अचानक सुकवा, काडीवर गाठी येण्याची समस्या

सद्यपरिस्थितीतील द्राक्ष विभागातील वाढीच्या विविध अवस्था आणि वातावरणाचा विचार करताना तापमानात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून येते.
अचानक सुकवा, काडीवर गाठी येण्याची समस्या

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. सुजोय साहा

सद्यपरिस्थितीतील द्राक्ष विभागातील वाढीच्या विविध अवस्था आणि वातावरणाचा विचार करताना तापमानात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून येते. काही ठिकाणी आर्द्रता खूपच कमी झालेली दिसते. काही परिस्थितीत अचानक झालेल्या तुरळक पाऊस व ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) आर्द्रतासुद्धा (Humidity) काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. या वातावरणाचा बागेच्या (Vineyard) काही विशिष्ट वाढीच्या अवस्थेमध्ये अनिष्ट परिणाम दिसून येत आहे. या संदर्भातील माहिती या लेखात घेऊ.

द्राक्ष वेल अचानक सुकण्याची समस्या ः

ज्या भागात कोरडे वातावरण जास्त प्रमाणात टिकून आहे व आर्द्रता फारच कमी झाली आहे. अशा ठिकाणी हलक्या जमिनीमध्ये असलेल्या द्राक्ष बागेमध्ये वेली सुकण्याची समस्या दिसून येत आहे. रिकट घेतल्यानंतर बागेत खोड व ओलांडा तयार होतो. तोपर्यंत तापमानात फारशी वाढ झालेली नसते. ज्या वेळी ओलांडा तयार होऊन त्यावर काड्यासुद्धा तयार होतात. प्रत्येक काडीवर साधारणतः १२ ते १३ पाने असतात. अशा स्थितीत वाढत्या तापमानात पानाद्वारे बाष्पीभवनामुळे पाणी जास्त निघून जाते. त्याच सोबत जमिनीतूनही तितक्याच प्रमाणात निघून जाते. वेलीची पाण्याची गरज वाढलेली असते. या स्थितीमध्ये द्राक्षवेल निस्तेज झाल्याप्रमाणे दिसून येते. काही अंशी पाने सुकल्याप्रमाणे दिसून येतात. तर काही प्रमाणात वाट्या झाल्याप्रमाणेही दिसतात. पहिल्याच वर्षाच्या बाग असल्यामुळे वेलीवरील काड्यांची संख्या पूर्ण होण्यासाठी व सूक्ष्म घडनिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी द्राक्ष बागायतदार पाणी जास्त प्रमाणात देतात. यामुळे वेलीची गरज व उपलब्धता याचा समतोल अचानक बिघडतो. मुळाच्या कक्षेत पाणी जास्त प्रमाणात साठलेले दिसते. मुळे काळी पडलेली दिसते, तर जमिनीलगत खोडावरील साल काढल्यास पाणी निघत असतानाही दिसून येते.

सुरुवातीला एखादे पान सुकलेले दिसेल. त्यानंतर काही ठिकाणी दोन ते तीन पाने सुकलेली दिसतील. दुसऱ्या दिवशी पूर्ण वेल सुकताना दिसेल. तिसऱ्या दिवशी अचानक पूर्ण वेल संपूर्ण सुकलेली दिसेल. एकदा सुकलेली वेल पुन्हा दुरुस्त करणे अवघड असते. उदा. ओलांड्यावरील काडी सुकलेली असल्यास पुन्हा त्यामध्ये रसनिर्मिती होत नाही. तसेच पाने सुकलेली असल्यास त्यामधील हरितद्रव्ये पूर्णपणे नष्ट झालेली असतात. अशा परिस्थितीत त्या वेलीला जर शरीरशास्त्रीय हालचाली पूर्ण करता आलेल्या नसल्यास वेलीचे आयुष्य तिथेच संपते. अशाच परिस्थितीतील वेली बऱ्याचशा बागेत काही प्रमाणात दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा या वेलीला मुळांद्वारे खंडित झालेला दिसून येईल.

उपाययोजना ः

१) वेलीच्या जमिनीलगत खोडावर साल काढल्यास पाणी बाहेर येताना दिसून येत असेल किंवा जिथे खोड ओले असेल, तिथे कार्बेन्डाझिम दीड ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) दीड मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण प्रत्येक वेलीला एक लिटर या प्रमाणात ड्रेंचिंग करावे. हे ड्रेंचिंग शक्यतो सायंकाळी केल्यास फायदा होईल.

२) जास्त प्रादुर्भाव असलेल्या स्थितीत तितक्याच मात्रेने तिसऱ्या दिवशी पुन्हा ड्रेंचिंग करावे.

३) जर प्रादुर्भाव कमी असल्यास फक्त हेक्साकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे ड्रेंचिंग करावे.

४) ड्रीपने ड्रेंचिंग न करता प्रादुर्भाव झालेल्या वेलीच्या खोड, बुड यावर ड्रेंचिंग करावे. त्यानंतर हा प्रादुर्भाव अन्य वेलीवर पसरणार नाही, यासाठी पूर्ण बागेत ठिबकद्वारे ड्रेंचिंग करावे.

५) जमिनीमध्ये वाफसा टिकून राहील, अशा पद्धतीने पाणी द्यावे.

६) जमिनीतून अथवा फवारणीद्वारे एक आठवडापर्यंत पालाश खतांचा वापर पूर्ण बंद करावा.

७) नत्रयुक्त खते उदा. युरिया व अमोनिअम सल्फेट या वेळी थोड्या प्रमाणात वाढवावे.

८) जमिनीतून ट्रायकोडर्मा (२ ते २.५ लिटर प्रति एकर या प्रमाणे तीन चार दिवसाच्या अंतराने दोन वेळा ड्रेंचिंग करून घ्यावे.

९) सबकेन करत असलेल्या बागेत या वेळी शेंडा पिंचिंग करण्याचे टाळावे. वाढ तशीच तीन ते चार पाने पुढेपर्यंत होऊ द्यावी.

१०) सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर या वेळी टाळावा.

काडीवर गाठी येणे -

द्राक्ष बागेत खरड छाटणी घेतल्यानंतर साधारणतः १२ ते १३ दिवसांनंतर नवीन फुटी निघण्यास सुरुवात होते. वाढत्या तापमानामुळे फुटीची वाढ थांबल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा वाढत्या तापमानामध्ये वेलीची पाण्याची गरजसुद्धा पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत वाढत असलेल्या फुटींचा पेरा निमुळता होतो.

नवीन बागेमध्ये रिकट नंतर ओलांडा तयार होत असताना काही प्रमाणात काड्याची वाढ जोमाने होताना दिसते. ही वाढ फक्त ठरावीक वेळेकरिता असते. ओलांड्याचा पहिला टप्पा सुरू असताना पाण्याचा वापर पूर्णपणे होतो. परिणामी वाढ जोमात होते. मात्र सूक्ष्मघड निर्मितीचा विचार करता वाढ नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते. हे जेव्हा आपल्या लक्षात येते, तेव्हा आपण वेलीचे पाणी कमी करतो, पालाशसारख्या खतांचा वापर वाढवतो व पहिल्याच वर्षी चांगले पीक मिळावे, या अपेक्षेने बाजारात उपलब्ध असलेल्या संजीवकांचा (टॉनिक्ससह) वापर करू लागतो. यावेळी सूक्ष्मघड निर्मिती करिता वापरण्यात येणाऱ्या संजीवकांमध्ये मुख्यतः सायटोकायनिनयुक्त संजीवकांचा वापर होतो. याच सोबत उपलब्ध टॉनिक्समध्येही एकतर अमिनो अॅसिड्सयुक्त संजीवके किंवा त्याव्यतिरिक्त आणखी काही घटक असू शकतात. या घटकांचा वापर द्राक्षवेलीला कसा होतो, हे समजण्यापूर्वीच त्याचे विपरीत परिणाम वेलीवर दिसून येतात. यापैकी फुटीची वाढ कमी होणे, पाने पिवळी पडणे, पेऱ्यातील अंतर कमी होणे, व काडीच्या प्रत्येक डोळ्यावर गाठी येणे असा समस्या दिसून येतात. गाठ आलेल्या ठिकाणी कापून पाहिल्यास किंवा चिरा मारल्यास पांढरा कापसाप्रमाणे द्रव दिसून येईल. तर त्या डोळ्यावर काडी लवकर मोडेल. अशा गाठी आलेल्या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा मुळीच नसतो. पानांमध्येही हरितद्रव्ये कमी झाल्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया मंदावते. याचे अनिष्ट परिणाम पुढील हंगामात दिसून येतील. आलेल्या गाठीवर सध्या काही उपाययोजना उपलब्ध नसल्या तरी पुढील काळात गाठी येऊ नये म्हणून पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

उपाययोजना

१) सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी गरज असल्यासच करावी. मोकळी कॅनॉपी व फुटींची वाढ नियंत्रणात असल्यास काडीच्या प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश मिळाल्यास सूक्ष्मघड निर्मितीकरिता संजीवकांची गरज फारच कमी असते.

२) पाण्याची पूर्तता जमिनीतील वाफसा पाहूनच करावी. जास्त पाणी दिल्यास नुकसानीचे ठरते, तर कमी पाण्यामध्ये वाढ खुंटते.

३) काडीवरील पानांची पूर्तता होईपर्यंत पालाशयुक्त खतांचा वापर टाळावा.

४) बागेत वाढ थांबलेली दिसताच किंवा गाठी येण्याची लक्षणे दिसताच नत्राचा वापर वाढवावा. बागेत पाणी सायंकाळी द्यावे व फुटींची परिस्थिती पाहून दोन ते तीन ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com