Agriculture Mechanization : यांत्रिकीकरणातून मिळेल अर्थव्यवस्थेला चालना

पूर्वी लोकांमध्ये बेरोजगारी वाढेल, या भीतीपोटी यांत्रिकीकरणाला विरोध होत असे. मात्र, यांत्रिकीकरणामुळे रोजगारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, पूर्वीपेक्षा अधिक कुशल आणि नवीन काही शिकू इच्छिणाऱ्या लोकांसाठी अधिक संधी मिळून, अर्थ व्यवस्थेला चालना मिळू शकते.
Agriculture Mechnization
Agriculture MechnizationAgrowon

गेल्या दोन दशकापासून सरकार आणि नियोजनकर्त्यांनी कृषी यांत्रिकीकरणाची (Agriculture Mechanization) निकड जाणली आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. केवळ मनुष्यशक्ती किंवा पशुशक्तीवर अवलंबून राहिल्यामुळे उत्पादकता खुंटल्यासारखी होते. कृषी यांत्रिकीकरणाच्या (agriculture Machinery) प्रक्रियेचा वेग हा प्रामुख्याने आर्थिक मुद्यांवर अवलंबून राहील. उदा. कच्च्या मालाची उपलब्धता, उपसाधने, ट्रॅक्टर उद्योगाची क्षमता (Capacity Of Tractor Industry), शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income), पिकांच्या हंगामाचे यश इ.

२०३० पर्यंत कृषिशक्तीची उपलब्धता ४ किलोवॉट प्रति हेक्टर या पातळीपर्यंत न्यायचे ध्येय आहे. त्यावेळी अन्य बाबी उदा. ट्रॅक्टर्स, कृषी औजारे व यंत्रसामग्री, सुट्टे भाग, विद्युत मोटार, इंधन व वंगणे इ. घटकांची गरज आजच्या दहा पटीने वाढलेली असेल. कृषी क्षेत्रामध्ये वाढलेल्या यांत्रिकी व विद्युत ऊर्जेचा परिणाम अन्य उद्योगांना चालना देण्यासाठी होतो. उदा. पोलाद, टायर-ट्यूब, डिझेल/पेट्रोल, वंगण आणि विद्युत उपकरणे इ. या आधुनिक यंत्रामुळे शेतीतील कष्ट कमी होतील, कामांचा वेग वाढेल. त्यामुळे शेतीकडे तरुणही मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील.

Agriculture Mechnization
कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी वाशीम जिल्ह्यात मिळणार अनुदान

यांत्रिकीकरणात वाढीसाठी विविध उपाययोजनांची आवश्यकता ः

१) कृषी औजारांसाठी अनुदानातून सरकारी पाठबळ मिळाले पाहिजे.

२) करार शेतीला प्रोत्साहन देतानाच त्यावर नियंत्रण ठेवणारी संस्था असावी.

३) शेती औजारांवरील करात योग्य सवलती दिल्या जाव्यात.

४) कृषी अभियांत्रिकी पदवीधरांना कृषी औजारे सेवा केंद्र, औजारे विक्री व दुरुस्ती केंद्र, यंत्रे व औजारे भाडेपट्टीवर देण्याची केंद्रे यांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन व कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा व्हावा.

Agriculture Mechnization
Agriculture Subsidy : कृषी विभागाची शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आघाडी

महत्त्वाचे...

१. कृषी यांत्रिकीकरणामुळे पीक उत्पादन खर्चात सुमारे ४० टक्क्याने बचत होते. बियाणे, खते, कीडनाशके इ. निविष्ठांचा काटेकोर वापर करणे शक्य होते.

२. अनेक कृषी अवजारे व यंत्रांच्या किमती या अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. हा कृषी

यांत्रिकीकरणामधील प्रमुख अडथळा ठरत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी सुधारित अवजारे भाड्यावर देण्याची केंद्रे स्थापन करता येतील.

३. संशोधक, कृषी अवजारे उत्पादक व यंत्रांचा प्रत्यक्ष वापरकर्ते (चालक किंवा मालक) शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ आवश्यक आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधकही शेतकऱ्यांमध्ये सातत्याने मिसळत राहतील, असे नियोजन व्हायला हवे. त्यामुळे एकमेकातील विचारांची, समस्या व त्यांची उत्तरे यांची देवाणघेवाण अधिक झपाट्याने होवू शकेल.

४. गुणवत्ता जपतानाच कृषी यंत्रे, अवजारांच्या निर्मितीतील प्रत्येक पायरीवर खर्च व किमती कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

५. यंत्रे व अवजारे खरेदीमध्ये आवश्यक तो वित्त पुरवठा वेळेवर केला गेला पाहिजे.

भारतातील कृषी यांत्रिकीकरण एक दृष्टीक्षेप...

१. आपल्या देशात ३०.७७ दशलक्ष शेतीकाम करणारी जनावरे असून, आपणास ११.६९ दशलक्ष किलो वॉट शक्ती उपलब्ध होते.

२. साधारणपणे १.५ ते २ हेक्टर क्षेत्रासाठी एक बैलजोडी लागते.

३. भारतामध्ये ट्रॅक्टरची उपलब्ध शक्ती ही १.६४ किलोवॉट प्रति हेक्टर इतकी आहे.

४. १५ हेक्टर मागे एक ट्रॅक्टर असला पाहिजे, या हिशोबाप्रमाणे एक हजार हेक्टर क्षेत्रामागे ६६ ट्रॅक्टर आवश्यक असतात.

५. पॉवर टिलरची उपलब्ध शक्ती ०.०२८ किलोवॉट प्रति हेक्टर इतकी आहे.

६. सहा हेक्टर मागे एक पॉवर टिलर या हिशोबाने १६६ पॉवर टिलर्स एक हजार हेक्टरसाठी लागतात.

७. सध्या ५० टक्के शेतकरी हे ३१ ते ४० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर्स वापरतात. मात्र अलीकडे शेतकऱ्यांचा कल ४१ ते ६० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर्स विकत घेण्याकडे वाढत आहे.

८. ट्रॅक्टर्स वापरणाऱ्या भारतातील शेतकऱ्यांचे क्षेत्रनिहाय विभाजन ः

१० हेक्टरपेक्षा कमी - ४ टक्के

१० हेक्टर ते ४० हेक्टर - ५३ टक्के

४० हेक्टरपेक्षा जास्त - ४३ टक्के

कृषी यांत्रिकीकरणाचे फायदे

१. पीक उत्पादकतेत वाढ ः १२-३४ टक्के

२. सुधारित पेरणी यंत्राच्या वापराने - अ) बियाण्यांमध्ये बचत ः १५ ते २० टक्के, ब) खतांमध्ये बचत - १२ ते १६ टक्के.

३. पिकाच्या सघनतेत वाढ ः ४ ते २२ टक्के

४. शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात बचत ः २९ ते ४९ टक्के.

भविष्यातील ट्रॅक्टर...

यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टर असा आपला समज आहे. अर्थात, देशातील अनेक भागामध्ये ट्रॅक्टरचे प्रमाण अधिक असले तरी अजून संपृक्तावस्था यायची आहे. मात्र, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा व मागणीनुसार ट्रॅक्टरमध्ये बदल करावे लागणार आहे. त्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असू शकतो.

अ) इंधन कार्यक्षमता

ब) मनुष्याच्या इंद्रियांची मर्यादा लक्षात घेऊन त्याला सहजगत्या हाताळता येतील असे ट्रॅक्टर.

क) सरधोपट सर्वांसाठी एक सारखे ट्रॅक्टरची निर्मिती करण्यापेक्षा विशिष्ट कामे डोळ्यासमोर ठेऊन बनवलेले खास ट्रॅक्टर्स.

या तीन मुख्य बाबींचा विचार करून भारत सरकारने स्थापन केलेल्या एका कार्यगटाने पुढील शिफारशी केलेल्या आहेत.

१. फळबागांमध्ये आंतरमशागत, फवारणी आणि छाटणी करण्यायोग्य कमी उंचीचे, पुढील व मागील चाकांना गती देणारे ट्रॅक्टर.

२. ट्रॅक्टरच्या इंजिनखालील भागापासून जमिनीपर्यंतची मोकळी जागा किमान ३० ते ६० सें. मी. इतकी कमी-जास्त करता येईल अशी रचना असावी. त्यामुळे कपाशी, ऊस, मका इ. पिकांमध्ये आंतरमशागत करणे सोपे होईल.

३. केवळ आंतरमशागतीकरिता उपयुक्त असे तीनचाकी ट्रॅक्टर्स हे स्वस्त राहून शेतीमध्ये गतिशीलता साधतील.

४. ट्रॅक्टरला खास जोडणीची व्यवस्था असावी. उदा. जोडलेल्या ट्रॉलीमध्ये शेती उत्पादने सहजपणे भरणे किंवा काढणे सोपे होईल. तसेच आवश्यकतेनुसार शेतीच्या पृष्ठभागाचे लेव्हलींगच्या जोडणी, जंगल भागामध्ये कामे करण्यायोग्य जोडणे किंवा बांधकाम क्षेत्रातही सामानाची हाताळणी, चढउतार करण्यासाठी योग्य जोडणी.

५. स्टिअरिंग व्हील आणि इतर सर्व नियंत्रक घटक इ. समोरील किंवा मागच्या दिशेने कार्यान्वित करण्यासाठी योग्य व्यवस्था केल्यास ट्रॅक्टरचे उपयोगितामूल्‍य वाढू शकेल.

पीकनिहाय उपलब्ध असणारी आणि भविष्यात आवश्यक अवजारे

पीक --- उपलब्ध अवजारे --- भविष्यात आवश्यक अवजारे

भात --- फुले ॲटोमॅटिक पल्टी नांगर, कुळव, कल्टिव्हेटर, पॉवर टिलर, चिखलणी यंत्रे, भात लावणी चौकट, फवारणी यंत्रे, शंख कोळपे, मळणी यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर्स, युरिया ब्रिकेट बनविण्याचे यंत्रे, स्वयंचलित कापणी यंत्रे --- भात रोपे लागवड यंत्र, ॲक्झियल फ्लो फाळणी यंत्र, मिनी कंबाईन हार्वेस्टर, युरिया ब्रिकेट लावणी यंत्र, स्वयंचलित कापणी-बांधणी यंत्र

गहू --- फुले ॲटोमॅटिक पलटी नांगर, कुळव, कल्टिव्हेटर, पॉवर टिलर, चिखलणी यंत्रे, फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर्स, युरिया ब्रिकेट बनविण्याचे यंत्रे, स्वयंचलित कापणी यंत्रे --- शून्य मशागत पेरणी यंत्र, गादी वाफा पेरणी यंत्र, कापणी-बांधणी यंत्रे

ऊस --- फुले ॲटोमॅटिक पल्टी नांगर, फुले विद्यूत मोटारचलित ऊस बेणे तोडणी यंत्र, फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र, कुळव, कल्टिव्हेटर, पॉवर टिलर, चिखलणी यंत्रे, फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर्स, युरिया ब्रिकेट बनविण्याचे यंत्रे, स्वयंचलित कापणी यंत्रे, ऊस लागवड यंत्र, स्वयंचलित खुरपणी यंत्र, कोयते, खत देण्याची पहार --- ऊस बेणे कापणी यंत्र, ऊस तोडणी यंत्र,ऊस फवारणी यंत्र, ट्रॅक्टरचलित ऊस खोडवा पिकांसाठी खत पेरणी अवजार.

कपाशी/कापूस --- फुले ॲटोमॅटिक पल्टी नांगर, कुळव, कल्टिव्हेटर, पॉवर टिलर, चिखलणी यंत्रे, फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर्स, युरिया ब्रिकेट बनविण्याचे यंत्रे, स्वयंचलित कापणी यंत्रे, फवारणी यंत्रे, सड चिमटा, ट्रॅक्टरचलित श्रेडर, हवेच्या दाबावर कार्यान्वित टोकण यंत्र, मनुष्यचलित/ट्रॅक्टर्सचलित वेचणी यंत्र, यांत्रिक सड चिमटा

ज्वारी --- फुले ॲटोमॅटिक पल्टी नांगर, ज्वारी काढणी यंत्र ,कुळव, कल्टिव्हेटर, पॉवर टिलर, चिखलणी यंत्रे, फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे, कंबाईन हार्वेस्टर्स, युरिया ब्रिकेट बनविण्याचे यंत्रे, स्वयंचलित कापणी यंत्रे, फुले बंदिस्त वाफे तयार करण्याचे अवजार --- स्वयंचलित आंतरमशागत यंत्रे, ज्वारी कापणी यंत्रे

फळबागा --- खड्डे खोदणी यंत्रे, फळबागांसाठीची उपयुक्त अवजारे, मिस्ट-ब्लोअर, फुले दोन ओळीतील तसेच दोन झाडांमधील तण काढणी यंत्र, फुले श्रेडर, फुले ऑफसेट फळबागा व्यवस्थापन यंत्र --- हवेच्या दाबावर कार्यान्वित फवारणी यंत्रे, इलेक्ट्रोस्ट्रॅटीक फवारणी यंत्रे, फळ प्रतवारी यंत्र.

भाजीपाला --- फवारणी यंत्र --- भाजीपाला रोप लावणी यंत्र, कांदा रोपे लागवड यंत्र, कांदा पात कापणी-प्रतवारी यंत्र --- शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेणे.

इतर महत्त्वाची अवजारे --- फुले वनौषधी कवच फोडणी यंत्र, फुले शेवगा काढणी झेला, फुले मोल नांगर इ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com