ऊस पीक वाढ, जमिनीनुसार पाणी नियोजन

आडसाली व पूर्वहंगामी उसामध्ये पाण्याचा ताण पडल्यास एका आड एक सरीतून पाणी द्यावे. उसाची खालील पक्व पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पीक ताणविरहित ठेवावे.
ऊस पीक वाढ, जमिनीनुसार पाणी नियोजन
Sugarcane Agrowon

डॉ. भरत रासकर

उसाला लागणाऱ्या पाण्याची गरज प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, हवामान विभाग, तापमान, मशागत पद्धती, पाणीवापर कार्यक्षमता यावर अवलंबून असते. उगवणीच्या अवस्थेत (४५ दिवसांपर्यंत) १२ टक्के पाणी, फुटवे फुटण्याच्या अवस्थेत (४५ ते १२० दिवस) २२ टक्के पाणी, मुख्य वाढीच्या अवस्थेत (१२० ते २७० दिवस) ४० टक्के पाणी तर पक्व होण्याच्या अवस्थेत (२७० ते ३६० दिवस) २६ टक्के पाण्याची गरज असते. सध्या पाणीटंचाईचा फुटवे, संख्या, कांड्यांची संख्या आणि वाढीवर परिणाम होऊ शकतो. पिकाच्या वाढीच्या वेळी खते घेण्याची प्रक्रिया चालू असते आणि त्यासाठी मुळांच्या कार्यकक्षेत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

प्रामुख्याने सुरू आणि पूर्वहंगामी उसाला पाण्याचा ताण जाणवतो.

१) उष्ण तापमानामुळे पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय आणि जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होऊन बाष्पीभवनाचा वेग वाढतो. पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. त्यामुळे या काळात योग्य ते व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात लक्षणीय घट येते.

२) पाण्याच्या ताणामुळे तीव्रतेनुसार ऊस उत्पादनात सरासरी १५ ते ५० टक्के इतकी लक्षणीय घट येते. बाष्पीभवनाच्या आधारे ५० टक्के ओल उडून गेल्यानंतर उसाला पाणी दिल्यास पाणी कमी लागते. उन्हाळी हंगामात तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते. मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळाद्वारे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. हरितद्रव्यांचे प्रमाण घटल्यामुळे पाने पिवळी पडू लागतात.

३) फुटवे लागणे आणि जोमदार वाढीचा कालावधी उन्हाळ्यात येतो, त्याच वेळी पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे कांड्यांची लांबी, संख्या आणि जाडी कमी होऊन वजनात घट येते. उसामध्ये तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते. साखर उतारा घटतो. पाण्याचा तीव्र ताण बसल्यास वाढ खुंटते.

पाचट आच्छादन ः

१) पाचट आच्छादनामुळे जमिनीला भेगा पडण्याची प्रक्रिया लांबते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढवता येते.

२) लागण केलेल्या उसामध्ये कार्यक्षम सात पाने ठेवून वाळलेली ४ ते ५ पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. अत्यंत तीव्र उन्हाळा जाणवत असलेल्या ठिकाणी पाचटाचे आच्छादन उपयोगी ठरते. उसाची तोडणी केल्यानंतर हेक्टरी ७.५ टन ते १० टनांपर्यंत पाचट निघते. कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीत या पाचटाचा वापर आच्छादनासाठी करावा, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. उन्हाळ्यामध्ये दिवसा तापमान आणि उष्णता जास्त असल्याने ओलावा थोपविण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. हे आच्छादन ठिबक सिंचनासोबत वापरणे जरुरीचे आहे. पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर १५ दिवसांवरून २१ दिवसांपर्यंत वाढवता येते.

३) आच्छादन केलेले पाचट मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीत गाडावे. पाणी बचतीसाठी शेतामध्ये सरी आड सरी पाचट टाकून पाण्याची बचत करता येते. पाचटाच्या वापरामुळे दोन महिने पाण्याचा ताण पडलेले पीक वाचवता येते.

४) पाचट आच्छादनामुळे जमिनीचे तापमान राखले जाते, त्यामुळे मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. ऊस लागवड केल्यानंतर दीड महिन्यापासून चार महिन्याच्या उसात पाचट टाकणे शक्य होणार आहे. त्यासाठी पाचट किंवा त्याची कुट्टी आच्छादनासाठी वापरावी. या तंत्राने महिन्याला एका पाण्याच्या पाळीवर ऊस वाचविणे शक्य आहे.

५) आडसाली व पूर्वहंगामी उसामध्ये पाण्याचा ताण पडल्यास एका आड एक सरीतून पाणी द्यावे. उसाची खालील पक्व पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पीक तणविरहित ठेवावे. ज्या सरीला पहिल्या रोटेशनला पाणी दिले आहे, त्यानंतरच्या सरीला दुसऱ्या रोटेशनला पाणी द्यावे. यामुळे ४० टक्के पाण्याची बचत होवू शकते.

ताण सहनशील ऊस जाती ः

१) पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व क्षारपड जमिनीत तग धरणाऱ्या ऊस जातींची शिफारस संशोधन केंद्राने केली आहे. कोएम ०२६५ (फुले २६५) आणि एमएस १०००१ (फुले १०००१) या जातींची लागवड करावी.

२) पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या मुळांची रचना खोलवर असते. कमी रुंदी आणि उभट पानांची रचना असलेल्या जाती पाण्याचा सहन ताण करतात.

३) ऊस कांडीवर आणि पानांवर पांढरा मेणाचा थर असलेल्या जाती पाण्याच्या ताणास सहनशील असतात. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या पानातील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी असते. पानांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.

पीक अवस्था, जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन ः

१) उन्हाळी हंगामात उसाच्या पानामध्ये ६८ ते ७० टक्के, पानाच्या देठात ७८ ते ८० टक्के, उसामध्ये ८० ते ८५ टक्के आणि मुळांमध्ये ७० ते ७५ टक्के पाणी पातळी असल्यास अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया योग्य रीतीने चालू राहते. वाफसा परिस्थितीतील उपलब्ध ओलावा ५० टक्के कमी झाल्यावर उसालापाणी द्यावे.

२) ऊस वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत. लागवड भारी जमिनीत केल्यास पाण्याचा ताण हे पीक सहन करू शकते. उगवणीचा कालावधी, फुटवे फुटण्याची अवस्था, मुख्य वाढीचा काळ आणि ऊस पक्व होण्याचा कालावधी या अवस्थांमध्ये पाणी नियोजन गरजेचे आहे.

३) फुटवे फुटणे आणि मुख्य वाढीचा काळ मार्च ते मे या प्रदीर्घ उन्हाळ्यात महिन्यांमध्ये पाण्याचा ताण पडतो. पयार्याने ४ ते ५ कांडी आखूड पडतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा लांब कांडी पडतात. म्हणून या महिन्यात उसाच्या मुळाच्या सान्निध्यात पुरेशी ओल ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

४) जमिनीच्या प्रकारानुसार ज्यांच्याकडे पुरेसे पाणी आहे. त्यांनी उन्हाळी हंगामात तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे. संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला आणि नंतरच्या अवस्थेत भरपूर पाणी दिले तरी नुकसान भरून येत नाही.

संवेदनशील अवस्था ---कालावधी ---जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देण्याचे दिवस

हलकी ---मध्यम ---भारी

उगवणीचा कालावधी ---४५ दिवसांपर्यंत ---५- ६ ---६-७ ---८-१०

फुटवे फुटणे ---४५ ते १२० दिवस ---६-७ ---७-१० ---१२-१५

मुख्य वाढीचा काळ ---१२० ते २७० दिवस ---७-८ ---१०-१२ ---१२-१५

ऊस पक्व होण्याचा कालावधी ---२७० ते ३६० दिवस ---१० ---१२-१५ ---१५-२०

संपर्क ः डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७ (ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.