Artificial Intelligence Technology : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान कसे कार्य करते?

AI Update : मागील भागात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेतानाच त्याचा कृषी क्षेत्रामध्ये कसा वापर करता येईल, याची माहिती घेतली. या लेखामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यातील विविध तत्त्वांची माहिती घेऊ.
Artificial Intelligence Technology
Artificial Intelligence TechnologyAgrowon

Artificial intelligence : माणूस जसा प्रत्येक निर्णय हा स्वाभाविकपणे त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे घेत असतो. त्याच प्रकारे निर्णय घेण्याची क्षमता यंत्रामध्ये कृत्रिमपणे निर्माण करणे शक्य असते.

त्यालाच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा एआय) म्हणून ओळखले जाते. त्याविषयी जाणून घेण्यापूर्वी मानवी बुद्धिमत्ता कशा प्रकारे निर्णय घेते, हे पाहू.

मानवी बुद्धिमत्ता आधारित निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे आहेत. त्यापैकी कृषी क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीने पुढील टप्पे महत्त्वाचे आहेत.

१. वस्तूची ओळख व तिच्या वैशिष्ट्यांचे आकलन.

२. वस्तूच्या ओळखीद्वारे तसेच तिच्या वैशिष्ट्यांच्या आकलनाद्वारे निर्णय.

३. निर्णय अंलबजावणी.

उदा. जर ज्वारीचे कणीस तोडावयाचे असल्यास प्रथम ज्वारीचे कणीस ओळखून ते तोडण्यायोग्य स्थितीमध्ये आहे का, हे प्रथम ठरवावे लागते. त्यानंतर ते कणीस प्रत्यक्षामध्ये तोडण्याची क्रिया केली जाते. हे आपण टप्प्या-टप्प्याने कसे करतो?

Artificial Intelligence Technology
Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त ‘बोलके सिमेंट’

१. आपण ज्वारीचे कणीस कसे ओळखतो?

आपण जेव्हा ज्वारीचे कणीस पहिल्या वेळी पाहतो, त्याची प्रतिमा आपल्या डोळ्याद्वारे घेतली जाते. ती आपल्या स्मृतीमध्ये साठवली जाते. त्यासाठी कुणातरी वडिलधाऱ्यांनी लहानपणी हे ‘ज्वारीचे कणीस’ असल्याचे सांगून त्या प्रतिमेचे नावही सांगितलेले असते. तेही त्या प्रतिमेसोबत स्मृतीमध्ये नोंदवले गेलेले असते.

अशा प्रकारे अनेक वस्तूंचे नमुने किंवा प्रतिमा आपल्या स्मृतीमध्ये त्या त्या नावाने साठविलेल्या असतात. त्यामुळे पुढे आयुष्यात आपण नजरेला कधीही एखादे कणीस पडले की त्याची प्रतिमा आपल्या डोळ्याद्वारे घेऊन मेंदूद्वारे स्मृतीमध्ये साठवलेल्या अनेक प्रतिमेशी जुळवून पाहिली जाते. त्यावरून ती प्रतिमा आणि त्याचे नाव यांची सांगड घातली जाते. ते नेमके ज्वारीचे आहे की बाजरी की अन्य कशाचे हे ओळखतो.

तितक्या जास्त वेळा आपण ज्वारीचे कणीस वेगवेगळ्या स्थितीमध्ये पाहतो, तितक्या त्याच्या अधिक स्मृती साठवलेल्या असतात. तितकी कणीस ओळखण्याची प्रक्रिया अचूकतेकडे जाते. हीच बाब एखाद्या व्यक्तीला ओळखण्याबाबत असते. जितक्या अधिक वेळा एखाद्या व्यक्तीला आपण पाहिलेले असेल, तितकी त्याची ओळख पटवणे सोपे होते. मात्र एखाद्या व्यक्तीला कमी वेळा पाहिले असेल किंवा खूप कालावधीने पाहिल्यास व्यक्ती ओळखण्याची अचूकता कमी राहते.

२. अशाच प्रक्रियेद्वारे मानवी स्मृतीमध्ये अनेक वस्तू, बाबी किंवा तिच्या विविध अवस्था नोंदवलेल्या असतात. ज्वारीचे कणीस झाली ही एक वस्तू. त्याच्या पक्वतेप्रमाणे ‘अपक्व कणीस’, ‘हुरड्याचे कणीस’, ‘कापणीस परिपक्व कणीस’ ‘वाळलेले कणीस’ अशा अनेक प्रतिमा आपल्या स्मृतीमध्ये साठविल्या जातात. हे जितक्या जास्त आणि वेगवेगळ्या परिस्थितीतील कणीस आपण पाहिलेले आहे, तितकी त्याच्या पक्वतेची श्रेणी आपण ओळखू शकतो.

३. अशा प्रकारे आपण डोळ्यांद्वारे प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये प्रतिमा पकडतो. अनेक प्रतिमा आपल्या स्मृतीमध्ये साठवलेल्या असतात. मेंदूद्वारे प्रत्यक्ष परिस्थितीमधील प्रतिमेची स्मृतीमध्ये साठविलेल्या प्रतिमांशी जुळवणूक करून त्याची ओळख पटविली जाते. आपल्या उदाहरणामध्ये हे कणीस काढणीस योग्य झाल्याची ओळख पटवून आपण काढणीचा निर्णय घेतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेची आवश्यकता का?

आता प्रगत झालेल्या प्रतिमांकनाच्या व स्मृती साठविण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे या गोष्टीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करता येते. जे काम आपण स्वतः मानवी बुद्धिमत्तेद्वारे करू शकतो,

त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याची गरजच काय, असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येक मानवाची बुद्धीमत्ता हे वेगळी असून, त्यानुसार प्रत्येक निर्णय बदलू शकतो. आपल्या उदाहरणामध्ये प्रत्येक कामगार हा काढणीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतो. त्यातून कमी अधिक पक्वतेची कणसे तोडली जाण्याची शक्यता राहते.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्र हे एकटेच त्याच्या क्षमतेनुसार एकाच प्रकारची कणसे तोडण्याची शक्यता अधिक असेल. त्याच प्रमाणे ज्वारी कापणीयोग्य झाले किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपणास शेताच्या विविध भागांचे नियमित निरीक्षण करावे लागेल.

तेव्हाच शेताच्या कोणत्या भागातील किती कणसे पक्व झाली आहेत, हे समजू शकले. आपल्याकडे कमी क्षेत्र असल्यास हे शक्य आहे, पण ज्या वेळी हजारो हेक्टर क्षेत्रावरील तपासणी करणे हे एका माणसांचे काम राहत नाही. त्यातून तपासणी करणाऱ्या माणसांची संख्या वाढून त्यांच्याकडून वेगवेगळा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाढते.

त्याचा अंतिम परिणाम त्यांच्या उत्पादनाच्या प्रतीवर होतो. तसेच कुशल माणसांची उपलब्धता कमी होत आहे, व त्यासाठी होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. अशा अनेक कारणांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.

Artificial Intelligence Technology
Research in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील संशोधनााठी दक्षिण आफ्रिकेच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची महत्त्व लक्षात येण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहू.

आपल्या शेतामधील पिकाकडे पाहताना नियमित रंग, रूप आणि आकाराची पाने दिसत असतात. अचानक एखाद्या ठिकाणी त्यामध्ये काहीतरी फरक दिसून येतो. यात नियमित निरीक्षणासोबतच आपण त्या लक्षणांचा अर्थ लावण्यासाठी (म्हणजे रोगाचे नाव किंवा अन्नद्रव्याची कमतरता ओळखण्यासाठी) प्रशिक्षित असलो तरी पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव ओळखू शकू.

त्यातच क्षेत्र मोठे असल्यास प्रत्येक ठिकाणचे नियमित निरिक्षण करण्याचे कार्यही अवघड, क्लिष्ट आणि वेळखाऊ ठरते. पिकावरील रोगाची लक्षणे लक्षात येणे, ती ओळखणे यामध्ये जाणारा काळ अधिक असल्यास रोगाची तीव्रता वाढलेली असेल. अशा वेळी आपल्याकडे रोग ओळखण्याची कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान असल्यास शेताच्या कुठल्या भागात रोग पसरलेला आहे, त्याची तीव्रता किती आहे इ. निदान त्वरित करून त्याप्रमाणे रोग नियंत्रणाचे उपाय त्वरित अमलात आणणे शक्य होते.

रोगावर वेळीच नियंत्रण मिळविता आल्यास उत्पादन व गुणवत्तेतील घट टाळता येते. मानवी बुद्धिमत्तेद्वारे पिकाचे निरीक्षण नियमितपणे करणे, त्यातील रोगाची व त्याच्या तीव्रतेचे प्रमाण अचूकपणे ओळखणे हे अवघड ठरते. त्यामध्ये अनेक मर्यादा येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये ही कामे यंत्रे न थकता नियमितपणे करू शकतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे हे कसे साध्य करावे?

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामध्ये ‘ओळखणे’ हे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रथम आपणास जे दिसते, ते तसे का दिसते, हे बघू. कुठलीही वस्तू दिसणे व तिची नेमकी ओळख पटवून तिचे नाव ठरवण्यासाठी पाच गोष्टींची आवश्यकता आहे.

१. वस्तू, २. प्रकाश, ३. डोळे, ४. स्मृती, ५. मेंदू

एखादी वस्तू संपूर्ण काळोखात असेल, तर ती आपणास दिसत नाही. ती दिसण्यासाठी त्या वस्तूवर प्रकाश पडणे गरजेचे असते. एखादी वस्तू आपणास दिसते कशी? तर वस्तूवर पडलेल्या प्रकाशाचा काही भाग शोषला जातो, काही भाग परावर्तित होतो, किंवा काही भाग प्रसारित होतो.

शोषलेला, परावर्तित व प्रसारित होणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण हे वस्तूचा पृष्ठभाग किंवा बाह्यभागाच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असते. त्यातील परावर्तित झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांत पोचतो व आपणास ती वस्तू दिसते. त्याचे संकेत (प्रतिमेच्या स्वरूपात) मेंदूकडे पाठवून स्मृतीमध्ये असलेल्या अनेक वस्तूंच्या प्रतिमांशी जुळवून पाहिल्यानंतर त्या वस्तूची ओळख पटवली जाते. उदा. आपणास टोमॅटो हा लाल रंगाचा दिसतो, कारण टोमॅटो हा प्रकाशातील लाल सोडून सगळे रंग शोषून घेतो. त्यातून केवळ लाल रंग परावर्तित होतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) परिसंस्थेत ‘डोळे’ म्हणजे ‘संवेदके’ (Sensors), तर स्मृती म्हणजे मेमरी (Memory) व मेंदू म्हणजे संगणकीय प्रारूप (Computer programme) होय.

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पिकावरील रोग ओळखण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथम अनेक पिकावरील अनेक रोगांच्या अनेक तीव्रतेच्या प्रतिमा या विशिष्ट प्रकारच्या उपकरणांद्वारे (यात संवेदके आली) घेऊन त्या क्लाऊडमधील मेमरीमध्ये साठविलेल्या असतात.

अशा प्रतिमांची लायब्ररी केलेली असते. प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये प्रकाशाची किरणे वनस्पतीवर पडल्यानंतर त्यामधील परावर्तित किरणे संवेदकाच्या साहाय्याने पकडली जातात. त्याद्वारे तयार झालेल्या प्रतिमेची क्लाऊड मेमरी मध्ये असलेल्या अनेक प्रतिमांशी जुळवणी केली जाते. जुळलेल्या प्रतिमेशी संबंधित रोग हा प्रत्यक्ष परिस्थितीमधील पिकावरील रोग असल्याचे सूचित केले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com