Agriculture Mechanization : कृषी यंत्रे, अवजारे वापरात भारत पिछाडीवर

जागतिक पातळीवर ट्रॅक्टरची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताने लौकिक मिळवला असला तरी ट्रॅक्टरचलित आणि बिगर ट्रॅक्टरचलित यंत्रे-अवजारांच्या वापरात देश कमालीचा पिछाडीवर आहे.
Agriculture Mechanization
Agriculture MechanizationAgrowon

Agriculture Mechanization पुणे ः जागतिक पातळीवर ट्रॅक्टरची (Tractor Market) सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताने लौकिक मिळवला असला तरी ट्रॅक्टरचलित आणि बिगर ट्रॅक्टरचलित यंत्रे-अवजारांच्या (Agriculture Machinery) वापरात देश कमालीचा पिछाडीवर आहे.

त्यातही छोट्या यंत्राची उपलब्धता नसल्यामुळे त्याचा फटका विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना बसत आहे. त्या अनुषंगाने कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) धोरणामध्ये केंद्र व राज्यांनी तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेच्या (एनसीएईआर) एका अभ्यास अहवालात काढण्यात आला आहे.

‘कृषी यंत्रे उद्योगात भारताला जगाचे शक्तिस्थळ बनविणे’ या विषयावरील अहवाल मंगळवारी (ता.२१) कृषी यंत्रे उत्पादकांची संघटना (एएमएमए इंडिया) आणि राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषद (एनसीएईआर) यांनी एकत्रितरीत्या दूरदृश्‍यप्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सादर केला. या वेळी अभ्यास गटाच्या प्रमुख प्रा. बोरनाली भंडारी, कृषी यंत्रे उत्पादक संघटनेचे (अम्मा) अध्यक्ष मितुल पांचाळ उपस्थित होते.

‘एनसीएईआर’च्या महासंचालक पुनम गुप्ता म्हणाल्या, “देशात कृषी यंत्र क्षेत्रात संशोधन व विकासाची अत्यंत गरज आहे. त्यासाठी या क्षेत्रातील शिक्षण व्यवस्था व उद्योग विश्‍वाने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तसे झाले तर देशातील छोट्या शेतकऱ्यांपर्यंत कृषी यंत्रे व अवजारे पोहोचतील.”

श्री. पांचाळ म्हणाले, “या अहवालाचे आम्ही स्वागत करतो. देशाच्या कृषी यंत्रे निर्मिती उद्योगाला यातील शिफारशी उपयुक्त ठरतील. या शिफारशींवर काम करण्यासाठी सध्याच्या धोरणात तसेच योजनांमध्ये बदल करावे लागतील.”

Agriculture Mechanization
Farm Mechanization : प्रतिकूलतेत पीक वाचले, तंत्रवापरातून उत्पादन वाढले

अहवाल काय सांगतो...

- भारतीय ट्रॅक्टरची बाजारपेठ जगात पहिल्या क्रमांकावर.

- ४.४ टक्के शेतकरी कुटुंबाकडे स्वतःचा ट्रॅक्टर तर २.४ टक्के शेतकऱ्यांकडे पॉवर टिलर.

- ५.३ टक्के शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, यांत्रिक नांगर, कापणी यंत्र या चारपैकी एक तरी यंत्र आहे.

- शेतीच्या तुकडेकरण प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांकडील जमीनधारणा कमी होतेय. त्यामुळे कृषी यंत्रशक्तीच्या वापरात देश पिछाडीवर

- शेतकऱ्यांना यंत्रे व अवजारांच्या वापराबाबत योग्य त्या तांत्रिक माहितीची उपलब्धता ही समस्या.

- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानित कृषी यंत्रांचा कमी लाभ मिळतो.

- कृषी यंत्रे व अवजारे घेण्यासाठी कर्ज प्रणालीत अडथळे

- अवजारे भाड्याने देण्यासंदर्भातील योजनांना मर्यादित यश.

कृषी यंत्रे निर्मिती क्षेत्रातील अडथळे

- सरकारी नियंत्रण प्रक्रिया प्रोत्साहनापेक्षा अडथळे तयार करणारी ठरते

- यंत्र निर्मितीत तांत्रिक क्षमता असलेल्या मनुष्यबळाची टंचाई

- यंत्र निर्मितीमधील शिक्षण व्यवस्था व मोठ्या उद्योगांमध्ये कमी संपर्क

- छोटे अवजार उत्पादक मोठ्या संशोधन प्रणालींपासून लांब.

Agriculture Mechanization
Mechanization : वाढत्या यांत्रिकीकरणाचे लाभही वाढवा

अहवालात सुचविलेले उपाय...

- कृषी यंत्रे व अवजारांबाबत पुढील १५ वर्षांचे धोरण आखावे

- ट्रॅक्टरचलित अवजारे व बिगर ट्रॅक्टरचलित किंवा मनुष्यचलित अवजारे निर्मिती उद्योगांना बळकट करावे

- ट्रॅक्टर निर्यातीप्रमाणेच ट्रॅक्टरचलित अवजारे व बिगर ट्रॅक्टरचलित यंत्रे आणि अवजार निर्यातीत भारताला जगात अग्रभागी येण्याची संधी

- यंत्रे व अवजारांसाठी सरकारी अनुदानित योजना आणि कर्जपुरवठा वर्षभर चालू ठेवाव्यात

- मोठे हार्वेस्टर, शक्तिशाली लावणी यंत्रांना केवळ खरेदीवरच नव्हे तर भाडेतत्त्वावर घेण्यास अनुदान द्यावे

- अनुदानास पात्र ठरण्यासाठी सरकारने किमान शेतजमिनीची अट हटवावी.

- एकाच यंत्राच्या अनुदान प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या २८ राज्यांमध्ये वेगवेगळी यंत्रणा. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. अनुदान प्रक्रियेसाठी केंद्रीय किंवा एकात्मिक यंत्रणा असल्यास यंत्र उत्पादकांसाठी फायदेशीर ठरेल.

- डीबीटी प्रणाली सुटसुटीत व एकसारखी करावी

“ट्रॅक्टरमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर असून, दरवर्षी ८ लाखापर्यंत ट्रॅक्टर विकले जातात. पण, कृषी उद्योगात फक्त २० टक्के यंत्रे व अवजारे विकली जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर अवजारे लागतात. मात्र लहान-मोठ्या अवजरांवर कमी संशोधन होत असल्यामुळे हे घडते आहे.

उद्योग व संशोधनात दुरावा झालेला आहे. त्यामुळे संशोधन उद्योगांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी संशोधनात गुंतवणूक हवी. उद्योगांना प्रोत्साहन व मदत करावी. कृषी विद्यापीठांची स्वामित्वशुल्कविषयक नियमावली जाचक नसावी.”

- माजी कुलगुरू डॉ. व्यकंट मायंदे

ट्रॅक्टर म्हणजेच शेतीचे यांत्रिकीकरण, असा चुकीचा समज तयार झाला आहे. छोट्या शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर छोट्या आकाराच्या यंत्रांची आणि अवजारांची गरज भासते. मात्र त्यावर संशोधन होत नाही. त्यामुळे गरजेचे अवजार अनुदानावर मिळत नाही. दुसऱ्या बाजूला अनुदानावर मिळणारी अवजारे अनेक वेळा निकृष्ट दर्जाची असतात.

- काशिनाथ खोले, प्रयोगशील शेतकरी, मु. पेंडशेत, ता. अकोले, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com