
अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा (Combine Harvester) वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे. सध्या करडई पीक काढणीच्या अवस्थेत आहे. जातीनुसार करडई पीक १२० ते १४० दिवसात काढणीस तयार होते.
पाने व बोंडे पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. करडई पिकाच्या (Safflower Crop) पाना-फुलावरील काटे पीक तयार होते, तेव्हा ते वाळतात आणि टणक होतात. काढणी करताना हे काटे हाताला आणि पायाला टोचतात त्यामुळे करडई काढणीसाठी मजूर मिळत नाहीत.
म्हणून करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्र म्हणजेच कंबाइन हार्वेस्टर अतिशय उपयुक्त आहे. या यंत्रामुळे काढणी व मळणीचे काम सोपे होते. अगदी कमी वेळात काढणी होते. काढणी खर्चात देखील बचत होते.
करडईच्या झाडाचे बारीक तुकडे होऊन शेतात विखुरले जात असल्यामुळे जमिनीत मिसळून कुजल्यामुळे त्यापासून जमिनीस चांगले सेंद्रिय खत मिळते. या यंत्राद्वारे काढणी केली असता स्वच्छ धान्य मिळते. बहुतेक वेळा शेतकरी शेतातून थेट बाजारात करडई विक्रीसाठी घेऊन जातात.
करडई काढणीची योग्य वेळ कोणती?
कोरडवाहू पीक १२० ते १३० दिवसात आणि बागायती पीक १३० ते १४० दिवसात तयार होते. काढणी झाडावरील सर्व पाने, बोंडे पिवळी पडून वाळल्यानंतर तसेच झाडाच्या फांद्या व दाणे टणक झाल्यावर काढणी करावी.
पीक जास्त वाळले तर काढणी करताना बोंडे तडकून त्यातील दाणे गळतात, म्हणून काढणी वेळेवर करणे गरजेचे आहे. काढणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी तापमान कमी असते तसेच आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने करडईचे काटे नरम पडतात तसेच बोंडे तडकून बी गळण्याचे प्रमाण देखील कमी असते.
धारदार विळ्याने झाडाची कापणी जमिनीलगत करावी. कापलेल्या झाडांचे छोटे ढीग करावेत. ढीग करताना कापलेला बुडख्याचा भाग मध्यभागी आणि फांद्या, शेंडे बाहेरील बाजूस या पद्धतीने रचावेत. असे ढीग ७ ते ८ दिवस वाळू द्यावेत.
त्यानंतर खळ्यात नेऊन किंवा ताडपत्रीवर बडवावेत. बडवण्यासाठी काठीचा वापर करावा किंवा मळणी यंत्राने मळणी करावी. मळणीनंतर उफणणी करून स्वच्छ करावी. नंतर चांगली वाळवावी. पोत्यात भरून साठवण करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.