एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कडुनिंब फायदेशीर

कडुनिंब ही औषधी वनस्पती सर्वांना परिचित आहे. आयुर्वेदिक औषधांसह पीक व्यवस्थापनातही कडुनिंबाचा वापर फायदेशीर ठरतो.
एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कडुनिंब फायदेशीर
Integrated Pest ManagementAgrowon

वैभव गिरी, डॉ. बी. के. सोनटक्के

कडुनिंब ही औषधी वनस्पती सर्वांना परिचित आहे. आयुर्वेदिक औषधांसह पीक व्यवस्थापनातही (Crop Management) कडुनिंबाचा वापर फायदेशीर ठरतो. कडुनिंब (Neem) झाडाची मुळे, खोडाची साल, झाडापासून मिळणारा डिंक, पाने, फुले, फळे इत्यादींमध्ये विविध औषधी गुणधर्म असतात. कडुनिंब तेल, निंबोळी अर्क व तेल काढल्यानंतर उरलेली पेंड अशी विविध उत्पादने पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. या उत्पादनांची निर्मिती शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे.

१) निंबोळी अर्क ः

- झाडाखाली पडलेल्या व चांगल्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून जमा कराव्यात.

- जमा केलेल्या निंबोळ्या स्वच्छ करून उन्हात वाळवून त्यांची साठवणूक करावी.

- निंबोळी अर्काची फवारणी करायच्या एक दिवस आधी आवश्यक तेवढी निंबोळी कुटून बारीक करून घ्यावी.

- एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात बारीक केलेला निंबोळीचा चुरा भिजत ठेवावा (प्रमाण ः ५ किलो चुरा अधिक ९ लिटर पाणी). सोबतच दुसऱ्या बादलीमध्ये १ लिटर पाण्यात साबणाचा २०० ग्रॅम चुरा भिजत ठेवावा. दोन्ही मिश्रणे साधारण २४ तास भिजत ठेवावीत.

- चोवीस तासांनंतर पाण्यात भिजत ठेवलेले निंबोळी चुऱ्याचे द्रावण काठीने चांगले ढवळून घ्यावे. मिश्रण साधारणपणे दुधाप्रमाणे दिसेपर्यंत ढवळावे.

- चांगले ढवळल्यानंतर निंबोळी अर्क स्वच्छ फडक्यातून गाळून घ्यावा. तयार अर्कामध्ये साबणाचे द्रावण मिसळून घ्यावे.

- एका टाकीमध्ये ९० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये तयार केलेला १० लिटर अर्क मिसळून हे द्रावण चांगले ढवळून घ्यावे.

- तयार निंबोळी अर्क शिफारशीप्रमाणे फवारणीसाठी वापरावा.

२) कडुनिंबाच्या पानांपासून अर्क ः

अर्क बनविण्यासाठी कडुनिंबाची ७ किलो पाने स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करावीत. बारीक केलेले पानांचे मिश्रण ५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ कापडामधून मिश्रण गाळून घ्यावे. तयार अर्क १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरावा.

३) निंबोळी तेल ः

- उन्हात चांगल्या वाळविलेल्या निंबोळ्या तेल काढण्यासाठी वापराव्यात. प्रथम वाळलेल्या निंबोळीवरील साल काढून घ्यावी.

- त्यानंतर निंबोळीचा पांढरा गर उखळीमध्ये ठेचून लगदा तयार करावा. त्यात थोडे पाणी टाकावे.

- तयार लगद्याचा गोळा एका पसरट भांड्यात थापून घ्यावा. त्यामुळे पृष्ठभागावर तेल जमा होईल. तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून तेल काढावे. पुन्हा एकदा हाताने घट्ट दाबून गोळ्यातील तेल पूर्णपणे काढून घ्यावे.

- तेल काढल्यानंतर उरलेला गोळा उकळत्या पाण्यात टाकावा. त्यामुळे गरम पाण्यावर तेल तरंगायला लागेल. हे तेल चमच्याने बाजूला काढून घ्यावे.

- तेल काढण्यासाठी लाकडी घाण्याचा वापरही करता येतो. लाकडी घाण्यामधून अधिक प्रमाणात तेल मिळते. ही एक पारंपरिक पद्धत आहे.

- साधारणपणे १ किलो निंबोळी बियांपासून १०० ते १५० मिलि तेल मिळते.

- फवारणीवेळी निंबोळी तेल १ ते २ टक्के या प्रमाणात वापरावे.

- निंबोळी तेलाची फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावी.

निंबोळी अर्काचे फायदे ः

- निंबोळीतील अझाडिरेक्टीन या घटकामुळे झाडाचे किडीपासून संरक्षण होते. किडींचे जीवनचक्र संपुष्टात येते.

- निंबोळीतील सालीमध्ये डीएसीटील, अझाडिरेक्टीनॉल या महत्त्वाच्या घटकांचा समावेश असतो. हे घटक पिकांवरील भुंगे, खवले, कीटक यांच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करतात. हे

घटक किडींच्या शरीररचनेत व क्रियेत बदल घडवून किडींना अपंगत्व आणतात.

- निंबोळीमध्ये मेलियान ट्रीओल हा घातक घटकदेखील असतो. हा घटक किडींना झाडांची पाने खाण्यास अटकाव करतो. त्यामुळे झाडे निरोगी राहून त्यांची वाढ चांगली होते.

- निंबोळीमधील निम्बीडीन व निम्बीन या महत्त्वाच्या घटकांमध्ये विषाणूंविरुद्ध लढण्याची शक्ती असते. त्यामुळे पिके आणि जनावरांतील विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.

- निंबोळीमध्ये किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक दुर्गंध, किडीस खाद्य प्रतिबंधक, कीड वाढरोधक व कीड नियंत्रण असे विविध महत्त्वाचे गुणधर्म असतात.

- निंबोळी अर्क हा रस शोषणाऱ्या किडी, ठिपक्यांची बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, हिरवी बोंड अळी, पाने गुंडाळणारी अळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी, घाटे अळी, एरंडीवरील उंट अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी तसेच ज्वारी व मक्यावरील खोडकीड, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, घरमाशी, मिलीबग, मुंगी व भुंग्याची प्रजाती, झुरळाच्या प्रजाती इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

- पीक संरक्षणासोबतच साठवणुकीच्या धान्यातील विविध किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

- निंबोळी अर्क हे बुरशीनाशक, जिवाणूनाशक, विषाणूरोधक म्हणून उत्तमरीत्या काम करते.

४) कडुनिंब बियांची भुकटी ः

- कडुनिंबाच्या बिया गोळा करून उन्हात चांगल्या वाळवाव्यात. वाळलेल्या बिया मिक्सरमध्ये फिरवून बारीक भुकटी करावी.

- तयार भुकटी साठवणुकीच्या धान्यात १ ते २ टक्के म्हणजेच १ क्विंटल धान्यासाठी १ ते २ किलो भुकटी याप्रमाणे मिसळावी. त्यामुळे साठवणुकीच्या काळात धान्याचे किडींपासून ६ महिन्यांपर्यंत संरक्षण होते.

- लागवडीपूर्वी बियाणे कडुनिंब भुकटीच्या १ ते २ टक्के द्रावणात २ तास भिजवून नंतर पेरणी करावी. त्यामुळे सूत्रकृमींचा उपद्रव कमी होतो.

५) निंबोळी पेंड ः

- पेंड तयार करण्यासाठी परिपक्व झालेल्या निंबोळ्या उन्हात चांगल्या वाळवून घेतल्या जातात.

- निंबोळ्या चांगल्या वाळल्यानंतर कोल्ड प्रेस्ड पद्धतीने निंबोळी पेंड तयार केली जाते.

- तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फायदेशीर असते.

- निंबोळी पेंड किंवा निंबोळी भुकटीचा वापर जमिनीतूनही करता येतो.

फायदे ः

- निंबोळी पेंडीच्या वापरामुळे नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना वाढीच्या अवस्थेत दीर्घकाळपर्यंत होतो.

- कडुनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये मिसळल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमिनीतील किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींना अटकाव करता येतो.

- जमिनीतील हानिकारक किडी जसे, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या, हुमणी, मिलीबग आदींवर नियंत्रण ठेवता येते.

- फळभाज्या पिकांच्या मुळांवर गाठी करणाऱ्या हानिकारक सूत्रकृमींना रोखता येते.

- निंबोळी पेंडीतील घटक जमिनीत हळूहळू मात्र दीर्घकाळपर्यंत काम करतात. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत त्यांचा परिणाम दिसून येतो.

- रासायनिक नत्रयुक्त खताची २५ टक्क्यांपर्यंत बचत होते.

---------------------------

- वैभव गिरी, ९१४६४१२२१०

(कृषी कीटकशास्त्र विभाग, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिंपरी-वर्धा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com