
बंगाल येथील सुंदरबन पट्ट्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली लहान भारतीय माशांची जात म्हणजे बेंगॉल कॅटफिश (Bengal Catfish). तिचे शास्त्रीय नाव Mystus gulio (Ham.) असून, स्थानिक लोक नोना टेंग्रा या नावाने ओळखतात. या माशांच्या उत्पादनवाढीसाठी (Fish Production) भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत (ICAR) कार्यरत चेन्नई येथील केंद्रीय खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन (Fish Farming) संस्था आणि काकद्वीप संशोधन केंद्राने (KRC-CIBA) घरगुती उबवण आणि बीज उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून घरगुती पातळीवर माशांची अंडी उबवणे आणि त्यापासून बीजनिर्मितीसाठी साउथ २४ परगणा जिल्ह्यातील बुद्धापूर येथील भूमिहीन आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून या महिला गटाने उत्पादन सुरू केले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
...अशी आहे ही छोटी हॅचरी
या मॉड्यूलर हॅचरीमध्ये पिलांच्या विकासासाठी जाळीचा पिंजरा असतो. तसेच पैदास विभाग म्हणून प्लॅस्टिकची (एफआरपी) १००० लिटर क्षमतेची टाकी असून, त्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्याची योजना केलेली असते. बीज किंवा अत्यंत लहान जिरे वाढविण्याचे युनिट असते.
मत्स्यबीज उत्पादनाची प्रक्रिया ः
-बेंगॉल कॅटफिशची प्रौढ झालेले आणि आरोग्यपूर्ण मासे निवडणे. त्यांचे नर मादी प्रमाण २ः१ ठेवले जाते.
-त्यांच्या आरोग्य आणि वयाबाबत वेळोवेळी परीक्षण करणे.
-त्यांना पैदास टाकीमध्ये वाढू दिले जाते. त्यानंतर त्यामध्ये अंडी गोळा करण्यासाठी एग कलेक्टर ठेवले जाते.
-त्यांच्यातील संप्रेरकांचे प्रमाणावर लक्ष ठेवणे.
-इंजेक्शन दिल्यानंतर ८ ते १२ तासांमध्ये अंडी देऊ लागतात.
-अंडी गोळा करणे.
-मिळवलेली अंडी उबवण्याची प्रक्रिया.
-अंडी उबल्यानंतर निघालेल्या अत्यंत लहान पिलांची वाढ काळजीपूर्वक करणे.
दुहेरी फायदा
१) शास्त्रीय प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांच्या या गटाने २० हजार माशांचे बीज तयार केले. त्यांची तीस दिवस देखभाल केल्यानंतर पश्चिम बंगाल येथील सागर बेटे, नामखाना आणि काकद्वीप या परिसरातील मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना विक्री केली. या मत्स्य जिऱ्यांचा दर एक रुपये प्रति जिरे असे होता. दिवसातून केवळ दोन तास काम केल्यानंतर या महिलांना दरमहा सुमारे १० हजारांपर्यंत निव्वळ फायदा हाती आला. त्यातून त्यांच्या उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार झाला आहे.
२) या नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच माशांचे बीज उपलब्ध होऊ लागले आहे. पूर्वी परिसरातील खाऱ्या पाण्यातून मत्स्यबीज गोळा करावे लागत. ते कष्ट आता वाचले आहेत. स्थानिक आणि घरगुती पातळीवर मत्स्यबीज उत्पादनाचे हे प्रारूप आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. त्यातून प. बंगाल येथील भूमिहीन महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.
(स्रोत ः केंद्रीय खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन संस्था, चेन्नई)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.