इंधन बचतीसाठी वाढवा ट्रॅक्टरची कार्यक्षमता

गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाच्या किमतीमध्ये वेगाने वाढ गेली आहे. मशागतीपासून शेतीच्या विविध कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या इंधनासाठी खर्च वाढत चालला आहे. त्याचा फटका अंतिमतः शेतकऱ्यांना बसत आहे. ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढविल्यास इंधनामध्ये मोठी बचत साधता येते.
इंधन बचतीसाठी वाढवा ट्रॅक्टरची कार्यक्षमता
Agriculture TechnologyAgrowon

विकसनशील देशांमध्ये (Developed Country) ऊर्जेचा वापर (Use Of Power) वाढत आहे. त्यासाठी वापरले जाणारे खनिज तेले (Fuel) ही परदेशातून आयात करावी लागत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण येतो. भारतातील विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा वापराचा आढावा घेतल्यास, दळणवळणासाठी (Transport) २० टक्के औद्योगिकीकरणात (Industrial Use) २५ टक्के आणि कृषी क्षेत्रामध्ये ३० टक्के वापर होतो. भारतीय कृषी (Indian Agriculture) व अन्य क्षेत्रामध्ये आज ४३ लाखांपेक्षा अधिक ट्रॅक्टर वापरात (Tractor) आहेत. कृषी कामांसाठी म्हणून दरवर्षी सुमारे ७.८५ लाख ट्रॅक्टर खरेदी केले जाते. त्याच प्रमाणे १५० लाख सिंचन पंप आणि १५ लाख मळणीयंत्रे वापरली जातात. एकूणच अशी कृषी यंत्रे चालविण्यासाठी देशाच्या एकूण इंधन वापरापैकी १० टक्के इंधन वापरले जाते.

ट्रॅक्टर शेती कामासाठी वापरताना इंधनावरील खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांवरही त्याचा ताण येत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर व संबंधित अवजारांच्या देखभाल, दुरुस्तीकडे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नियमित देखभालीच्या माध्यमातून इंधनाची (डिझेल) १० ते २५ टक्के बचत होऊ शकते. त्यासाठी पुढील पाच मुद्दे महत्त्वाचे आहेत.

१) योग्य क्षमतेच्या ट्रॅक्टरची निवड.

२) योग्य व अनुरूप अवजारांची निवड.

३) ट्रॅक्टरची योग्य काळजी, देखभाल आणि जुळवणी.

४) अवजारांची काळजी, देखभाल आणि जुळवणी.

५) वापरण्याची योग्य पद्धत.

ट्रॅक्टरची निवड करताना...

१) आपली जमीनधारणा, मातीचा प्रकार, पीक पद्धती, हवामान स्थिती, कार्यक्षमता आणि दुरुस्ती किंमत, विकत घेतल्यानंतर मिळणारी सेवा सुविधा आणि योग्य गियर प्रणाली अशा अनेक गोष्टीचा विचार ट्रॅक्टर निवडीवेळी करावा.

२) ट्रॅक्टरची अश्‍वशक्ती ः

किती अश्‍वशक्तीचा (एचपी) ट्रॅक्टर घ्यायचा, हे ठरवताना आपली पीक पद्धती, शेतीचा प्रकार (कोरडवाहू किंवा बागायती) यांचा विचार करावा. एकूण जमीन धारणा क्षेत्र व त्याला साधारणपणे आवश्यक ट्रॅक्टर क्षमता (अश्‍वशक्ती) यासाठी खालील ढोबळ सूत्र लक्षात ठेवावे.

एक पीक पद्धती (कोरडवाहू शेती) - १ अश्‍वशक्ती = २ हेक्टर (उदा. १०० एकर क्षेत्र = २० ते २५ अश्‍वशक्ती ट्रॅक्टर)

दुबार पीक पद्धती (ओलिताखालील शेती) - १ अश्‍वशक्ती = १.५ हेक्टर (उदा १०० एकर = ३० ते ३५ अश्‍वशक्ती ट्रॅक्टर)

३) ट्रॅक्टर आणि त्याची इंधन (डिझेल) क्षमता ः

विविध अश्‍वशक्तींच्या ट्रॅक्टरसाठी इंधनाची गरज प्रति तास पुढीलप्रमाणे असते. म्हणजे गरजेपेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्टर घेतल्यास तेवढे इंधन जास्त वापरले जाते. विनाकारण खर्चात वाढ होते.

२५ अश्‍वशक्ती - २०५ ग्रॅम / पीटीओ अश्‍वशक्ती /तास

२५ ते ३५ अश्‍वशक्ती - २०० ग्रॅम / पीटीओ अश्‍वशक्ती /तास

३५ ते ५५ अश्‍वशक्ती - १९५ ग्रॅम / पीटीओ अश्‍वशक्ती /तास

५५ अश्‍वशक्ती ते अधिक - १८५ ग्रॅम / पीटीओ अश्‍वशक्ती /तास

४) एकूण गिअरची संख्या ः एकसमान अश्‍वशक्ती ट्रॅक्टरच्या ओढण्याच्या शक्तीच्या तुलनेत ज्या ट्रॅक्टरची ओढण्याची शक्ती कमी गिअरमध्ये जास्त वेगावर मिळत असेल तो ट्रॅक्टर निवडावा

५) ट्रॅक्टरला जुळते असे योग्य अवजार आणि योग्य वेग ः अवजारांचा आकार ट्रॅक्टरशी जुळणारा असावा. तसेच ते चालवण्यासाठी ट्रॅक्टरच्या पूर्ण अश्‍वशक्तीचा वापर होईल, इतका ट्रॅक्टरचा काम करण्याचा वेग असावा. शक्य तितक्या वरच्या गिअरमध्ये ट्रॅक्टर चालवावा. त्यामुळे ट्रॅक्टर इंजिनमधून धूर येणार नाही.

उदा. जर ३० अश्‍वशक्ती ट्रॅक्टरला ११ टाइन कल्टिव्हेटरऐवजी जर ९ टाइन कल्टिव्हेटर जोडला, तर ट्रॅक्टरकडून मिळणारी शक्ती २० टक्के वाया जाईल.

योग्य अशा जुळण्याऱ्या अवजारांची निवड केल्यामुळे कामाच्या वेळेत बचत होते.

शक्य तितके कमी वळण घेतल्याने योग्य पद्धतीने अवजारांचा वापर होतो. कमी वेळात जास्त काम होते. अचूकतेने बोलायचे तर प्रति तास २० ते ४० टक्के जास्त काम होते. त्यातून प्रति हेक्टर १० ते १५ टक्के डिझेलची बचत होते. म्हणजेच ट्रॅक्टरची पूर्ण शक्ती वापरली जाईल इतक्या आकाराचे अवजार वापरल्यास जास्त बचत होते. इंधनाची बचत होते.

हीच बाब ट्रॉली बाबत. एखाद्या ट्रॅक्टरची क्षमता ५ टन क्षमतेची ट्रॉलीला ओढण्याची असताना आपण ३ टन क्षमतेची ट्रॉली ओढत असून, तर ४० टक्के ट्रॅक्टरचा वापर कमी होतो. यात २० टक्के डिझेल प्रति टन अधिक वापरले जाईल.

ट्रॅक्टरची देखभाल ः

देखभालीकडे दुर्लक्ष असलेला ट्रॅक्टर आणि देखभाल विना अवजारे यांच्या वापरामुळे सुमारे २५ टक्के अधिक डिझेल वापरले जाऊ शकते.

ट्रॅक्टरसोबत मिळालेल्या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेल्या सविस्तर माहितीचा वापर करून ट्रॅक्टरची योग्य काळजी, निगा व देखभाल करावी. त्यामुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता टिकून राहते. त्याचा फायदा इंधन बचतीमध्ये होतो.

इंजिनची परिस्थिती जाणून घ्यावी. आवाजासह विविध लक्षणांवरून त्याची स्थिती जाणता येते. उदा. कॉम्प्रेशन प्रेशर व इंजेक्टर प्रेशर, व्हॉल्व क्लिअरन्स, थर्मोस्टेट व्हॉल्व, सायलेन्सर स्थिती आणि हवा स्वच्छ करण्याची पद्धत इ.

इंधन प्रणाली ः थोडीशी जर काळजी घेतली तर मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल.

-डिझेलची साठवण स्वच्छ टाकीत करावी

-डिझेल टाकी ट्रॅक्टरचे काम संपल्यानंतर लगेचच भरावी.

-डिझेलचे फिल्टर ट्रॅक्टर निर्मात्याने माहिती पुस्तिकेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे बदलावे.

-डिझेल कुठेही लीक होत नाही, याची काळजी घ्यावी.

लुब्रिकेशन प्रणाली ः

-योग्य त्या ग्रेडचे इंजिन ऑइल वापरावे.

-इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर निर्मात्याच्या निर्देशानुसार बदलावेत.

विद्युत प्रणाली ः

-ट्रॅक्टरची विद्युतप्रणाली जर वापरात असेल तर ट्रॅक्टरचे इंजिन चालू ठेवावे.

-बॅटरीतील इलेक्ट्रोलाइटची लेव्हल ट्रॅक्टर वापराच्या दर ५० तासांनी तपासावी.

-दोन्ही बॅटरी केबल्स ठराविक कालावधीनंतर चेक करावेत.

-ॲम्पियर मीटरची चार्जिंग व्यवस्थित होत असल्याची खात्री करावी.

-जेव्हा ट्रॅक्टर वापरात नसेल, तेव्हा ट्रॅक्टरचे इंजिन व विद्युत प्रणालीचे कार्य बंद करावे.

क्लच प्रणाली ः

ट्रॅक्टर चालू असताना क्लच पॅडलवर पाय ठेवू नये. त्यामुळे क्लच प्लेटचे घर्षण लवकर होते. परिणामी, ट्रॅक्टरची कार्यक्षमता कमी होऊन इंधन जास्त लागते. (फ्री प्ले - २५ ते ३० मि.मी.चा ठेवावा.)

टायरमधील हवेचा दाब ः

१) रस्त्यावर वाहतूक करताना - पुढील चाकांमधील हवेचा दाब २४ ते २८ पीएसआय आणि मागील चाकांमध्ये १४ ते १८ पीएसआय हवेचा दाब ठेवावा.

२) शेतामध्ये काम करताना - पुढील चाकांमधील हवेचा दाब २२ ते २४ पीएसआय आणि मागील चाकांमध्ये १२ ते १४ पीएसआय हवेचा दाब ठेवावा. अथवा ट्रॅक्टर निर्मात्यांच्या निर्देशानुसार टायरमधील हवेचा दाब असावा.

ट्रॉली ट्रॅक्टरला जोडण्याची योग्य पद्धत ः ट्रॉली ट्रॅक्टरला समांतर सरळ रेषेत जोडावी.

ट्रॅक्टर चालवताना चांगल्या सवयी

-योग्य वेगामध्ये ट्रॅक्टर चालविणे.

-हळूवारपणे वेग वाढवावे. ट्रॅक्टर वेगामध्ये एकसारखेपणा टिकवून ठेवणे.

-व्यवस्थितपणे ब्रेक लावावे.

-ट्रॅक्टर चालवताना विनाकारण क्लच व ब्रेक पॅडलवर पाय ठेवू नये.

-उपरोक्त बाबींचा अवलंब केल्यास नक्कीच ट्रॅक्टर वापरताना इंधनाची बचत होईल. ट्रॅक्टरची कार्यक्षमतासुद्धा चांगली मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com