धान्य साठवणुकीतील कीड व्यवस्थापन उपकरणे

साठवणीतील धान्ये अधिक काळासाठी चांगली राहण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Food grain
Food grainAgrowon

नम्रता राजस, डॉ. विपुल वाघ

साठवणीतील धान्ये (Foodgrain Storage) अधिक काळासाठी चांगली राहण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज असते. सध्या ढगाळ आणि पावसाळी वातावरण (Cloudy Weather) आहे. अशा स्थितीमध्ये धान्य खराब होणे, कीड (Pest) अथवा बुरशी लागणे अशा समस्या निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी सुपर ग्रेन बॅग आणि कीड नियंत्रण सापळ्याप्रमाणे काही सोपे उपाय अवलंबता येतात.

टी.एन.ए.यू. कीडनियंत्रण सापळा :

साठवणीतील धान्यातील किडींच्या नियंत्रणासाठी तमिळनाडू कृषी विद्यापीठाने हा सापळा विकसित केला आहे. हा सापळा वापरण्यास सुलभ असून, कोणत्याही देखभाल खर्चाशिवाय वर्षानुवर्षे वापरता येतो. कमी खर्चात किडींचे नियंत्रण होते.

...असा आहे कीड नियंत्रण सापळा

१) मुख्य नळी -

एका बाजूला झाकण असलेली तीन सें.मी. व्यासाची पोकळ अशा स्टीलची नळी असते. त्यावर दोन मि.मी. आकाराची छिद्रे केलेली आहेत. हा सापळा धान्यात ठेवल्यावर या छिद्राद्वारे किडी सापळ्यात अडकतात.

२) कीटक अडकणारी नळी -

मुख्य नळीच्या एका बाजूला जोडण्यात आलेली प्लॅस्टिकची ही एक नळी आहे. या नळीला नरसाळ्याचा आकार देण्यात आलेला आहे. मोठा गोलाकार भाग मुख्य नळीला जोडला आहे. लहान गोलाकार भाग खालच्या दिशेने केलेला आहे.

३) या नळीला लहान गोलाकार भागात प्लॅस्टिकचा शंकू बसविण्यात आला आहे. ज्या वेळी धान्यातील कीड मुख्य नळीच्या छिद्रामधून आत येईल, त्या वेळी ती कीड अडकण्याच्या नळीमधून थेट शंकूमध्ये जमा होईल. ही नळी नरसाळ्याच्या आकाराची असल्यामुळे किडी तेथे अडकून न राहता सरळ शंकूमध्ये जमा होतात. हा शंकू गुळगुळीत प्लॅस्टिकचा असून, जमा झालेल्या किडींना बाहेर येता येत नाही. किडी त्यामध्येच अडकून राहतात. हा शंकू आट्याच्या साह्याने कीटक अडकण्याच्या नळीवर सहजपणे लावता वा काढता येते.

सापळ्यामागील तत्त्व :

कोणत्याही सजिवास जगण्यासाठी हवेची आवश्‍यकता असते. या तत्त्वाचा वापर या सापळ्यामध्ये केलेला आहे. धान्यामध्ये सापळा ठेवल्यानंतर त्यात मोकळी उपलब्ध होते. ती मिळविण्यासाठी धान्यातील किडी तिकडे आकर्षित होतात. त्यातील सापळ्यात अडकतात.

सापळ्याची कार्यपद्धती :

हा सापळा धान्यामध्ये पांढरा शंकू खाली येईल, अशा पद्धतीने उभा ठेवावा. वरील लाल रंगाचे झाकण हे धान्य पातळीशी समांतर ठेवावे. किडी मुख्य नळीतील पोकळ जागेतील हवेकडे आकर्षित होतात. नळीच्या छिद्रांद्वारे कीड सापळ्यात प्रवेश केलेल्या किडी खालील बाजूच्या शंकूमध्ये पडून अडकतात. आठवड्यातून एकदा या सापळ्याचा शंकू काढून जमलेल्या किडी नष्ट कराव्यात. पुन्हा सापळा याच पद्धतीने धान्यात ठेवावा. साठवलेल्या प्रति ५ किलो अन्नधान्यासाठी एक सापळा वापरण्याची शिफारस आहे.

सापळ्याची वैशिष्ट्ये

-वापरण्यास सुलभ, आर्थिकदृष्ट्या परवडतो.

-देखभालीचा खर्च नाही, वर्षानुवर्षे वापरता येतो.

-कुठल्याही रासायनिक घटकांचा वापर नाही.

सुपर ग्रेन बॅग :

तृणधान्ये आणि अन्य धान्ये दीर्घकाळ साठवण्यासाठी आपल्या सध्याच्या विणलेल्या पॉलीप्रॉपिलीन किंवा ज्यूटच्या पिशव्यांमध्ये आतील बाजूने सुपर बॅग वापरता येते. ही बॅग आतील बाजूने एका लायनर प्रमाणे कार्य करते.

तत्त्व ः

सुपर ग्रेन बॅगमध्ये आतील बाजूने एक लायनर असते. ही बॅग व्यवस्थित हवाबंद केल्यानंतर आतील धान्य आणि कीटकांच्या श्‍वसनामुळे

ऑक्सिजनची पातळी २१% वरून ५% पर्यंत कमी होते. त्याच प्रमाणे ओलावा किंवा बाष्प आत येत नाही. त्यामुळे किडी मृत होत जातात. किडीचे प्रमाण कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय प्रति किलो धान्यामध्ये एक कीटक इतके कमी होत असल्याचा दावा संशोधक करतात.

पारंपरिक साठवणीच्या पद्धतीपेक्षा सुपर बॅगचे फायदे ः

- लागवडीसाठी बियाण्याचे उगवण आयुष्य ६ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवते.

- कोणत्याही रसायनांच्या वापराशिवाय साठवणीमध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

- ओलावा वा बाष्प आत येत नसल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.

-धान्यातील ओलावा स्थिर राहण्यास मदत होते. धान्य ओले होणे किंवा तडतडण्याचे प्रमाण कमी होते. धान्य दळणे जास्त सोपे होते.

साठवणूक क्षमता : सुमारे ५० किलो

सुपर ग्रेन बॅग वापरताना घ्यावयाची काळजी ः

-धान्य किंवा बियाणे व्यवस्थित वाळले असल्याची खात्री करावी. साठवणीवेळी त्यातील आर्द्रता १२ टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

- नेहमीच्या साठवणीच्या पिशव्यामध्ये (उदा. विणलेल्या पॉलिप्रॉपिलीन किंवा तागाच्या पिशव्या) सुपर ग्रेन बॅग ठेवावी. त्यात धान्य भरावे.

-त्यातील अतिरिक्त हवा दाबून बाहेर काढून टाकावी. दाण्यांवरील प्लॅस्टिकचा मोकळा भाग फिरवून वरील तोंड बंद करावे. ते दोन भागांत दुमडून घ्यावे.

-मजबूत प्लॅस्टिक टॅगच्या साह्याने बंद करणे.

-आतील सुपर ग्रेन बॅग पंक्चर होणार नाही, याची काळजी घेऊन बाहेरील बॅग बंद करावी.

- क्षमतेपेक्षा अधिक धान्य भरू नये.

-सुपर ग्रेन बॅगला खेचून धान्य वाहून नेऊ नये. बाहेरील पिशवीचा वापर केल्यानंतरच सावकाश वाहतूक करावी.

-काही दिवसांनी त्यात कीटक नसल्याची खात्री करावी. जर त्यात कीटक आढळल्यास बॅगेचे लिकेज तपासून ती पुन्हा सीलबंद करावी.

नम्रता राजस, ९११९४२३७९०

(कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), ता. दारव्हा, जि. यवतमाळ)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com