीकता नकाशे बनवले तर, आपल्याला जमीन सुपीकतेमध्ये सुधारणा करता येते.

Soil Fertility
Soil Fertility : गाळमाती वापरताना कोणती काळजी घ्यावी?

असे आहे तंत्रज्ञान ः

१) जीआयएस हे सॉफ्टवेअर आहे. यामुळे स्पॅशियल आणि नॉनस्पॅशियल माहिती साठवू शकतो.

२) जीआयएसमध्ये आपण जमीन सुपीकतेची संपूर्ण माहिती संबंधित परिसरानुसार साठवून ठेऊ शकतो. यामध्ये निरनिराळे नकाशे एकमेकांसमवेत ठेवल्यास व्यवस्थापनाच्यादृष्टीने सखोल माहिती मिळू शकते.

३) जीपीएस आणि जीआयएस या तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जीआएस प्रयोगशाळेची स्थापना करण्यात करण्यात आली आहे.

संस्थेतील लोणारवाडी, मांजरी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट प्रक्षेत्रातील जमीन सुपीकता नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रक्षेत्रांवरील ऊस पिकाला माती परीक्षणावर आधारित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केले जाते.

जीपीएस, जीआयएस तंत्रज्ञान वापराचे उदाहरण ः

समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ऊस पिकाखालील जमीन सुपीकता नकाशे जीपीएस आणि जीआयएस या आधुनिक तंत्रज्ञानाचा करून बनविण्यात आले.

यासाठी कारखान्यांच्याकडून अंबड तालुक्यातील तीन हजार आणि घनसावंगी तालुक्यातील चार हजार माती परीक्षणाचे अहवाल जमविण्यात आले. माती परिक्षण अहवालामध्ये जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची माहिती समाविष्ट होती.

१) अंबड, घनसावंगी तालुक्यातील जमीन सुपीकता नकाशे बनविण्यासाठी जीआयएसमधील क्रिगिंग इंटरपोलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

२) जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचे नकाशे बनविण्यात आले. प्रत्येक अन्नद्रव्यांच्या नकाशावरून रासायनिक खतांचे नियोजन तसेच सेंद्रिय कर्बाच्या नकाशावरून सेंद्रिय खतांच्या वापरासंबंधीच्या नियोजनाचा संपूर्ण अहवाल बनविण्यात आला.

कारखाना स्तरावर ऊस पिकाखालील अन्नद्रव्यांची उपलब्धता लक्षात घेऊन प्रत्येक गावानुसार रासायनिक खतांच्या शिफारसी देण्यात आल्या.

संपर्क ः ०२०- २६९०२२७८ (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी,जि.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com