बुरशीजन्य अन् जिवाणूजन्य करपा रोगावरील उपाययोजना

बहुतांश द्राक्ष विभागात पावसाची सुरुवातही होताना दिसत आहे. खरड छाटणी होऊन सुमारे २ महिने कालावधी झाला आहे. या अवस्थेमध्ये द्राक्ष बागांमध्ये जिवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
Grape
GrapeAgrowon

डॉ. सुजोय साहा, सुमंत कबाडे, डॉ. रत्ना ठोसर, डॉ. आर. जी. सोमकुंवर

बहुतांश द्राक्ष (Grape) विभागात पावसाची सुरुवातही होताना दिसत आहे. खरड छाटणी होऊन सुमारे २ महिने कालावधी झाला आहे. या अवस्थेमध्ये द्राक्ष बागांमध्ये (Grape Diseases) जिवाणूजन्य करपा आणि बुरशीजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या दोन्ही रोगांची लक्षणे बऱ्यापैकी सारखी असल्यामुळे त्यातील फरक ओळखताना संभ्रम निर्माण होऊ शकतो. रोग नियंत्रणासाठी वेगवेगळ्या अनावश्यक बुरशीनाशकांचा वापर केला जातो. त्यातून प्रभावी रोग नियंत्रण मिळण्यापेक्षा फक्त उत्पादन खर्चात वाढ होते. शेतकऱ्यांना अर्थिक नुकसान सहन करावे लागते. करपा रोगाचे हे दोन प्रकार असून, त्यात बुरशी किंवा जिवाणू अशा कारणीभूत घटकांमुळे फरक पडतो. नेमकी लक्षणे ओळखता आल्यास रोग व्यवस्थापन सोपे होते.

Grape
द्राक्ष बागेतील पिठ्या ढेकूण किडीचे व्यवस्थापन

बुरशीजन्य करपा :

द्राक्ष पिकात या रोगाचा प्रादुर्भाव कोलेटोट्रिकम ग्लेओस्पोरॉईडीस किवा एल्सिनॉई अंप्लिना या बुरशीमुळे होते. या बुरशीचे बीजाणू (कोनिडिया) प्राथमिक प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतात. मागील हंगामातील रोगग्रस्त भागावर हे बीजाणू सुप्तावस्थेत राहतात. पुढील हंगामात अनुकूल वातावरण मिळताच नवीन फुटींवर बाधा करतात. तीन-चार दिवस ३२ अंश सेल्सिअस तापमान व पाऊस असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

या रोगाची प्रमुख लक्षणे -

-बुरशीजन्य करपा रोगामुळे द्राक्षाच्या पानावर बारीक काळसर गोलाकार ठिपके पडतात.

-काळ्या डागांभोवती पिवळसर रंगाची गोलाकार रिंग असल्यास ती बुरशीजन्य करपा रोगाची लक्षणे असल्याचे स्पष्ट होते.

-रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पानाचे भाग वाळायला सुरुवात होते. छिद्र पडते, यालाच “शॉट होल”असे म्हणतात. या छिद्राभोवतीही पिवळसर रंगाची एक गोल रिंग तयार होते. त्याच्या पुढील अवस्थेमध्ये संपूर्ण पान करपते.

-झाडाच्या सर्व भागांवर प्रादुर्भाव होतो.

-पानांवर असंख्य लहान, गोलाकार आणि लालसर ठिपके आढळून येतात. रोगग्रस्त पाने आकारहीन व वेडीवाकडी दिसतात.

-द्राक्ष काड्यावरही सुरुवातीला जांभळट-तपकिरी रंगाचे उभट गोलाकार ठिपके आढळतात. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून ठिपक्यांचा मधला भाग खोलगट होतो. त्यांची व्याप्ती कडापर्यंत होते.

-नवीन फुटीवर जास्त प्रादुर्भाव झाल्यास शेंड्याचा भाग करपतो.

-फुलोरा असताना प्रादुर्भाव झाल्यास द्राक्षाचा फुलोरा करपून नष्ट होतो. प्रादुर्भाव मण्यावर असल्यास त्या ठिपक्यांचा आकार पक्ष्याच्या डोळ्यांसारखा दिस असल्याने काही ठिकाणी ‘बर्डस आयस्पॉट’ म्हणूनही ओळखतात.

Grape
द्राक्ष बागेतील रोगाचे जैविक व्यवस्थापन

व्यवस्थापन :

-रोगग्रस्तभाग छाटून नष्ट करावा.

-घड काढणी झाल्यावर बुरशीग्रस्त भाग किंवा जुन्या रोगग्रस्त फांद्या नष्ट करून द्राक्ष बाग स्वच्छ ठेवावी.

-बुरशीजन्य करपा नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

थायोफेनेट मिथाईल (७० % डब्ल्यू. पी.) १ ते १.२ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम (५०% डब्ल्यू. पी.) १ ते १.२ ग्रॅम.

हेक्साकोनॅझोल (५% एस. सी.) ०.७५ ते ०. ८० मिलि ही फवारणी रोगनियंत्रणाबरोबरच शेंडा मारण्यासाठीही उपयोगी ठरते.

-मांजरी वाइनगार्ड २ ते ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रत्येकी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

-मांजरी ट्रायकोशक्ती जमिनीमध्ये १० ग्रॅम प्रति एकरी या प्रमाणे ठिबकद्वारे ड्रेंचिंग सुरू ठेवावे.

जिवाणूजन्य करपा :

द्राक्ष पिकात या करपा रोगाचा प्रादुर्भाव झान्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस विटिकोला या जिवाणूमुळे होतो. साधारणतः बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास पानांवर जिवाणूजन्य करपा दिसून येतो.

-रोगाची लक्षणे पानांच्या खालील पृष्ठभागावर दिसतात.

-पानांच्या खालील पृष्ठभागावर आणि मुख्य नसावर छिद्र नसलेले कोनात्मक काळे डाग एकत्र होतात. मोठे ठिपके तयार होतात.

-कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटींची वाढ खुंटते किंवा थांबते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी फुटीची वाढ कमीअधिक झालेली दिसुन येईल.

-या रोगामध्ये डागांभोवती पिवळसर रंगाची रिंग तयार होत नाही.

-रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपात असेल, तर मोठ्या प्रमाणावर पानगळती होते. प्रामुख्याने खोडावर चीर किंवा भेग पडते.

-जास्त प्रमाणात वाढ नियंत्रकांचा (पी.जी.आर) वापर केल्यामुळेही वेलीच्या खोडावर गाठ येऊन भेग पडण्याची शक्यता उद्‌भवते. मात्र गाठ न येताही खोडावर भेग पडलेली दिसत असेल तर ते जिवाणूजन्य करपा रोगाचे लक्षण आहे.

-वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश छाटणी, शेंडा मारणे, घडांची विरळणी तसेच गर्डलींगच्या वेळी झालेल्या जखमेमधून होते. हे जिवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यामध्ये जिवंत राहतात. गाभ्यातून वाहणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन, निरोगी फांद्या, फुटी व घडांमध्ये जातात.

व्यवस्थापन :

-रोगाच्या नियंत्रणाकरिता ताम्रयुक्त बुरशीनाशके किंवा मॅन्कोझेब (७५% डब्ल्यूपी) २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा

कासुगामायसिन (५%) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड (४५% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ७५० ग्रॅम प्रति हेक्टर ही फवारणी फायदेशीर ठरेल.

-७ ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

-पावसाळ्याच्या दिवसांत फवारणी करताना सिलिकॉनयुक्त चिकटद्रव्याचा १ मिलि प्रति लिटर याप्रमाणे वापर करावा.

-या रोगाचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसीन* चा वापर करू नये.

फवारणीवेळी घ्यावयाची काळजी ः

१. वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक फवारताना स्वतःची काळजी घ्यावी.

२. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावे.

३. झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.

४. कीडनाशक हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.

५. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.

६. फवारणीचे मिश्रण करतेवेळी किंवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धूम्रपान करणे टाळावे.

७. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे.

डॉ. सुजोय साहा, ९४५०३९४०५३

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com