आंबा कलमांचे पावसाळी हंगामातील व्यवस्थापन

गेल्या महिन्यात आंबा फळांची काढणी संपलेली आहे. पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आतापासून आंबा बागेचे व्यवस्थापन गरजेचे ठरते. जुलै-ऑगस्ट महिन्यांत कलमाच्या वयानुसार शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.
Mango
MangoAgrowon

डॉ. एम. बी. पाटील, अ. चं. देवळे

-----------------------------

राज्याचा विचार करता कोकण विभागात हापूस आणि मराठवाडा विभागात केसर आंब्याची लागवड आहे. गेल्या काही वर्षांत सघन पद्धतीने आंबा कलमांची लागवड वाढलेली आहे. या पद्धतीमुळे प्रति हेक्टरी कलमांची संख्या जास्त असते. तसेच उत्पादनात दुपटीने वाढ मिळते. आपल्याकडे आंब्याचे उत्पादन साधारणत: मार्च ते मेपर्यंत मिळते. जून महिन्यापासून पावसाळी हंगामास प्रारंभ होतो. या काळात आंबा कलमे आंतरशारीरिकरीत्या कमजोर झालेली असतात. कारण फळधारणेमुळे शरीरांतर्गत असणाऱ्या अन्नघटकांचा विनियोग फळांच्या वाढीसाठी झालेला असतो. या बाबींचा विचार करता पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पावसाळी हंगामापासून आंबा बागेचे व्यवस्थापन गरजेचे ठरते.

बागेचे व्यवस्थापन ः

१) पहिला पाऊस पडल्यानंतर वाफसा आल्यास हलकी वखरणी करावी. जमिनीचा उतार तपासून पावसाचे पाणी साचू नये यासाठी निचरा व्यवस्था करावी. तणांचे नियंत्रण करून बाग स्वच्छ ठेवावी.

२) फळांची काढणी झाल्यानंतर घन लागवडीत छाटणीचा अवलंब करावा. कारण लागवडीचे अंतर कमी असल्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांत मिसळतात किंवा लागतात. त्यामुळे आंतरमशागतींची कामे अवघड होऊन कलमांची वाढ नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे दरवर्षी कलमांची शिफारशीनुसार छाटणी करून वाढ नियंत्रणात ठेवावी. फळांची काढणी झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी फांद्यांचे शेंडे २० ते २५ सें.मी. शेंडयाजवळ छाटावेत, ही छाटणी झाल्यानंतर १ टक्का बोर्डोमिश्रण फवारावे. फुटलेल्या कोवळ्या पालवीची जोमदार वाढ होण्यासाठी युरिया १० ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पालवी दोन महिन्यांची झाल्यास जोमदार फांद्या ठेऊन रोगट आणि सुकलेल्या फांद्यांची छाटणी करावी.

पॅक्लोब्युट्राझॉल देण्याची पद्धत :

जुलै व ऑगस्ट महिन्यात पॅक्लोब्युट्राझॉलची मात्रा झाडाचा विस्तार व शिफारशीनुसार द्यावी. कलमाच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोल मात्रा देण्याची शिफारस आहे. यासाठी प्रथम झाडाचा पूर्व - पश्चिम आणि दक्षिण-उत्तर पसरण्याचा व्यास मीटरमध्ये मोजावा. त्याच्या सरासरीत प्रति मीटर ३ मिलि पॅक्लोब्युट्राझॉल वापरावे.

उदाहरणार्थ ...

१) कलमाचा पूर्व - पश्‍चिम व्यास १० मीटर आणि दक्षिण- उत्तर व्यास ८ मीटर

२) सरासरी व्यास = १० अधिक ८ = ९ मीटर

३) कलमाचा व्यास ९ मीटर × ३ मिलि पॅक्लोब्युट्राझॉल = २७ मिलि पॅक्लोब्युट्राझोल वापरावे.

टीप ः

१) शक्यतो जोमदार वाढलेल्या कलमांना पॅक्लोब्युट्राझॉल वापरावे. अशक्त कलमांसाठी वापरू नये.

२) मोहर येण्यापूर्वी ९०-१२० दिवस अगोदर पॅक्लोब्युट्राझॉल द्यावे, मात्र हवामान बदलानुसार म्हणजेच पाऊस असेल तर हा कालावधी १ ते २ आठवडे मागे पुढे झाल्यास चालतो.

३) कलमाचा व्यास मोजून प्रति व्यास ३ मिलि पॅक्लोब्युट्राझॉल प्रति लिटर पाणी या प्रमाणात कलमाला लागणारे द्रावण तयार करावे. कलमाच्या बुंध्याभोवती खताच्या रिंगणात १० ते २० सेंमी खोलीस वर्तुळाकार टिकावाच्या साह्याने ठरावीक अंतराने चार खड्डे पाडावेत. सम प्रमाणात प्रत्येक खड्ड्यात द्रावण ओतून ते मातीने

भरावेत.

४) पॅक्लोब्युट्राझॉल दिल्यानंतर कलमांना दुपटीने खतांची मात्रा द्यावी. या उपाययोजनेमुळे कलमांना साधारणत: दोन ते तीन आठवडे लवकर मोहोर येतो. या मोहोरात संयुक्त फुलांचे प्रमाण वाढते. त्यामुळे फळांचे जास्त उत्पादन मिळते.

सघन लागवडीमध्ये खत व्यवस्थापन :

१) पावसाळी हंगामात आंबा बागेस खत व्यवस्थापन हे महत्त्वाचे असते, पॅक्लोब्युट्राझॉल संजीवकाचा वापर केल्यास शिफारशीनुसार दुपटीने खत देणे गरजेचे असते, आंबा सघन पद्धतीने लागवड केलेली कलमे तिसऱ्या वर्षापासून उत्पादन देण्यास तयार होतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात कलमाच्या वयानुसार शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.

कलमाचे वय (वर्ष)---शेणखत (किलो) ---युरिया (किलो) --- सिंगल सुपर फॉस्फेट (किलो)---

म्युरेट ऑफ पोटॅश (किलो)

४ ---४ ---१.२०० ---१.२०० ---०.४००

५ ---५ ---१.५०० ---१.५०० ---०.५००

६ ---६ ---१.८०० ---१.८०० ---०.६००

७ ---७ ---२.१०० ---२.१०० ---०.७००

८ ---८ ---२.४०० ---२.४०० ---०.८००

९ ---९ ---२.७०० ---२.७०० ---०.९००

१० ---१० ---३ ---३ ---१

पुढे प्रत्येक वर्षी ---१० ---३ ---३ ---१

टीप ः खते देण्यासाठी कलमाच्या विस्ताराखाली ४० ते ५० सेंमी रुंद आणि १५ सेंमी खोल वर्तुळाकार चर खोदावा. यामध्ये पालापाचोळा, शेणखत किंवा गिरिपुष्पाचा पाला टाकून त्यावर खते टाकावीत. त्यानंतर मातीने चर बुजवून घ्यावा.

-------------------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. एम. बी. पाटील, ७५८८५९८२४२

(प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com