Millipede Attack : नव्या रोपांवर होतोय वाणी किडीचा प्रादुर्भाव

आता बऱ्यापैकी पाऊस सुरू झालेला असल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद अशा पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत पाऊस झालेला नसल्यामुळे धाडस करत उपलब्ध ओलितावर किंवा धूळ पेरणी केली.
Millipede Attack
Millipede AttackAgrowon

सचिन आढे, डॉ. नितीन कुंभार

आता बऱ्यापैकी पाऊस सुरू झालेला असल्यामुळे कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), तूर, मूग व उडीद अशा पिकांच्या पेरणीला (Kharif Sowing) वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उशिरापर्यंत पाऊस झालेला नसल्यामुळे धाडस करत उपलब्ध ओलितावर किंवा धूळ पेरणी केली. अशा लवकर लागवड केलेल्या शेतातील पिके अंकुरण ते रोपे अवस्थेत (१० ते १५ दिवस) आहेत. या पिकांवर वाणी (पैसा) या किडीचा प्रादुर्भाव (Millipede Pest Attack) होताना दिसत आहे. विदर्भ व मराठवाड्यात मागील २ -३ वर्षांपासून खरीप पिकावर जास्त प्रादुर्भाव होत आहे.

स्थानिक नाव वाणी किंवा पैसा असलेल्या या किडीला इंग्रजीमध्ये मिलीपेड म्हणतात. ही ज्वारीवरील मुख्य कीड असून, अलीकडे अन्य खरीप पिकांवरही तिने आपला मोर्चा वळवला आहे. अंकुर ते रोपे कुरतडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही उभे राहू शकते.

Millipede Attack
Pest Management: योग्य कीड-रोग व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात वाढ

किडीची ओळख व जीवनक्रम :

-किडीला असंख्य पाय असल्याने या किडीला ‘मिलीपेड’ असे म्हणतात. हाताचा स्पर्श झाल्यास कीड गोल आकारात आकुंचित पावते. हे पैशाप्रमाणे दिसत असल्याने स्थानिक पातळीवर पैसा या नावाने ओळखली जाते.

-मिलिपीडच्या बहुतेक प्रजाती काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात, तर काही चमकदार रंगाच्या असतात.

-प्रौढ ६ ते ७ सेंमी लांब व ७-८ मिमी रुंदीचे असतात.

-या किडीमध्ये लहान (५ मिमी लांबी) व मोठ्या (६ ते ७ सेंमी लांबी) अशा दोन प्रजाती आढळतात.

-मादी ओलाव्याच्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेल्या काडीकचरा, पीक अवशेषांमध्ये एकाच वेळी १० ते २५० पर्यंत अंडी घालते.

-ती उबल्यानंतर ७ ते १२ आठवड्यांनी लहान पिले बाहेर येतात.

-या किडीच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात आर्द्रता, उष्ण व दमट असलेले वातावरण पोषक असते.

-वर्षभर सुप्तावस्थेत राहते. मे महिन्यातील पूर्वमोसमी व जून महिन्यातील पावसाने पुढील जीवनक्रम चालू होतो.

Millipede Attack
Dangerous Millipede: घातक ‘पैसा’

नुकसान व प्रादुर्भाव लक्षणे

-प्रामुख्याने खरिपात, पेरणीनंतर रोपावस्थेत प्रादुर्भाव होतो.

-रोपे जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात.

-एकरी रोपांची संख्या घटते. उत्पादनात लक्षणीय घट येते.

- जास्त प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवते.

उपयोजना :

-पीक लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी हलकी वखरणी करावी. (पीक ३० ते ३५ दिवसांपर्यंत दोन ते तीन कोळपणी करणे गरजेचे आहे.)

-पेरणीपूर्वी पिकांचे अवशेष व पालापाचोळा गोळा करून नष्ट करावेत किंवा कंपोस्ट खत तयार करावे. स्वच्छ शेतामध्ये मादी अंडी घालत नाही किंवा कमी प्रमाणात घालते.

- ही कीड बांधावरील बारीक झुडपे, गवत व तणांतील ओलाव्यात राहते. बांधावरील गवत नष्ट करून बांध नेहमी स्वच्छ ठेवावेत.

-समूहात आढळणारी कीड फावड्याच्या साह्याने किंवा हातात हातमोजे घालून वेचावी. नंतर नष्ट करावी.

-तूट किंवा खाडे भरताना बियाण्याबरोबर दाणेदार कीडनाशकांचा वापर करावा. त्यामुळे उपद्रव कमी होतो.

-कीड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ३ मिलि किंवा क्लोरपायरिफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५% ईसी) (संयुक्त कीडनाशक) १.५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी (या कीडनाशकाची मिलीपेड या किडीसाठी शिफारस नाही. मात्र कापूस पिकासाठी आहे.)

-रोपांच्या मुळाजवळ पंपाचे नोझल काढून ‘ड्रेंचिंग’ केल्यास बुंध्यालगत मातीत असलेल्या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

-कार्बोसल्फान (१०% दाणेदार), क्लोरपायरिफॉस (१०% दाणेदार) किंवा फिप्रोनील (०.३%) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने रोपांजवळ वापरावे.

सचिन आढे, ९०११८४२०८४

(वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com