चाऱ्यासाठी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र

दुग्ध व्यवसायात होणाऱ्या एकूण खर्चापैकी ७० ते ७५ टक्के भाग हा चारा व पशुखाद्यावर होतो. पशू आहारात ७० टक्के भाग हिरवा व सुका चारा असतो, तर ३० टक्के भाग हा पशुखाद्याचा असतो.
चाऱ्यासाठी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्र
Jowar FodderAgrowon

दुग्ध व्यवसायात (Dairy) होणाऱ्या एकूण खर्चापैकी ७० ते ७५ टक्के भाग हा चारा (Fodder) व पशुखाद्यावर (Animal Feed) होतो. पशू आहारात ७० टक्के भाग हिरवा व सुका चारा असतो, तर ३० टक्के भाग हा पशुखाद्याचा असतो. मराठवाड्यात खरीप हंगामात (Kharif Season) चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यत्वे मका, ज्वारी (Jowar), बाजरी व काही प्रमाणात संकरित चारा (Hybrid Fodder) पिके उदा. नेपियर ग्रास (Napier Grass), मारवेल अशा पिकांची लागवड केली जाते. खरीप हंगामात बहुतांश क्षेत्रावर संकरित धान्य उत्पादक वाणांचीच लागवड केली जाते. त्यातून उपलब्ध होणाऱ्या कडब्याचा चारा म्हणून वापर केला जातो. काही वेळा स्थानिक किंवा सुधारित अशा उंच वाढणाऱ्या धान्य व कडबा देणारे द्वि-उपयोगी वाणाचीही लागवड केली जाते. अशा दोन्ही प्रकारच्या वाणांच्या कडब्याची गुणवत्ता व उत्पादन क्षमता ही प्रामुख्याने कमी असते. चाऱ्यासाठी ज्वारीची लागवड करायची असल्यास खास सुधारित वाणांची लागवड करावी. त्याच्या हिरव्या व वाळलेल्या कडब्याची गुणवत्ता व सकसपणा हा धान्यासाठी किंवा द्वि-उपयोगी वाणांच्या कडब्याच्या तुलनेत खूप जास्त असतो.

Jowar Fodder
बहुवार्षिक संकरित नेपियर चाऱ्याची लागवड

सुधारित वाण : सी.एस. व्ही. ४० एफ , सी. एस. व्ही. ३० एफ , सी. एस. व्ही. २१ एफसी. एस. व्ही. ४० एफ हा चारा ज्वारी वाण ज्वारी संशोधन केंद्र, परभणी येथे विकसित करण्यात आला आहे. हा वाण ७.७ टक्के उंच वाढणारा (सरासरी उंची २४० ते २५० सेंमी), हिरवीगार, लांब रुंद पाने, मध्यम गोड रसाळ धांडा यामुळे जनावरे आवडीने खातात. त्याची हेक्टरी उत्पादन क्षमता हिरवा चारा ४५ ते ४६ टन, तर वाळलेला चारा १४ ते १५ टन इतकी आहे. कडब्याची प्रत उत्तम असून, पाचन क्षमता ५४.४८ टक्के प्रथिने इतकी आहे. हा वाण खोडमाशी, खोडकिडा तसेच पानावरील ठिपके यास मध्यम सहनशील आहे.

लागवड व्यवस्थापन -

जमीन : चारा ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. योग्य मशागत करुन, पाण्याचा निचरा होण्यासाठी दांड पाडून घ्यावेत.

बियाण्याचे प्रमाण : चारा ज्वारीच्या पेरणीकरिता हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम अधिक ट्रायकोडमा १० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात हलके चोळून घ्यावे. यामुळे बियाण्याची उगवणक्षमता तसेच पुढील कालावधीत जोमदार वाढ होण्यास मदत होते. खोडामाशीच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (३५% एफएस) ७ मिलि प्रति किलो बियाणे किंवा इमिडाक्लोप्रीड (४८% एफएस) १४ मिलि प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. खोडमाशीमुळे होणारे नुकसान टळू शकते.

पेरणीचा कालावधी : खरीप ज्वारीप्रमाणेच जुनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान पेरणी करावी. पेरणी उशिरा झाल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव वाढतो.

पेरणीचे अंतर : या वाणाची पेरणी करताना दोन तासांतील अंतर २५ सेंमी व दोन ताटांतील अंतर १० सेंमी इतके राहील, अशा पद्धतीने तिफणीने पेरणी करावी. दोन तास किंवा दोन ताटांतील अंतर कमी ठेवल्यास ज्वारीचे धांड बारीक पडतात, त्यामुळे जनावरांना खाण्यास व चांगले पचन होण्यास मदत मिळते.

खत व्यवस्थापन : हे ज्वारीचे चारा पीक नत्र व स्फुरद यांना सकारात्मक प्रतिसाद देणारे आहे. वाणास वाढीच्या योग्य अवस्थेत व योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांचा वापर केल्यास हिरवा व वाळलेल्या चाऱ्याच्या उत्पादनात भरघोस वाढ होते. यासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. ही खत मात्रा पीक वाढीच्या अवस्थेत दोनदा विभागून द्यावी. पैकी पेरणी करताना नत्राची अर्धी मात्रा (५० किलो/हे.), स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा (५० किलो/ हे.) द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा (५० किलो/हे.) पिकाच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर सुमारे ३० ते ४० दिवसांनी द्यावी.

आंतरमशागत : चारा ज्वारीची लागवड धान्य ज्वारीच्या तुलनेत दाट केली जाते. दोन ताटांतील व दोन धांडांतील अंतर इतर ज्वारीच्या तुलनेत कमी असते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आंतरमशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी उगवणीपूर्व रासायनिक तणनाशकांचा वापर करणे सोयीचे ठरते. ॲट्राझीन १ किलो प्रति ७५० ते १००० लिटर पाणी या प्रमाणात प्रति हेक्टरी जमिनीवर फवारणी करावी. पिकातील अपायकारक तणांपासून चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊ शकतो.

पाणी व्यवस्थापन : खरीप हंगामात घेतला जाणारा चारा पिकाचा वाण असल्यामुळे अतिरिक्त पाण्याची सहसा गरज भासत नाही. तरीही अनियमित पाऊस किंवा जास्त दिवसांचा खंड पडल्यास पाणी द्यावे. पिकांत पाण्याच्या कमतरतेमुळे उद्‍भवणारी लक्षणे पुढील प्रमाणे -जसे पाने दुपारच्या उन्हात कोमेजून जातात.

-काही प्रमाणात पाने गुंडाळली जातात.

-पाण्यांच्या कडा करपल्याप्रमाणे दिसतात.

वरील लक्षणे आढळून आल्यास पिकास पाणी द्यावे. पिकाची वाढ चांगली होऊन चाऱ्याच्या उत्पादनात वृद्धी होईल.

----

-प्रीतम भुतडा, (सहायक प्राध्यापिका -कृषी विद्यावेत्ता)), ९४२१८२२०६६

-डॉ. एल. एन. जावळ (ज्वारी पैदासकार), ७५८८०८२१५७

(ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com