Irrigation Management : ‘आयओटी’ प्रमाणे प्रत्यक्ष वेळेवरील सिंचन व्यवस्थापन

आपल्या शेतीमध्ये पिकाच्या लागवडीवेळीच वरील पैकी कोणती पद्धत सिंचनासाठी वापरणार हे ठरवून तशी यंत्रणा बसवून घ्यावी. आता पुढील महत्त्वाचे काम पिकास पाणी केव्हा (वेळ) आणि किती (प्रमाण) द्यावयाचे हे निश्‍चित करणे होय.
Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Agrowon

डॉ. सुनील गोरंटीवार

सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करताना पुढील तीन बाबी महत्त्वाच्या ठरतात.

• पाणी कसे द्यावे?

• पाणी केव्हा द्यावे?

• पाणी किती द्यावे?

या पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे सिंचनासाठी आपण वापरणारी पद्धत होय. अधिक कार्यक्षम व्यवस्थापनासाठी आधुनिक सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. उदा. तुषार, ठिबक, सूक्ष्म तुषार इ.

आपल्या शेतीमध्ये पिकाच्या लागवडीवेळीच वरील पैकी कोणती पद्धत सिंचनासाठी वापरणार हे ठरवून तशी यंत्रणा बसवून घ्यावी. आता पुढील महत्त्वाचे काम पिकास पाणी केव्हा (वेळ) आणि किती (प्रमाण) द्यावयाचे हे निश्‍चित करणे होय.

हे ठरवावे लागते ते पुढील चार घटकांवर.

१) जमीन व जमिनीचा प्रकार (महत्त्वाचे म्हणजे जमिनीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता)

२) पीक व पिकाच्या वाढीची अवस्था

३) जमिनीतील ओलाव्याचे (आधीचा ओलावा किंवा पावसामुळे वाढलेला ओलावा आणि आपण सिंचनाद्वारे दिलेले पाणी यांचे) होणारे बाष्पीभवन

४) पिकाच्या दैनंदिन गरजेसाठी आवश्यक पाणी (पर्णोत्सर्जन)

Agriculture Irrigation
Irrigation Benefits Update: वर्धा जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा लाभ

पीकवाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे पर्णोत्सर्जन अधिक बाष्पीभवन (एकत्रितपणे त्याला बाष्पपर्णोत्सर्जन असे म्हणतात.) या प्रक्रियेवर हवामानातील घटकांचा परिणाम होतो. उदा. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाश, पाऊस इ.

म्हणून आपले सिंचन व्यवस्थापन हे हवामानातील घटकांवरही अवलंबून असते. सिंचनाची वेळ, प्रमाण ठरविण्यासाठी वरील चार घटकांसोबतच हवामानातील घटकांचाही विचार करावा लागतो.

कारण यातील जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, हवामानाचे घटक व सिंचन प्रणालीची कार्यक्षमता या बाबी स्थान आणि वेळेप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे त्यांची सविस्तर माहिती घेऊ.

जमिनीचा प्रकार :

प्रत्येक शेताचा जमिनीचा प्रकार व त्याची पाणी धारणक्षमता ही वेगळी असू शकते. जमिनीच्या पाणी धारण करून ठेवण्याच्या क्षमतेनुसार जमिनीचे चार प्रकार पडतात.

१) भारी जमीन : जलधारणाक्षमता अधिक असल्याने दिलेले पाणी जास्त वेळ धरून ठेवले जाते. येथे जास्त पाणी दिल्यास सिंचनाच्या दोन पाळ्यांमधील अंतर जास्त ठेवणे शक्य असते.

२) हलकी जमीन : जलधारणा क्षमता कमी असते, त्यामुळे येथे दोन पाणी पाळ्यातील अंतर हे कमी ठेवावे लागते.

३) अत्यंत हलकी जमीन : हिची जलधारणा क्षमता खूपच कमी असल्याने दोन पाणी पाळ्यांतील अंतर फारच कमी राहते.

४) मध्यम जमीन : भारी आणि हलकी जमीन या दरम्यानचा प्रकार. त्यानुसार पाणी पाळ्यांचे नियोजन करावे लागते.

सिंचन प्रणाली :

प्रत्येक शेतामध्ये वापरात असणारी सिंचन प्रणाली ही वेगळी असू शकते. उदा. दोन शेतकरी ठिबक सिंचन वापरत असले तरी त्यांच्या शेतामध्ये लॅटरलचा व्यास, प्रति मीटर तोट्यांची संख्या, त्यातून उत्सर्जित होणारे पाणी, त्या दाब निर्माण करणारा पाण्याचा पंप या सर्व बाबी वेगळ्या असू शकतात. म्हणजेच त्या प्रणालीची सिंचन कार्यक्षमता ही वेगळी असणार आहे.

हवामान :

आपली शेती असलेल्या विभागातील हवामान हा घटक सिंचनाद्वारे द्यावयाच्या पाणी प्रमाण व वेळ निश्‍चित करण्यातील महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे हवामानामुळेच बाष्पपर्णोत्सर्जनाचे प्रमाण किती असणार हे ठरते.

बाष्पपर्णोत्सर्जन हे प्रत्येक शेतासाठी जरी वेगळे नसले तरी प्रत्येक भाग, गाव यानुसार वेगळे असते. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते रोज वेगवेगळ्या वेळी बदलत असते. थोडक्यात, ते प्रत्येक दिवशी बदलत असते.

पिकाच्या वाढीची अवस्था :

पिकांच्या अंकुरण्यापासून काढणीपर्यंत वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत पिकाची पाण्याची मागणी बदलत जाते. वाढीनुसार पाणी मागणी वाढत जाते. जितका पर्णसंभार अधिक, झाडाची वाढ अधिक तितके बाष्पपर्णोत्सर्जन अधिक ही बाब लक्षात ठेवावी.

या वरील घटकांवर आपले सिंचनाचे व्यवस्थापन (पाणी किती व केव्हा द्यावे?) हे ठरवायचे आहे. बहुतांश शेतकऱ्यांना हे फार अवघड वाटू शकते. पण आपण गेली अनेक वर्षे पिकाला पाणी देत आलो आहोत. तेव्हा जमीन, हवामान यातील अनेक बाबी या अंदाजाने किंवा अनुभवाने गृहित धरून पिकाला पाणी देत असतो.

Agriculture Irrigation
Irrigation Protest in Igatpuri : जमिनीच्या मोबदल्यासाठी जलसमाधीचा इशारा

मात्र अधिक शास्त्रीय काटेकोर सिंचन नियोजनासाठी स्थान व वेळपरत्वे बदलत जाणारे घटक सर्वसाधारण व सरासरी प्रमाणे गृहीत धरावे लागतात. त्यासाठी आपल्या शेत किंवा परिसरातील प्रत्यक्ष वेळेवरील हवामान घटक व अन्य बाबी मिळवाव्या लागतील.

यालाच ‘प्रत्यक्ष वेळेप्रमाणे सिंचन व्यवस्थापन’ (इंग्रजीमध्ये ‘रिअल टाइम इरिगेशन मॅनेजमेंट’ -RTIM) असे संबोधतात. त्यासाठी आपल्याला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी)’ प्रणाली उपयुक्त ठरते. यामध्ये शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या सेन्सरद्वारे पुढील तीन घटकांचे नियमित वेळेवर माहिती गोळा करता येते.

• हवामान आधारित घटक (Weather based)

• जमिनीतील ओलावा आधारित घटक (Soil Moisture based)

• पीक किंवा पीक पर्णामधील पाण्याच्या आधारित घटक (Plant Water or Leaf Water Potential based)

या सर्व बाबींचा विचार करून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ‘हवामान आधारित’ व ‘जमिनीतील ओलावा आधारित’ प्रत्यक्ष परिस्थितीत सिंचन व्यवस्थापनासाठी आयओटीद्वारे प्रणाली विकसित केल्या आहेत.

आणि ‘पिकाच्या किंवा पिकांच्या पानांमधील पाण्याच्या आधारे’ प्रत्यक्ष परिस्थितीमधील सिंचन व्यवस्थापनासाठी आयओटी आधारित प्रणाली विकसित करण्याचे कार्य सध्या प्रगतिपथावर आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ प्रणालीद्वारे हवामान आधारित ‘प्रत्यक्ष वेळेप्रमाणे सिंचन व्यवस्थापन’ करण्यासाठी आवश्यक असणारे, मोबाईल किंवा वेबद्वारे वापरता येऊ शकणारे ‘फुले इरिगेशन शेड्यूलर’ हे संगणकीय प्रारूप विकसित केले आहे. लेखाच्या या भागात ‘फुले इरिगेशन शेड्यूलर’ या मोबाईल ॲप्लिकेशनची थोडक्यात माहिती दिली आहे.

फुले इरिगेशन शेड्यूलर मोबाईल ॲप

मागील लेखामध्ये प्रत्यक्ष वेळेवर (real time) बाष्पपर्णोत्सर्जनाचा अंदाज मिळविण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘फुले जल’ (Phule Jal) या मोबाईल ॲपची माहिती घेतली. ‘फुले जल’ मोबाईल आधारित ॲपसह प्रत्यक्ष वेळेत सिंचन व्यवस्थापनासाठी ‘फुले इरिगेशन शेड्यूलर’ (Phule Irrigation Scheduler) हे मोबाईल ॲपही विद्यापीठाने विकसित केले आहे.

हे ॲप प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध असून, ते वापरणे सोपे आहे. अर्थात, ज्यांना ते वापरण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी विद्यापीठाद्वारे प्रशिक्षणही दिले जाते.

- या ॲपद्वारे कार्यक्षम जलसिंचन व्यवस्थापनासाठी पिकाच्या अवस्थेनुसार जमिनीच्या प्रकाराप्रमाणे व हवामानाच्या विविध घटकांनुसार पिकाची पाण्याची गरज, तसेच वापरात येणाऱ्या सिंचन प्रणालीचे गुणधर्म व कार्यक्षमतेनुसार सिंचनाची पाण्याची गरज यांची माहिती आपल्याला मिळू शकते.

- या ॲपमध्ये आपल्या शेताची नोंदणी करून साठवून ठेवता येते. त्यातून त्या शेतामध्ये विविध पिकांच्या पाण्याची, तसेच सिंचनाची गरज, सिंचन केव्हा द्यावे व सिंचन संच चालू ठेवण्याचा कालावधी इ. माहिती काढता येते.

- या ॲपमध्ये ‘संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन’ काढण्यासाठी आवश्यक वेगवेगळ्या हवामानाच्या घटकांची माहितीही ‘ऑनलाइन’ तसेच ‘ऑफलाइन’ सेवाद्वारे उपलब्ध केली जाते.

- शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या सर्व शेतामधील पिकांची पाण्याची गरज काढण्यासाठी आवश्यक असणारे पुढील चार दिवसांचे बाष्पपर्णोत्सर्जन ऑनलाइन पद्धतीने काढता येते.

- शेतकरी नोंदणी केलेल्या शेताची माहिती बदलू शकतात किंवा अद्ययावत करू शकतात.

- नोंदणी केलेल्या सर्व शेतांचा दिलेला सिंचनाचा अहवाल जतन करणे आणि इतरांना पाठवणेही शक्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com