खरीप हंगामासाठी कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

राज्यामध्ये खरीप, रांगडा व रब्बी अशा तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. खरीप कांद्याची लागवड (Onion Cultivation) जुलै ते ऑगस्ट दरम्यान आणि काढणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात केली जाते. कांद्याचे सदोष बियाणे, सतत पाऊस, वाफसा न होणे, रोपवाटिकेत बुरशी रोगांचा प्रादुर्भाव अशा काही कारणांमुळे खरीप कांदा उत्पादनावर (Onion Production) विपरीत परिणाम होतो.
Onion
Onion Agrowon

कांद्याचे बियाणे (Onion Seed) निवडताना अधिक सजग राहण्याची गरज आहे. अनेक शेतकरी पारंपरिक, विहित विलगीकरण अंतराचा विचार न करता अशास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या बियाण्यांचा वापर (Onion Seed Use) करतात, त्यामुळे कांद्याचा रंग , आकार व वजन यात एकसारखेपणा राहत नाही. डेंगळे येणे, भेसळयुक्त कांदे इ. समस्या येतात. खासगी शेतकऱ्यानेही बियाणे शास्त्रीय पद्धतीने तयार केले असल्याची खात्री करावी.

जातीची निवड ः

- राजगुरुनगर (पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेले वाण ः भीमा राज, भीमा रेड, भीमा डार्क रेड, भीमा सुपर, भीमा सफेद, भीमा शुभ्रा आणि भीमा श्‍वेता इ.

-कृषी विद्यापीठ किंवा फळबाग संशोधन संस्था यांच्या बसवंत-७८०, फुले समर्थ, अग्रिफाऊंड डार्क रेड इ. जातींची निवड करावी.

-मूलभूत बियाणे घेऊन दरवर्षी निवड करून दोन जातीमध्ये विहित केलेले विलगीकरण अंतर राखून शेतकरीही बीजोत्पादन करू शकतो. मागील हंगामातील बियाणे वापरणार असल्यास त्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी.

खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

१) जमीन व मशागत ः कांदा रोपवाटिकेसाठी सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध, वालुकामय चिकण मातीयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. रोपवाटिकेत पाणी सतत साठून राहिल्यास बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तो टाळण्यासाठी जमिनीला किंचित उतार द्यावा. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हात चांगली तापवलेल्या जमिनीत खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरण्या कराव्यात. यामुळे जमिनीतील किडी रोगांचे अंश नष्ट होतील आणि जमीन भुसभुशीत होईल. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांचे तसेच तणांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.

२) वाफे बनवणे ः हंगाम किंवा ऋतूनुसार रोपवाटिकेसाठी योग्य वाफे बनवावे लागतात.

अ) जमीन योग्य उताराची, पाण्याचा योग्य निचरा क्षमता असलेली असल्यास सपाट वाफा पद्धतीचा अवलंब करू शकतो. सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते म्हणून बियाणे वाहून जाण्याची शक्यता असते.

ब) पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या भारी (चिकणमाती) जमिनीमध्ये खरीप हंगामासाठी गादीवाफे फायद्याचे ठरतात. गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंच्या भुईदंडामधून वाफ्याला पुरेसे पाणी न मिळाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून स्प्रिंकलर, ठिबक किंवा रेनगेज पाइपद्वारे पाणी देण्याचे नियोजन करावे. रोपवाटिकेसाठी गादी वाफे २-३ मीटर लांब, १ ते १.५ मीटर रुंद आणि १५ ते २० सेंमी उंच असावेत. तण काढण्याच्या सुलभतेसाठी वाफ्याची रुंदी १ ते १.५ मीटर मर्यादित ठेवावी.

३) खत व्यवस्थापन ः वाफे तयार करण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत १ किलो प्रति चौ.मी. जागेला मातीत मिसळून द्यावे. वरील आकाराच्या प्रत्येक वाफ्यासाठी १५:१५:१५ ग्रेडचे खत १०० ते १५० ग्रॅम आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड दाणेदार मातीत एकसमान मिसळून द्यावे. किंवा पेरणीपूर्वी अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत, २:१:१ किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति ५ गुंठे या प्रमाणे द्यावे. पेरणीनंतर २० दिवसांनी १ किलो नत्र द्यावे. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी साधारणतः ५ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते. सतत पडणाऱ्या पावसामुळे पोषक अन्नद्रव्यांचा निचरा होऊन रोपे पिवळी अथवा पीळ पडू शकतो. त्यासाठी बियाणे पेरणीनंतर २० दिवसांनी १९:१९:१९ हे खत २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण-४ (लोह ४ %, जस्त ६ % ,मँगेनीज १ %, तांबे ०.५ %, बोरॉन ०.५ %) १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास फायदेशीर ठरते. पावसाळी वातावरणामध्ये त्यात चिकटद्रव्य अर्धा मि.लि. प्रति लिटर प्रमाणे मिसळावे.

४) प्रतिबंधात्मक उपाययोजना ः माना टाकणाऱ्या (डम्पिंग

ऑफ), करपा, मर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाणे टाकल्यानंतर ३-४ दिवसांनी, एकरी अर्धा ते एक किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि २ किलो फॉस्फरस विरघळणारे जिवाणू (पी. एस. बी.) गांडूळ खतात मिसळून द्यावे.

५) बियाणे प्रमाण ः लागवडीसाठी एकरी २.५ ते ३ किलो बियाण्यांची गरज असते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. पॅकेटबंद बियाणे असल्यास त्यावर कोणत्या बीजप्रक्रिया केल्या आहेत, ते तपासावे. बियाणे ओळींमध्ये १ ते १.५ सें.मी. खोलीवर टाकावे. ओळींमध्ये ५ ते ७.५ सें.मी. अंतर ठेवावे. बियाणे टाकून त्यावर गांडूळ खत किंवा कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या बारीक भुकटीचा हलकासा थर द्यावा. नंतर हलके पाणी द्यावे.

६) पाणी व्यवस्थापन ः रोपवाटिका कमी असल्यास बियाण्याची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. रोपवाटिकेचा विस्तार अधिक असल्यास गादीवाफ्यावर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचनासाठी १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरल, प्रति तास ४ लिटर उत्सर्जन असलेले ड्रीपर आणि दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. तुषार सिंचन वापरणार असल्यास, २ लॅटरलमध्ये ६ मीटर अंतर ठेवावे. नोझलची पाणी फेकण्याची क्षमता प्रति तास १३५ लिटर असावी.

७) तणनियंत्रण ः खरीप हंगामात कांदा रोपवाटिकेमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढतो. तणनियंत्रणासाठी २ ते ३ खुरपण्या प्रभावी ठरतात. तणनाशक वापरणार असल्यास, पेरणीनंतर व रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. बियाणे पेरल्यानंतर २० ते २५ दिवसांनी १-२ खुरपण्या कराव्यात.

८) हवामानापासून बचावासाठी ः खरिपामध्ये पाऊस आणि सिंचनामुळे पाणी अधिक होऊ शकते. वेळीच पाणी बाहेर काढून टाकावे. सतत पाणी साठून राहिल्यास मुळांपाशी हवा खेळती राहत नाही. मुळांना अन्नद्रव्ये घेणे कठीण होते. रोपे पिवळी पडतात. तसेच बुरशीचाही प्रादुर्भाव वाढतो. रोपांची मर वाढू शकते. कडक ऊन आणि पाऊस यांच्यापासून रोपाच्या रक्षणासाठी शेडनेट उपयोगी ठरू शकते. वाफ्यांवर हिरव्या रंगाचे ५०-६० टक्केचे शेडनेटने जमिनीपासून सुमारे ४-५ फूट उंचीपर्यंत लावावे. पावसापासून रोपांचा बचाव करण्यासाठी पारदर्शक पॉलिथिनचाही वापर करता येतो.

९) निरोगी, कीडमुक्त रोपांसाठी पीक संरक्षण ः

-फुलकीड कांद्यातील एक प्रमुख कीड असून, तिचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कांदा रोप टाकण्याआधी १५ दिवस रोपवाटिकेभोवतीने मका पिकाच्या २ ओळी टोकाव्यात. फुलकीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी प्रति लिटर पाणी

फिप्रोनिल (५ ई.सी.) १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान (२५ % ई.सी.) २ मि.लि.

पावसाळ्यात सोबत स्टिकरचा वापर करावा. शिफारशीत कीडनाशकाचा आलटून पालटून वापर करावा.

-सतत पडणाऱ्या पावसामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.

-मर रोग नियंत्रणासाठी, आळवणी प्रति लिटर पाणी

मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.

-मूळकूज रोग नियंत्रणासाठी, आळवणी प्रति लिटर पाणी

कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम.

१०) पुनर्लागवडीपूर्वी रोपांवर प्रक्रिया ः साधारणतः रोपे ५०-६० दिवसांची झाल्यानंतर त्यांची १५ × १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करतात. लागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे बुडवावीत. नंतर शेतात लागवड करावी.

डॉ.पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२

(डॉ. साबळे हे उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के., सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात येथे सहायक प्राध्यापक आहेत, तर डॉ. विजय महाजन, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर येथे प्रमुख शास्रज्ञ आहेत. आणि डॉ. सुषमा साबळे या कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून आचार्य पदवीप्राप्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com