
ChatGPT For Agriculture Sector : ‘चॅट जीपीटी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉटसाठी पैसे आकरले जाणार असल्याची घोषणा ओपन एआय कंपनीने केली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा चॅट जीपीटीवर चर्चा सुरू झाली. वापरासाठी खरंच पैसे आकारले जाणार का? आणि किती आकारले जाणार? असा प्रश्न वापरकर्त्या शेतकऱ्यांना पडला आहे.
चॅट जीपीटी म्हणजे काय?
चॅट जीपीटी हा एक चॅटबॉट आहे. चॅटबॉट म्हणजे जो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्याच्यात साठविलेल्या माहितीच्या आधारे देऊ शकतो.
कृषी क्षेत्रातील मूलभूत माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते असे साधन शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये मिळाल्याने काही शेतकरी त्याचा वापर करू लागले होते.
कीटकनाशके, खते, रोगांची नावे किंवा जागतिक स्तरावरील कृषी क्षेत्रातील माहिती चॅट जीपीटीतून मिळू लागली आहे.
विशेष म्हणजे त्यासाठी एक पैसाही आकारला जात नाही, अशी धारणा अनेकांची होती. त्यामुळे एका अर्थाने शेतकऱ्यांना मोफत माहिती देणारे एक साधन जीपीटीच्या स्वरूपाने मिळाल्याचे सांगण्यात येत होते.
चॅटजीपीटी पैसे सुरूवातीपासून पैसे आकारते?
चॅटजीपीटीने प्रदर्शित झाल्यापासून सेवेसाठी पैसे आकारत आले आहे. वापरकर्त्याने खाते तयार करून लॉगिन केल्यानंतर कंपनीकडून वापरकर्त्याच्या खात्यात काही पैसे जमा केले जात होते.
जेणेकरून वापरकर्त्यांना त्याच्या वापराची सवय लागावी. म्हणजे सुरुवातीला कंपनीने जमा केलेल्या पैशातून वापरकर्ते चॅटजीपीटीचा वापर करतात. त्यासाठी पैसेही कंपनी मोजते.
वापरकर्त्याच्या खात्यातील पैसे संपल्यानंतर मात्र कंपनी वापरकर्त्यांकडून पुढच्या वापरासाठी पैसे आकारते. भारतात सुरूवातीच्या काळात रिलायन्स जिओ या कंपनीने असा प्रयोग केला होता.
रिलायन्स जिओचा प्रयोग काय होता?
रिलायन्सकडून जेव्हा जिओची सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी रिलायन्स कंपनीने जिओचे सीमकार्ड खरेदी करणाऱ्याला एक ते तीन महीने मोफत मोबाइल रीचार्ज दिले होते.
त्यातून जिओचे वापरकर्ते वाढत गेले. पुढे कंपनीने अशा पद्धतीने मोफत मोबाइल रीचार्ज देणे बंद केले होते. तोवर मात्र वापरकर्त्यांना जिओचा सेवेची सवय झाली होती.
पहिल्याच महिन्यात जगभरातील २० बिलियन लोकांनी चॅटजीपीटीला भेट दिल्याची आकडेवारी कंपनीकडून जाहीर करण्यात आली. मात्र पैसे आकरले जाण्याच्या घोषणेमुळे वापरकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘चॅट जीपीटी’वर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.
चॅट जीपीटी खरंच पैसे आकारणार का?
चॅट जीपीटीची निर्मिती कंपनी असलेल्या ओपन एआय या कंपनी पैसे आकरण्याची घोषणा केली असली तरी अजूनही भारतात चॅट जीपीटी मोफत वापरता येते.
कंपनीने ‘चॅट जीपीटी प्लस’ असे नवीन मॉडेल अमेरिकेसाठी विकसित केले आहे. तसेच कंपनी प्रतिमहिना २० डॉलर आकारणार आहे. मात्र ‘चॅट जीपीटी प्लस’ केवळ अमेरिकासाठी मर्यादित आहे.
भारतात अजून तरी चॅट जीपीटी वापरासाठी पैसे आकारले जात नाहीत. भारतात सध्या तरी चॅटजीपीटीसाठी पैसे आकारले जात नाहीत.
पैसे आकारल्यावर काय सुविधा मिळतात?
ओपन एआय या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, ‘चॅटजीपीटी प्लस’ या अमेरिकन मॉडेलमध्ये वापरकर्त्यांना जलदगतीने माहिती मिळवता येणार आहे.
तसेच चॅटजीपीटीच्या संकेतस्थळावर कितीही वापरकर्त्यांनी एकाच वेळी प्रवेश केला तरीही सर्व्हर डाऊन होणार नाही. चॅटजीपीटीमध्ये भविष्यात येऊ घातलेल्या सुधारणासाठी पैसे आकारलेल्या वापरकर्त्यांना सूचना देण्याचा अधिकार मिळणार आहे.
भारतात पैसे आकारले जाऊ शकतात का?
ओपन एआय या कंपनीने सध्यातरी याबद्दल अधिकृत अशी माहिती दिलेली नाही. मात्र भविष्यात जगभरात चॅटजीपीटीच्या वापरासाठी पैसे आकारण्यात येतील, याची संकेत कंपनीने अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहेत.
त्यामुळे हळूहळू भारतातही पैसे आकारले जाऊ शकतात, असे एआय क्षेत्रातील जाणकार सांगतात.
दरम्यान, ओपन एआय कंपनीकडून लवकरच चॅटजीपीटी अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी कंपनीकडून करण्यात येत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.