Agriculture Mechanization : शेतकऱ्यांच्या गरजेनुसार बहुउद्देशीय यंत्रांची निर्मिती

हिवरखेडा (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील रामचंद्र महाजन यांनी मजूरटंचाई, उत्पादन खर्च व त्या आनुषंगिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास केला. त्यातून आपल्या बुद्धिकौशल्यातून वेळ, श्रम व पैशांची बचत करणारी यंत्रे विकसित केली. शेतकऱ्यांकडून या यंत्रांना चांगली मागणी असून राज्यासह परराज्यांपर्यंत त्यांचा प्रसार झाला आहे.
Agriculture Mechanization
Agriculture MechanizationAgrowon

हिवरखेडा (ता. जामनेर, जि. जळगाव) गावाला वाघूर धरणाचा (Waghur Dam) लाभ होतो. त्यामुळे केळी व अन्य फळपिकांची (Fruit Crop) शेती वाढली. कापसाचेही जोमदार उत्पादन (Cotton Production) घेतले जाते. परिसराला समृद्धी आली आहे. गावातील रामचंद्र पांडुरंग महाजन यांची साडेआठ एकर शेती आहे. मुबलक जलसाठे असल्याने तेही केळीसह अन्य फळपिकांचे उत्पादन घेतात. वडिलांसह बंधू उल्हासदेखील शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. रामचंद्र परिसरात रामा म्हणूनही ओळखले जातात. ‘आयटीआय’ संस्थेतून ‘वेल्डिंग’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत नामांकित कंपनीत त्यांनी अनुभव घेतला. घरच्या शेतीतील मजूरटंचाई (Labour Shortage), त्यातून यांत्रिकीकरकणाची (Mechanization) गरज त्यांनी ओळखली होती. त्यामुळे नोकरी न करता गावी शेती अवजारे निर्मिती, ‘फॅब्रिकेशन’ संबंधी ‘वर्कशॉप’ सुरू करून रोजगार निर्मिती करावी असे ठरवले होते. पूर्ण नियोजनातून गावात श्री. साई ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स’ नावाने व्यवसायास सुरुवात केली. वडिलांसह काका गोपाल आनंदा यांचीही मोठी प्रेरणा मिळाली. (Agriculture Mechanization)

Agriculture Mechanization
बैलचलित यंत्रे करताहेत मजुरी, वेळ व पैशांत बचत

सुरुवातीचे प्रयत्न

गाव परिसरातील उज्ज्वल महाजन, उमेश महाजन, संजय महाजन, जितेंद्र पाटील, प्रशांत चौधरी आदी सहकाऱ्यांसोबत अवजारे विकास व निर्मिती बाबत वेळोवेळी चर्चा झाल्या. हिवरखेडा व लगत पळासखेडा, नेरी, हिंगणे, चिंचखेडा भागात फळपिकांची शेती वाढत होती. यातून प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा प्रचलित वापर व त्यातील त्रुटी ध्यानात आल्या. पेपर अंथरण्यासाठी मजुरांची मदत घ्यावी लागे. गादीवाफे तयार करून, माती लावून मजुरांकरवी पेपर व्यवस्थित करावा लागे. खतांचा ‘बेसल’ डोस, पुन्हा ठिबक अंथरण्याचे काम असे. यात एक एकरासाठी साडेतीन ते चार हजार रुपये मजुरी, वेळ, श्रम लागायचे. या सर्व अडचणी, आपल्यातील तांत्रिक ज्ञान लक्षात घेऊन रामचंद्र यांनी बैलजोडीचलित मल्चिंग पेपर यंत्रावर तीन वर्षे काम केले. त्याचे प्रात्यक्षिक मित्राच्या शेतावर घेतले. ते यशस्वी झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध केले.

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज

एकाच वेळी चार कामे करणारे ट्रॅक्टरचलित यंत्र

पुढे ट्रॅक्टरचलित यंत्रावर काम सुरू केले. त्यासाठी संजय दत्तू महाजन व इतरांची मदत झाली. यंत्र विकसित व्हायचे तशी गावातच प्रात्यक्षिके व्हायची. मोठे ट्रॅक्टरचलित गादीवाफा निर्मिती, गादीवाफ्यात खते सोडणारे, त्यात ठिबकची लॅटरल अंथरणारे व त्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अंथरणारे बहुउद्देशीय यंत्रही विकसित केले. मिनी ट्रॅक्टरचलित यंत्रही यातून तयार झाले. अडीच फूट, तीन फूट, चार फूट व पाच फूट यानुसार मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र तयार झाले. केळी, पपई, मिरची, टोमॅटो, कलिंगड आदी फळे व भाजीपाला पिकांसाठी ते उपयोगात आले.

वेळ, पैशांची बचत

बहुउद्देशीय यंत्रामुळे वेळेची ७० टक्क्यापर्यंत बचत करणे शक्य झाले. ट्रॅक्टरचलित यंत्र दिवसभरात सुमारे पाच एकरांत गादीवाफे तयार करणे, खते सोडणे, नळी अंथरणे व पेपर अंथरण्याचे काम करते. त्यासाठी एकरी दीड हजार रुपये खर्च येतो. बैलजोडीचलित यंत्रामुळेही खर्च व वेळेत ४० टक्के बचत करणे शक्य होते.

परराज्यांपर्यंत प्रसार

२०११ मध्ये रामचंद्र यांनी ‘वर्कशॉप’ सुरू केले. आज यांच्याकडील यंत्रांचा प्रसार महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशापर्यंत झाला आहे. सहा वर्षांत तब्बल ४५० बैल चलित व ट्रॅक्टरचलित मल्चिंग पेपर अंथरणी यंत्रांची विक्री झाली आहे. गुजरात-मध्य प्रदेशच्या सीमेवरील दाहोड (गुजरात) गावात आदिवासी बांधवांना यांत्रिक शेतीचा परिचय व विकास करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’कडून या यंत्राला मागणी आली. तेथे जाऊन रामचंद्र यांना मार्गदर्शन केले. शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी लाभल्याने व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता २४ तास सेवा या उद्देशाने ते कार्यरत असतात. तृणधान्ये, कापूस लागवडीसंबंधीची यंत्रेही तयार करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांशी सतत संपर्क, त्यांच्या गरजा ओळखून यंत्रांवर सतत संशोधन करीत राहण्याची वृत्तीच रामचंद्र यांना पुढे नेण्यास उपयोगी ठरली आहे.

नवी उभारी

कोविडचा काळ कठीण गेला. पूर्वी बारमाही १५ जण कामाला होते. कोविडनंतर सहा ज सध्या कार्यरत आहेत. यातील तीन जण स्थानिक आहेत. कुशल कारागीरही रामचंद्र यांनी घडविले आहेत. व्ही. पास, पल्टी नांगर, ट्रॉली, टँकर व अन्य अवजारेही ते तयार करतात. या उद्योगाच्या बळावर गावातच मुख्य मार्गावर १० हजार चौरस फूट जागा खरेदी करणे शक्य झाले. नव्याने १०० बाय ५० फूट आकाराचे ‘वर्कशॉप’ तयार करण्याचे काम सुरू आहे.

संपर्क ः रामचंद्र महाजन, ८९७५७२३४३२, ९२८४२५५६३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com