
मयूरी अनुप देशमुख
Sustainable Agriculture : शेतीमध्ये पिकांचे पोषण हा गुणवत्ता सुधार आणि उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी अनेक प्रकारच्या खतांचा विकास केला जात आहे. भारतीय शेतीमध्ये रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर १९६० च्या नंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाला.
त्यातून पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांकडून त्याचा स्वीकारही मोठ्या प्रमाणात झाला. त्यातही शेतकऱ्यांना अन्य खते माहिती असली किंवा नसली तरी त्यांना युरिया हे नत्रयुक्त खत नक्कीच माहिती असते.
कारण पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांमध्ये नत्र पहिल्या क्रमांकावर येते. त्याचा वापरही बहुतांश सर्व शेतकरी करत असतात.
बहुतांश शेतकरी दाण्याच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असलेल्या युरियाचा वापर प्रामुख्याने करतात. तो जमिनीत टाकला जातो किंवा फोकून दिला जातो. (फोकून देण्याची पद्धत चुकीची आहे.) मात्र अशा प्रकारे पिकाला दिल्या गेलेल्या नत्रापैकी फारच थोडा भाग पिकांकडून वापरला जातो.
या खताचा उर्वरित बहुतांश भाग पाण्यासोबत निचरा होऊन जातो किंवा हवेमध्ये वायूरूपामध्ये (नायट्रस ऑक्साइडच्या स्वरूपामध्ये) निघून जातो. हा ऱ्हास कमीत कमी होण्यासाठी कडुनिंबाचा थर दिलेल्या युरियाचा वापर करण्याची शिफारस शास्त्रज्ञ करत असतात.
तेही योग्य आहे. मात्र शास्त्रज्ञांनी त्याही पुढे जात अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरिया विकसित केला आहे. त्याची अनेक उत्पादनेही बाजारात उपलब्ध होत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्याची पूर्णतः माहिती नसल्याने वेगवेगळे संभ्रम आहेत.
नॅनो युरिया म्हणजे काय?
या शब्दातील ‘नॅनो’चा अर्थ आपण जाणून घेतला तर बहुतांश सर्व बाबी समजतील. एक नॅनो म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग. त्यामुळे नॅनो टेक्नोलॉजी या साठी मराठीमध्ये अब्जांशी तंत्रज्ञान असा शब्दही वापरला जातो.
युरिया म्हणजेच नत्राचे इतक्या सूक्ष्म आकाराचे कण तयार करून त्याचे द्रवरूप असे खत शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. युरियाची तीव्रता तेवढीच ठेवलेली असली तरी त्याचे नॅनो स्वरूप तयार केल्यामुळे त्याची कार्यक्षमता प्रचंड वाढते.
म्हणजेच सोप्या भाषेमध्ये सांगायचे तर ४५ किलो वजनाच्या पोत्यात सामावले जाणारे युरिया इथे केवळ ५०० मिलिलीटर ‘नॅनो युरिया’ बाटलीतून मिळू शकते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये युरिया खतांचा वापर ५० टक्क्यांने कमी करता येईल.
या द्रवरूप खताची फवारणी पिकांच्या पानावर करावी लागते. त्याचे कण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे शोषण पानांकडून त्वरित केले जाते. पिकामध्ये शोषले जाऊन त्याचा संपूर्ण उपयोग पिकांकडून केला जाईल.
हे खत जमिनीमध्ये टाकले जात नसल्यामुळे जमिनीवर होणारे रासायनिक खतांचा अन्य विपरीत परिणाम अजिबात होणार नाही. त्याच प्रमाणे निचरा होऊन भूजल किंवा पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषणही होणार नाही. म्हणजेच एकूणच पर्यावरणासाठी ते अजिबात हानिकारक नाही.
फायदे
- सर्व पिकांसाठी फवारणीद्वारे वापरणे शक्य.
- पारंपरिक दाणेदार युरिया खताला उत्तम पर्याय ठरू शकतो.
-शेतामध्ये जमिनीत खत देण्याच्या तुलनेमध्ये खतांमध्ये व त्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत शक्य.
- पिकाच्या उत्पादकतेत वाढ होते.
-पर्यावरणावरील विशेषतः माती, हवा आणि पाण्याची गुणवत्ता
यावरील विपरीत परिणाम कमी होतात.
- पारंपरिक युरियाच्या तुलनेत ‘नॅनो युरिया’ कमी लागतो. साठवणूक व वाहतूक यावरील खर्चही कमी होतो.
...असा करता येईल वापर
-नॅनो युरिया २ ते ४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीद्वारे वापरण्याची शिफारस केली गेली आहे. (ज्या पिकांना नायट्रोजन कमी प्रमाणात लागतो, तिथे २ मिलि, तर ज्या पिकांना नायट्रोजन अधिक लागतो, त्या पिकांसाठी ४ मिलि असे प्रमाण ठेवता येते.)
-भाजीपाला, तेलबिया पिके, अन्नधान्य, कापूस इ. पिकांसाठी दोनदा युरियाची फवारणी करण्याची शिफारस केली जाते. पेरणी अथवा लागवड झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी फुलोरा येण्याच्या एक आठवड्याआधी म्हणजेच पहिल्या फवारणीच्या २५ दिवसानंतर करावी.
- कडधान्य पिकासाठी एकदा फवारणीची शिफारस आहे.
- एक एकर क्षेत्रासाठी फवारणीला दीडशे लिटर पाणी वापरण्याची शिफारस आहे.
वापरताना घ्यावयाची काळजी
-नॅनो युरियाची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवून घ्यावी.
- फ्लॅट फॅन नोझलचा वापर करावा.
- ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करावी. या वेळी पिकांच्या पानांची शोषण क्षमता चांगली असते.
- तीव्र सूर्यप्रकाश, जोरदार वारा आणि जास्त दव असेल तेव्हा फवारणी करणे टाळावे.
- नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर १२ तासांच्या आत पाऊस पडल्यास फवारणी पुन्हा करावी.
- जैव उत्प्रेरक, १००% विरघळणारी खते आणि कृषी रसायने यांच्यासोबत मिसळून फवारणी करणे शक्य आहे. मात्र त्याची कॉम्पॅटॅबिलिटी तपासून घ्यावी. अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-यामध्ये कोणतेही विषारी घटक नाहीत. मात्र स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पिकावर फवारणी करताना फेस मास्क आणि मोजे वापरावेत.
-मुलाच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर, थंड आणि कोरड्या जागी नॅनो युरिया ठेवावा.
‘नॅनो युरिया’ बाबत शेतकऱ्यांकडून येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे -
प्रश्न - नॅनो युरिया आणि युरियामध्ये काय फरक आहे?
उत्तर - नॅनो युरिया हा द्रव युरियाचा एक प्रकार आहे, तर युरिया घन स्वरूपात गोण्यांमध्ये आढळतो. नॅनो युरियाची तीव्रता ही घन युरियाच्या पिशवीइतकीच असते. मात्र ते पिकाकडून संपूर्णपणे शोषले व वापरले जात असल्यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता अधिक असते.
प्रश्न - नॅनो युरिया फवारणी केव्हा करावी?
उत्तर - नॅनो युरियाची फवारणी सिंचनानंतर केव्हाही करता येते. तरिही सकाळी लवकर किंवा सायंकाळी उन्हे कमी झाल्यानंतर करावी.
प्रश्न - नॅनो युरियाचा वापर कसा केला जातो?
उत्तर - नॅनो युरिया पाण्यात मिसळून वापरावा. प्रति लिटर पाण्यात २ ते ४ मिलि नॅनो युरिया मिसळून फवारणी करता येते.
प्रश्न - नॅनो युरियाची किंमत किती आहे?
उत्तर - नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत २४० रुपये आहे.
अतिसूक्ष्म कणांच्या (नॅनो) स्वरूपातील खतांचा वापर पानांवर फवाणीद्वारे शोषण पानाची स्थिती व त्यातील घटक :
रसवाहिन्या (फोयलम), शिरा, पानाच्या बाह्यत्वचेची खालील बाजू (लोअर एपीडर्मिस), मेसोफिल, पानाच्या बाह्यत्वचेची वरील बाजू (अप्पर एपिडर्मिस), पानाचे वरील पातळ आवरण (क्युटीकल), पर्णछिद्रे, नॅनो कणांच्या स्वरूपातील खते
जमिनीमध्ये मुळांद्वारे शोषण मुळांची अंतर्गत स्थिती व त्यातील घटक :
वनस्पतीमधील जलवाहिन्या (झायलम), पेरीसायकल, अंतः त्वचा (एन्डोडर्मिस), कोर्टेक्स, बाह्य त्वचा (एपिडर्मिस), साधा लवचिक मार्ग (सिम्प्लास्टिक पाथवे), स्थिर, तुलनेने कठीण मार्ग (अपोप्लास्टिक पाथवे), माती, नॅनो कणाच्या स्वरूपातील खते.
मयूरी अनुप देशमुख, ९२८४५२२२८४ (सहायक प्राध्यापक, मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.