Cotton : उत्पादकता वाढीसाठी अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन

जागतिक पातळीवर ३८ महत्त्वाचे कापूस उत्पादक देशांमध्ये क्षेत्रफळात सर्वाधिक १३० लाख हेक्‍टर क्षेत्रासह भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र उत्पादकतेमध्ये भारत एकदम पिछाडीवर असल्याचे दिसून येते. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारने कापसाची गुणवत्ता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातून प्रामुख्याने कोरडवाहू आणि हलक्‍या जमिनीवर लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्रामध्ये सरळ वाण आणि अतिसघन कापूस लागवडीद्वारे उत्पादकता तीन पटीपर्यंत वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

जगभरातील कापूस उत्पादक (Cotton Producer) देशांमध्ये कमी कालावधीत परिपक्‍व होणारे वाण आणि अतिसघन लागवड पद्धतीचा (Intensive Cotton Cultivation Method) स्वीकार केला आहे. त्यामुळे या विकसित देशांची उत्पादकता (Cotton Productivity) ही भारताच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. या देशांमध्ये एकरी सुमारे ४० हजार झाडे बसतील अशा लागवड अंतर शिफारशी आहेत. त्या तुलनेमध्ये भारतीय पारंपरिक लागवडी पद्धतीमध्ये (India's Traditional Cultivation Method) एकरी फक्त सात हजार झाडे बसतात. त्यात पावसावर आधारित कोरडवाहू क्षेत्रामध्ये तर सिंचनाचाही अभाव किंवा अनियमितता असल्यामुळे उत्पादनही अनिश्‍चित राहते. सरासरी उत्पादन (Average Cotton Production) सध्या केवळ एकरी चार क्‍विंटल इतके आहे. कापसाची ही उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने प्रयत्न करत आहे.

काय आहे अतिसघन कापूस लागवड तंत्र?

पारंपरिक पद्धतीत कपाशीमध्ये साडेतीन फूट (१०६.६८ सेमी) बाय एक फूट (३०.४८ से.मी.) लागवड अंतर राहते. त्यानुसार एकरी १० हजार झाडे बसतात. मर व अन्य कारणांमुळे कमी झाल्यानं झाडांची संख्या सरासरी आठ हजार झाडे राहते. अतिसघन लागवड पद्धतीत एकरी झाडांची संख्या २९ हजार ठेवली जाणार आहे. त्यासाठी दोन ओळींत ८० ते ९० सेंटिमीटर आणि दोन झाडांत १५ ते २० सेंटिमीटर अंतराची शिफारस केली आहे. काही कारणामुळे या २९ हजारपैकी चार हजार झाडे मेली, तरी २५ हजार झाडे उत्पादनक्षम राहणार आहेत. त्यात एका झाडावर सरासरी दहा बोंड, प्रति बोंड चार ग्रॅम कापूस असा हिशेब धरला तरी एका झाडापासून ४० ग्रॅम कापसाचे उत्पादन होईल. ही उत्पादकता एकरी सरासरी दहा क्‍विंटल पोहोचू शकते. सध्याच्या एकरी चार क्‍विंटल उत्पादनाच्या तुलनेत ती अडीचपट उत्पादन मिळू शकते.

तेलंगणाची आघाडी

राज्यनिहाय कापूस उत्पादनात महाराष्ट्र (४० लाख हेक्‍टर), तेलंगण (२४ लाख १३ हजार हेक्‍टर) आणि मध्य प्रदेश (६ लाख हेक्‍टर) या राज्यांमध्ये कोरडवाहू कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. याच राज्यांमध्ये अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात तेलंगण सरकारने पुढाकार घेत यंदा ५०० हेक्‍टरवर अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी कमी कालावधीच्या आणि शाखीय (कॅनॉपी) वाढ कमी होणाऱ्या वाणाचा उपयोग केला जाणार आहे. राज्य शासनाने दोन खासगी कंपन्यांशी बियाणे करार केला. उपलब्ध उत्तम बियाणे व अन्य निविष्ठांचा वापर करून अतिसघन पद्धतीने शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करावी. कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी चार हजार रुपये जमा केले जाणार आहे.

Cotton Production
Cotton नवीन वाणास ICAR ची मान्यता| ॲग्रोवन

शेतकऱ्यांचा अनुभव येतोय कामी...

अकोला जिल्ह्यातील मालवाडा (ता. बाळापूर) येथील शेतकरी दिलीप ठाकरे हे गेल्या सात वर्षांपासून अतिसघन पद्धतीने कापूस लागवड करत आहेत. त्यासाठी त्यांनी खास हॅक्यूम यंत्रणेवरील कापूस बियाणे पेरणी यंत्र साडेपाच लाख रुपयांना खरेदी केले. ८० सेंमी बाय २० सेंमी किंवा ९० सेंमी बाय २० सेंमी याप्रमाणे लागवडीतील अंतर ठेवता येते. ९० सेंमी बाय २० सेंमी अंतराप्रमाणे सुमारे २९,०४० झाडे बसतात. पेरणीवेळीच १०ः२६ः२६ एकरी एक बॅग दिली जाते. लागवडीनंतर १५ दिवसांनी शिफारशीत तणनाशकाची फवारणी करतात. त्यानंतर ४० ते ४५ दिवसांनी खुरपणी करतात. ३० दिवसांनी खताचा डोस आणि ४५ दिवसांनी युरिया एकरी ३० किलो दिला जातो. ३५ ते ४० दिवसांनी वाढरोधकाची, तर ४५ ते ६० दिवसांनी कीटकनाशकाची तर ७५ ते ८० दिवसांनी पुन्हा वाढरोधकाची एक फवारणी असे नियोजन असते. पीक निरीक्षण आणि आवश्यकता पाहून चौथ्या फवारणीचा निर्णय घेतला जातो. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ६० टक्‍के कापूस पहिल्या वेचणीतच निघतो. दुसऱ्या वेचणीत २५ टक्‍के व तिसऱ्या वेचणीत १५ टक्‍के कापूस शेवटी वेचला जातो. मर व अन्य कारणांमुळे चार हजार झाडे गेली असे धरले तरी प्रति झाड १५ बोंड, एका बोंडापासून ४ ग्रॅम कापूस असे उत्पादन असा किमान विचार केला तरी एकरी १५ क्‍विंटलचे उत्पादन हाती येते. अतिसघन लागवड पद्धतीमध्ये एकरी २० हजार रुपये खर्च होत असल्याचे दिलीप ठाकरे सांगतात.

Cotton Production
Cotton : कापूस आयातदारांपुढे आयसीए नमेल का?

कमी कालावधीचे वाण असल्यामुळे नोव्हेंबरच्या अखेरीस कापसाचे क्षेत्र रिकामे होते. रब्बीमध्ये हरभऱ्यासारखे पीकही घेणे शक्‍य होते. पारंपारिक लागवड पद्धतीत दोन पाकिटे बियाणे लागतात, तर अतिसघन लागवडीसाठी सहा पाकिटे लागतात. दिलीप ठाकरे यांच्या प्रयोगाविषयी समजल्यानंतर मध्यप्रदेशातील एका सेवाभावी संस्थेने त्यांच्याशी तांत्रिक मार्गदर्शनासाठी संपर्क केला. या संस्थेने आधुनिक पेरणीयंत्र खरेदी केली आहे. त्यामार्फत मध्यप्रदेशात शेतकऱ्यांच्या ५०० एकरवर अतिसघन लागवड केली आहे. आता या संस्थेने त्यांच्या भागात प्रकल्प राबविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन मागितले असता त्याला ठाकरे यांनी तत्काळ संमती दिली. मध्यप्रदेशात सुमारे ५०० एकरावर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याकरिता सयंत्र सेवाभावी संस्थेने विकत घेऊन त्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतावर पेरणी केली आहे.

- दिलीप ठाकरे, ९९२३५८४५०७

अतिसघन लागवडसाठी सुरुवातीला नॉन बीटी किंवा सरळ वाण प्रसारित करण्यात आले होते. त्यात एनएच-६१०५, अंजली, सुरज व अन्य काही वाणांचा समावेश आहे. हे वाणही वापरता येतील. आता नव्याने बीटी श्रेणीतील १४० दिवसात परिपक्व होणारे चार नवे वाण विकसित केले आहेत. ‘बिजी-१’ जनुकाचा समावेश असलेले हे वाण कॉम्पॅक्ट असून अतिसघन लागवड पद्धतीसाठी पोषक आहेत. यातील जनूक गुलाबी बोंडअळीला फारसा प्रतिकार करू शकत नसले तरी हिरव्या बोंड अळीला ते प्रतिकारक आहेत. हे वाण नोटिफाय झाले असून, बियाणांच्या उपलब्धतेसाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे. उत्पादकता वाढ मिळवण्यासाठी कोरडवाहू भागात अतिसघन लागवड तंत्रज्ञान नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास वाटतो.

- डॉ. वाय.जी.प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

प्रमुख देशातील कापूस लागवडीखालील क्षेत्र (हेक्‍टर)

भारत (१२९.५७ लाख), अमेरिका (३५ लाख २१ हजार), चीन (३१ लाख ७ हजार), पाकिस्तान (२१ लाख ८९ हजार), ब्राझील (१४ लाख ४७ हजार) उझबेकिस्तान (१० लाख ३२ हजार), बेनिन (६ लाख १४ हजार), ब्रुकीना (५ लाख ५६ हजार)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com