हवामान बदलातही अधिक पीक उत्पादनासाठी रिफ्रॅक्टेबल रूफ पॉलीहाऊस

लुधियाना (पंजाब) येथील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील कृषी यंत्रे उत्कृष्टता केंद्राचे संचालक प्रो. डॉ. हरीश हिराणी यांनी पॉलिहाउससाठी नावीन्यपूर्ण रिट्रॅक्टेबल छत विकसित केले आहे.
Roof Poly House
Roof Poly HouseAgrowon

लुधियाना (पंजाब) येथील केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील कृषी यंत्रे उत्कृष्टता केंद्राचे संचालक प्रो. डॉ. हरीश हिराणी यांनी पॉलिहाउससाठी नावीन्यपूर्ण रिट्रॅक्टेबल छत विकसित केले आहे. हे छत हवामानाच्या स्थितीनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार स्वयंचलितपणे कार्यरत असेल. हवामानाची आणि पिकाची गरज त्याला पीएलसी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सातत्याने उपलब्ध केली जाईल. या नव्या तंत्रज्ञानामुळे हरितगृहाच्या आतील सूक्ष्म वातावरण पिकाच्या अनुकूलतेनुसार राहते. परिणामी पिकातील सिंचनासाठी पाण्याचे प्रमाणही कमी लागेल. पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादनांचा दर्जा सर्वोत्कृष्ट मिळण्यास मदत होईल. कमी मजुरांमध्ये पिकांचे व्यवस्थापन करता येईल. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये बाह्य वातावरणानुसार झडपा उघडणे, बंद करणे, मिस्टर्स किंवा फॉगर्स चालू-बंद करणे यासाठी अधिक मजूर लागतात.

पारंपरिक हरितगृहामुळे उद्भवणाऱ्या समस्या ः

सामान्य स्थितीमध्ये हवामान घटकांच्या कमी अधिक तीव्रतेमध्ये वनस्पतींची कीड रोगांसंबंधीची प्रतिकारक संरक्षण प्रणालीची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे पिकाचे १५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

-सध्या भारतामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक वातानुकूलनावर आधारित हरितगृह मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. त्यात बाह्य वातावरणानुसार काही प्रमाणात अंतर्गत वातावरणामध्ये बदल करता येत असले तरी पूर्ण नियंत्रण अनेक वेळा शक्य होत नाही.

- या पारंपरिक हरितगृहाचे छत हे स्थिर असून, वाहणाऱ्या वाऱ्यांपासून संरक्षणासाठी अधिक ताकदीचे बनविले जाते. त्यामुळे खर्चात वाढ होते. पारंपरिक पद्धतीमध्ये छत हे स्थिर असल्यामुळे ते कायम बंद राहते. त्यामुळे आतील उष्णता आतच रोखली जाते. आपल्यासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये थंडीच्या दिवसापेक्षा कडक उन्हाचे दिवस अधिक असतात.

-हरितगृहामध्ये सकाळी कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असले तरी त्याचे वितरण समान असेलच असे नाही. हरितगृहामध्ये रोपाची घनता अधिक असल्यामुळे बंदिस्त हरितगृहामध्ये कार्बन डायऑक्साइडची कमतरता राहू शकते. परिणामी, कमी अधिक बाष्पोत्सर्जन, पाण्याचा ताण आणि कीड- रोगांसाठी वनस्पती अधिक संवेदनशील होतात.

-यात हवामानातील घटक उदा. अतिरिक्त उष्णता, सकाळी किंवा संध्याकाळी कमी होणारा सूर्यप्रकाश यांची समस्या उद्‌भवू शकते.

पारंपरिक हरितगृहातील अशा विविध समस्या कमी करण्यासाठी लुधियाना येथील डॉ. हरीश हिराणी यांनी संपूर्ण भारतीय पद्धतीचे रिट्रॅक्टेबल रूप पॉलिहाउस तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये हवामानाच्या बदलत्या स्थितीनुसार वरील छत स्वयंचलितपणे योग्य ते बदल होतात. हवामानातील बदल आणि पिकाची नेमकी आवश्यकता यांचा मेळ घालण्यासाठी पीएलसी सॉफ्टवेअरची मदत घेतली जाते. सध्या नव्या रिट्रॅक्टेबल तंत्रज्ञानावर आधारित ३८४ वर्गमीटर हरितगृह आणि नैसर्गिक वातानुकूलनावर आधारित पारंपरिक हरितगृह उभारली आहेत. त्यात अभ्यास केला जात आहे. दोन्ही हरितगृहांतून आवश्यक तो शास्त्रीय माहिती साठा गोळा केला जात आहे. या माहितीचे विश्‍लेषण केले जात आहे.

काय आहे हे नवे तंत्रज्ञान

रिट्रॅक्टेबल रूफ पॉलिहाउस हे सध्याच्या पॉलिहाउस स्ट्रक्चरमधील सुधारणा आहे. यात नैसर्गिक वातावरण आणि पारंपरिक हरितगृहातील उपयुक्त घटकांचे समावेश केला आहे. यातील वरील छत हे आपल्या गरजेनुसार अंशतः ते पूर्ण उघडता किंवा बंद करता येते. हरितगृहाच्या आतमध्ये ताजी हवा किंवा अधिक सूर्यप्रकाश हवा असल्यास छत पूर्णपणे उघडले जाते.

-हवामानातील कोणत्याही तीव्रता किंवा अभावामुळे होणारे पिकाच्या उत्पादन आणि दर्जावरील परिणाम कमी करणे शक्य.

-यात सध्या प्रामुख्याने काकडी, चेरी टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरची, ब्रोकोली, लेट्यूस, कारले, फुलकोबी, कोथिंबीर, पालक अशा भाजीपाला पिकांवर प्रयोग करण्यात येत आहेत. मात्र सर्व प्रकारची पिके घेणे शक्य आहे. उदा. कार्नेशन, जरबेरा, ऑर्किड इ.

- यात पिकांपर्यंत पोचणारे अवरक्त किरणे रोखून पिकांचे अति तापणे रोखता येते. यामुळे पीक पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये अधिक कार्यक्षमपणे प्रकाश संश्लेषण करू शकते.

- जेव्हा रात्रीच्या वेळी तापमान अत्यंत कमी राहते, अशा वेळी आतील तापमान रोखून ठेवून उष्णता वाढवणे शक्य.

- बाजूच्या झडपांच्या साह्याने आतील आर्द्रतेचे प्रमाण योग्य ठेवता येते.

- हरितगृहामध्ये हवा आणि कार्बन डायऑक्साइडचे सर्वत्र समान वितरण शक्य होते.

- योग्य प्रकाश आणि आर्द्रता यांच्यातील बदलाद्वारे पिकांची योग्य ती वाढ करून घेता येते. गरजेनुसार पूर्ण सूर्यप्रकाशही आत घेता येतो.

- कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी राखणे शक्य असल्यामुळे सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनासाठी उपयुक्त.

शेतकऱ्यांसाठी फायदे ः

-पिकाचे हंगामी आणि बिगरहंगामी असे वर्षभर उत्पादन घेणे शक्य. त्यामुळे अधिक उत्पादन, उत्पन्न मिळू शकते.

-अंतर्गत सूक्ष्म हवामान पिकाच्या वाढीसाठी अधिक उत्तम बनवले जाते. त्यामुळे दर्जेदार उत्पादनात वाढ मिळते.

- कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी, त्यामुळे कीडनाशकावरील खर्चात बचत.

-हवामान नियंत्रणासह अनेक बाबी या स्वयंचलितपणे करणे शक्य असल्याने मजुरांची आवश्यकता कमी होते.

-पिकाच्या व्यवस्थापनावरील अनेक खर्चातही बचत शक्य.

- रोपवाटिकेसाठी उत्तम. इथे रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड बाहेरील शेतामध्ये करणे शक्य.

- या हरितगृहाच्या उभारणी होणारा खर्च ः १५०० ते ३००० प्रति वर्गमीटर. त्यातील स्वयंचलनाची पातळी आणि पिकांनुसार भिन्न.

आधुनिक रिट्रॅक्टेबल छतामध्ये पिकांना खाली उपलब्ध करावयाच्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण, तीव्रता आणि कालावधी ठरवता येतो. त्याच प्रमाणे पिकातील पाण्याचा ताण, आर्द्रता, कार्बन डाय ऑक्साईडची पातळी आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पिकाचे व मातीचे तापमान आवश्यकतेनुसार ठेवणे शक्य होते.
जगदीश माणिकराव, वरिष्ठ शास्त्रज्ञ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com