कारळा लागवड तंत्रज्ञान

तेलबिया पिकातील कारळा हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे पीक आहे. कारळा याला स्थानिक भाषेमध्ये खुरासणी, रामतीळ असेही म्हटले जाते.
Niger
NigerAgrowon

तेलबिया पिकातील कारळा (Niger) हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे पीक आहे. कारळा याला स्थानिक भाषेमध्ये खुरासणी, रामतीळ असेही म्हटले जाते. या पिकाखालील एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये (Niger Production) जागतिक पातळीवर भारताचा प्रथम क्रमांक आहे.

कारळातील पोषकत्व आणि औद्योगिक महत्त्व :

कारळा बियांमध्ये ३५ ते ४० टक्के तेल, (Niger Oil Seed) २० ते २५ टक्के प्रथिने, १० ते २० टक्के तंतुमय पदार्थ असून, १० टक्के आर्द्रता व १२ ते १८ टक्के विद्राव्य शर्करा असते. कारळा तेलामध्ये लिनोलेईक आम्ल ७५ ते ८० टक्के व ओलिक आम्ल ५ ते ८ टक्के असून, हृदयरोग नियंत्रणासाठी उत्तम तेल मानले जाते. कारळाचा उपयोग हा खाद्यतेल, वंगण व रंगनिर्मिती, साबण निर्मिती, पक्षिखाद्य तयार करण्यासाठी होतो. तेल काढणीनंतर उर्वरित पेंड ही सकस पशुखाद्य असून, त्यात ३१ ते ४० टक्के प्रथिने असतात.

कमी उत्पादकता असण्याची मुख्य कारणे :

हे पीक प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यामध्ये घेतले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये जागृती अभाव आहे. त्यामुळे उत्पादकता कमी राहते.

१) सुधारित वाणांची लागवड कमी.

२) रासायनिक खतांचा वापर न करणे.

३) योग्य अंतरावर लागवडीकडे दुर्लक्ष.

४) कीड व रोग नियंत्रणाकडे दुर्लक्ष.

जमीन : हलकी ते मध्यम भारी प्रतीची व उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.

हवामान : हे प्रामुख्याने खरीप हंगामातील पीक असून, वार्षिक सरासरी पाऊसमान १००० ते २००० मि.मी. असणाऱ्या प्रदेशात हे पीक चांगल्या प्रकारे येते. जून ते सप्टेंबर या दरम्यान पडणारा पाऊस चांगले उत्पादन देतो. उशिरा पडणारा या पिकास मानवत नाही.

पूर्वमशागत : जमिनीची नांगरणी करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. त्यानंतर एकरी २ गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेतात टाकून कुळवाच्या पाळी द्यावी.

पेरणीची योग्य वेळ : या पिकाची पेरणी साधारणपणे १५ जून ते १५ जुलै या कालावधीत करावी. जुलैचा पहिला पंधरवडा हा पेरणीसाठी उपयुक्त मानला जातो.

बियाणे प्रमाण : पेरणीकरिता एकरी दीड ते दोन किलो बियाणे वापरावे. बियाण्याचा आकार लहान असल्याने बारीक वाळू, माती व शेणखत समप्रमाणात मिसळून पेरणी करावी. पेरणी शक्यतो तिफण किंवा पाभरीने करावी.

पेरणीचे अंतर : दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील अंतर १० सें.मी. इतके ठेवावे.

बीजप्रक्रिया : बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता प्रति किलो बियाण्यास कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम अशी प्रक्रिया करावी. त्यानंतर अझोस्पिरिलम २५ ग्रॅम व पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रति किलो या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

सुधारित वाण : पी.एन.एस.-६, फुले वैतरणा, सह्याद्री, फुले कारळा, आर.सी.आर.-३१७

विरळणी : कारळा बियाणे लहान असल्याने पेरणीवेळी एका जागी अधिक बियाणे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे रोपांची संख्या वाढून रोपांची वाढ जोमाने होत नाही. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून विरळणी करावी.

खत व्यवस्थापन : एकरी १६ किलो नत्र म्हणजे ३६ किलो युरिया व ८ किलो स्फुरद म्हणजे ५० किलो एस.एस.पी. द्यावे. या पैकी नत्राची अर्धी मात्रा आणि संपूर्ण स्फुरद पेरणीवेळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.

उत्पादन वाढीसाठी टिप्स...

१) नवीन संशोधित वाण सरळ व उंच वाढणारे असल्यास, फांद्या व फुलांची संख्या अधिक येण्यासाठी शेंडा खुडण्याची शिफारस केली आहे. ही शेंडा खुडणी पेरणीनंतर ५० दिवसांनी शेंड्यांकडील तीन पानांपर्यंत करावी.

२) कारळा पिकाच्या चिकट पराग कणांचे हवेमार्फत परागीभवन होण्यास अडचणी येतात. परिणामी, परागीभवन होऊन बी तयार होण्यासाठी कीटकांवर अवलंबून राहावे लागते. कारळाची फुले पिवळ्या रंगाची असून, पेरणीनंतर ५० ते ८० दिवसांपर्यंत टिकतात. त्याकडे कीटक आकर्षित होतात. एक एकर क्षेत्रासाठी एक मधमाशी पेटी ठेवल्यास उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ दिसून येते.

काढणी, मळणी व उत्पादन : हे पीक १०० ते ११० दिवसात कापणीस तयार होते. बोंडांचा वरील भाग काळा पडल्यावर काढणीस तयार झाल्याचे समजावे. पीक पक्व झाल्यावर बोंडातील दाणे मोकळे होतात. पिकाची काढणी योग्य वेळी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते काढणीनंतर दोन ते तीन दिवस उन्हात वाळवावे. नंतर बडवून बी मोकळे करून घ्यावे.

संजय बडे, ७८८८२९७८५९

(सहायक प्राध्यापक -कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com