Grape : पावसाळी वातावरणातील द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष विभागामध्ये पावसाळी वातावरण असून, काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्याचे चित्र दिसते. या वेळी वेगवेगळ्या स्थितीत असलेल्या बागेतील व्यवस्थापन कशा प्रकारे असावे, याची माहिती घेऊ.
Grape
Grape Agrowon

कलम करण्याकरिता तयारी ः

साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये लागवड केलेल्या खुंट रोपांचे व्यवस्थापन चांगले झालेले असल्यास कलम करण्याची वेळ जवळ येत आहे. द्राक्ष बागेत खुंट रोपांवर आवश्यक त्या सायन काडीचे कलम करण्याचा कालावधी हा ऑगस्ट महिन्यापासून सुरू होतो. आपल्याकडे आजपासून ४५ दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे.

अ) ज्या बागेमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान व कमी पाणी असलेल्या परिस्थितीत खुंट रोपांची आवश्यक तितकी वाढ झालेली नसेल, अशा बागेमध्ये या वेळी लहान असलेल्या खुंटरोपांचा रिकट घेता येईल किंवा ज्या ठिकाणी खुंट रोपांच्या बऱ्याचशा फुटी दिसून येतात. त्यापैकी सर्वच फुटी बारीक असल्यास अशा फुटींपैकी कोवळ्या अशा तीन फुटी राखून इतर फुटी काढून घ्याव्यात. या खुंट रोपांना नत्र जास्त प्रमाणात देणे आवश्यक असेल. तेव्हा उपलब्ध खतांपैकी युरिया किंवा अमोनिअम सल्फेट १० ग्रॅम प्रति रोप या प्रमाणे दोन वेळा चार दिवसाच्या अंतराने द्यावे.

ब) ज्या भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे, अशा ठिकाणी खुंट रोपांची विशेष काळजी घेण्याची गरज असेल. ज्या ठिकाणी खुंट रोपांची वाढ जास्त झाली आहे, अशा ठिकाणी या वेळी फार काही करण्यासारखे नसेल. कलम करतेवेळी गरज असलेल्या फुटी ठेवून अन्य फुटी काढून घेता येतील.

क) जुन्या खुंटरोपावर जास्त पाऊस झालेल्या स्थितीमध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असेल. अशा वेळी क्लोरोथॅलोनील दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

ड) ज्या भागामध्ये पाऊस कमी झालेला असेल, अशा ठिकाणी मुळांची वाढ होण्याकरिता पाणी पुरेसे दिले जाईल, याची काळजी घ्यावी. ज्या काडीवर बगलफुटी जास्त प्रमाणात निघालेल्या आहेत, अशा रोपांवरील बगलफुटी दोन टप्प्यांत काढता येतील. सुरुवातीला दोन ते तीन बगलफुटी काढाव्यात. पुढे पंधरा दिवसाच्या अंतराने उरलेल्या दोन ते तीन बगलफुटी काढल्यास काडीची जाडी मिळण्यास मदत होईल.

Grape
द्राक्ष बागेतील स्ट्रोमॅशिअम बारबॅटम खोडकिडीचे व्यवस्थापन

काडीची परिपक्वता ः

ज्या बागेमध्ये सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी नुकताच संपत आलेला आहे, अशा ठिकाणी बागेत पाऊस झालेला असल्यास काडीची वाढ जोमात होईल. शेंड्याकडील फुटींवरील पेऱ्यातील अंतर जास्त प्रमाणात वाढताना दिसून येईल. याच कोवळ्या फुटींवर रोगांचा प्रादुर्भावही तितक्याच प्रमाणात दिसून येईल. काडीची जाडी व काडीवर आवश्यक असलेला फलधारीत डोळा व घड तयार होण्यासाठी काडीवर साधारणपणे सतरा पाने आवश्यक असतात. ढगाळ वातावरण किंवा झालेल्या पावसामुळे वेलीत जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे फुटीचा जोमही तितकाच वाढतो. असे झाल्यास वाढत असलेल्या फुटीच्या जोमामुळे परिपक्व होत असलेली काडी कच्ची राहते. काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. या वेळी बागेत दोन ओळीच्या मध्यभागी सुप्तावस्थेमध्ये असलेली मुळे कार्यक्षम होतात. या भागामध्ये कधीही उपयोगात न आलेले अन्नद्रव्ये या वेळी मुळांकडून उचलली जाते व फुटींची वाढ सुरू राहते. या वातावरणात यावर फारशा उपाययोजना नसल्या तरी वेलीला पालाशची उपलब्धता महत्त्वाची असेल. वेल सूक्ष्मघड निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे स्फुरद आणि पालाशयुक्त ग्रेडचा वापर महत्त्वाचा राहील. उदा. ०-९-४६, ०-४०-३७, ०-५२-३४ इ. ज्या बागेत पाऊस झाला व बोदामध्ये पाणी जास्त झालेल्या स्थितीमध्ये फवारणीद्वारे खते देणे फायद्याचे राहील.

Grape
द्राक्ष बागेतील पिठ्या ढेकूण किडीचे व्यवस्थापन

ज्या बागेत काडीची परिपक्वता सुरू झालेली आहे, काडी तळातून तीन ते चार डोळे परिपक्व झालेली आहे किंवा काडी फक्त तळातून दुधाळ रंगाची झालेली आहे, अशा परिस्थितीतील बागेमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे असेल. काडीवर पानांची

संख्या पूर्ण झाली व आता नवीन फुटी जोमात वाढताना दिसत असल्यास शेंडा पिंचिंग करणे व बगलफुटी काढणे फायद्याचे राहील. जास्त जोम असलेल्या स्थितीमध्ये शेंडा पिंचिंग करतेवेळी फक्त टिकली मारावी. जमिनीतून चार ते पाच किलो एसओपी द्यावे. त्यामुळे वाढ नियंत्रणात राहून काडीची परिपक्वता सुरू होईल.

काड्यांची विरळणी या वेळी करता येणे शक्य नसले तरी गरजेपेक्षा जास्त काड्या जिथे आहेत, व त्या काड्यांची जाडी फारच कमी आहे. अशा काड्या एक डोळा राखून काढून घेता येतील. यामुळे उपलब्ध कॅनोपीमध्ये सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. सर्व काड्या यावेळी तारेवर बांधून घेतल्यास मोकळी कॅनोपी राहून त्यामध्ये हवा खेळती राहील व काडी परिपक्वतेसाठी मदत मिळेल. विविध रोग व किडींच्या नियंत्रणाकरिता फवारणी केल्यास कव्हरेजही चांगले मिळेल.

Grape
Sangali Grapes: सांगलीत द्राक्ष बागांसाठी सध्या पोषक वातावरण

रोग नियंत्रण ः

सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेल्या पावसामुळे बागेत आर्द्रता जास्त वाढलेली आहे. मुळांच्या कक्षेत पाणी बऱ्यापैकी जमा झालेले असल्यामुळे या वेळी पांढऱ्या मुळांची उत्पत्ती जास्त झालेली असावी. अशा स्थितीमध्ये बगलफुटींची वाढ जास्त जोमात झालेली दिसेल, तसेच शेंडा वाढही जोमात असेल. यामुळे एकंदरीत कॅनोपी जास्त होऊन गर्दी झालेली दिसून येईल. पावसाळी वातावरणात नवीन फुटींवर डाऊनी मिल्ड्यू करपा व जिवाणूजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसेल. या वेळी काडीची परिपक्वता सुरू झालेल्या बागेमध्ये बोर्डो मिश्रण अर्धा टक्के या प्रमाणे फवारावे. या सोबत स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणीही करता येईल. आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी यावेळी टाळावी.

दाट कॅनोपी, वाढलेली आर्द्रता याचा विचार करता जैविक नियंत्रणावर जोर देणे महत्त्वाचे असेल. यामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनास यांचा समावेश करता येईल. ट्रायकोडर्मा मांजरी वाईनगार्ड २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करता येईल. ही फवारणी तीन ते चार दिवसाच्या अंतराने चार ते पाच वेळा करावी. पावडर स्वरूपात उपलब्ध मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे ड्रेंचिंग करता येईल. चार ते पाच दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळी हे ड्रेंचिग करून घ्यावे.

बोर्डो मिश्रणाची फवारणी करतेवेळी द्रावणाचा सामू उदासीन (सात) असेल, याची काळजी घ्यावी. ज्या बागेत उशिरा छाटणी झालेली आहे, व आता सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी सुरू झालेल्या बागेमध्ये ही फवारणी टाळावी.

--------

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com