Farm Implements : शेती मशागतीसाठी कुळवाचे संशोधन...

पेरणी यंत्र कोणतेही असो ते व्यवस्थित चालण्यासाठी कुळवाच्या फासाचे महत्त्व कमी होत नाही. आता मोठ्या आकाराचे ट्रॅक्‍टरने ओढावयाचे कुळवही उपलब्ध झाले आहेत. म्हणूनच कुळव यंत्र शोधणाऱ्याला सलाम! आज या कामाला संशोधन असे कोणीही म्हणणार नाही. पुरातन काळात आजच्यासारखी संशोधन केंद्रे नव्हती. परंतु कल्पक लोकांकडून हे काम सातत्याने चालू होते.
Agriculture Impements
Agriculture ImpementsAgrowon

नांगरणी (Plowing) झाल्यानंतर लहानमोठी ढेकळे निघतात. ही ढेकळे फोडण्यासाठी लाकडाचा ओंडका चारी बाजूने कापून त्याला ओढण्यासाठी बांबूच्या दांड्या लावतात. याला आमचे भागात दिंड तर काही भागात मेलपट म्हणतात. हे उभे आडवे फिरविले की ढेकळे बारीक होतात. त्यानंतर कुळवाच्या (Plow) पाळ्या मारल्या जातात. मला सर्वांत जास्त कौतुक वाटते ते कुळव हे अवजार (Plow Implement) कोणी, केव्हा शोधून काढले त्याचे संशोधनाचे काम.

कुळवाला अडीच ते तीन फूट लांबीचे लोखंडी फास असते. ते जानोळ्याच्या साह्याने दिंडाला जोडले जाते. ओढण्यास बांबूच्या दांड्या असतात. हा कुळव ओढला जात असता पाते मातीखाली १५० ते १८० सेंमीवरून जमिनीला समांतर चालत असते. लाकडी नांगराच्या फाळाने नांगरणी केल्यानंतर दोन नांगरणीच्या तासामध्ये काही भाग बीन नांगरलेला राहू शकतो.

कुळवाच्या फासातून असे राहिलेले लहान मोठे भाग मोडले जाऊन एका ठरावीक उंचीपर्यंत सर्व जमीन पूर्ण भुसभुशीत केली जाते. अशी एक ठरावीक पातळीपर्यंत जमीन भुसभुशीत करणे मागे मोठे शास्त्र दडलेले आहे. सर्व ढेकळे मोडून बारीक एकसारखी माती झाल्यानंतर एकरी वीस ते पंचवीस गाड्या सेंद्रिय खत रानात विस्कटून शेवटच्या कुळवाच्या पाळीत ते मातीत पूर्णपणे मिसळले जाते. त्यानंतर जमीन पेरणीसाठी तयार केली जाते.

Agriculture Impements
Agriculture Technology : देशी गोधन संवर्धनात वाढणार तंत्रज्ञान वापर

मला हे ७५ ते ९० सें.मी. रुंद पाते बसविणाऱ्याचे कौतुक वाटते. यासाठी, की त्यानंतर आपण रानात पेरणी यंत्राने पेरणी करणार असतो. पेरणी यंत्राचे दात एका ठरावीक उंचीवरून जाताना एकसारखे बसून जाणे गरजेचे असते. मध्ये त्याच्या हाताला बीन नांगरलेला जमिनीचा भाग लागल्यास पेरणी यंत्र एकसारखे बसून न जाता वर खाली डगडगत पुढे जाते. असे झाल्यास पेरक्याने चाड्यात सोडलेले दाणे सर्व नळ्यात एकसारखे न पडता एकात जास्त किंवा एकात कमी असे पडतात. ओळीत काही ठिकाणी बी जास्त पडते, तर काही जागा रिकामी राहू शकते.

चारी अगर सहा नळ्यातून एकसारखी पेरणी होण्यासाठी सर्व जमीन एकसारखी भुसभुशीत असणे गरजेचे आहे. पेरणीचे यंत्र इतर अवजारांच्या तुलनेत कमी मजबूत असते. एखाद्या जिवंत जमिनीत दात अडकला तर मोडूही शकतो. असे झाल्यास कामाचा खूप खोळंबा होऊ शकतो. पेरणी करीत असता कुरक्‍या बैल समांतर ओळीत चालविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या कामात त्याचे दोन्ही हात अडकलेले असतात. वळशाला एका हाताने उचलून पेरणी यंत्र सरळ ओळीत आणावे लागते. यासाठी यंत्र हलके केलेले असते.

पेरणीचे काम हे शेतीत एक महत्त्वाचे काम आहे. पेरणी करणाऱ्याला पेरक्‍या म्हटले जाते. गावात या कामात फार थोडे लोक तज्ज्ञ असतात. त्यांनाच सर्व गावाची पेरणी करावी लागते. पेरणी दाट अगर पातळ होऊन चालत नाही. योग्य मापात बी सोडणे गरजेचे असते. मी स्वतः हे काम शिकलो आहे. आपले क्षेत्र आपण स्वतःच पेरले पाहिजे, ही त्यामागील भावना होती. तरुण वयात बरीच वर्षे मी स्वतः भात पेरणी करीत असे. त्यामुळे पेरणी, पेरणी यंत्र, पूर्वमशागत या कामातील बरेच बारकावे शिकता आले. पुढे माझे मुलानेही हे काम आत्मसात केले. आता विना नांगरणी पद्धतीत पेरणीयंत्राने पेरणे बंद झाले.

Agriculture Impements
Agriculture Technology : चारा पीक उद्यानातून तंत्रज्ञान प्रसार

मशागत आणि पेरणी यंत्रातील बदल

खरीप पिकाच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांसाठी पेरणी यंत्रे थोडी जास्त बळकट केलेली असतात. कारण पेरणी खोल केली जाते. मध्यंतरी कृषी खात्याने दुचाडी पेरणी यंत्रे वापरण्याची शिफारस केली होती. एका चाड्यातून धान्य, कडधान्य आणि दुसऱ्या चाड्यातून खताचा पहिला हप्ता पेरून देता यावा, यासाठी हे नियोजन होते. कालौघात अपवाद वगळता ही यंत्रे लुप्त झाली.

स्वयंचलित ट्रॅक्‍टरने ओढावयाची यंत्रे आज बहुतेक ठिकाणी वापरली जातात. या कामातील मानवी कौशल्याचा भाग कमी होऊन यांत्रिक कौशल्य विकसित होते आहे. या यंत्राने एकाच वेळी समपातळीत बी आणि खत पेरणे शक्‍य होते. एखाद्या पिकाचे दोन ओळीतील अंतर आणि ओळीतील दोन दाण्यांतील अंतर गरजेप्रमाणे कमी जास्त करण्याची सोय आहे.

Agriculture Impements
Senser Technology : अत्याधुनिक सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे अचूक शेतीला मदत

पेरणी यंत्र कोणतेही असो ते व्यवस्थित चालण्यासाठी कुळवाचे फासाचे महत्त्व कमी होत नाही. आता मोठ्या आकाराचे ट्रॅक्‍टरने ओढावयाचे कुळवही उपलब्ध झाले आहेत. म्हणूनच कुळव यंत्र शोधणाऱ्याला सलाम! आज या कामाला संशोधन असे कोणीही म्हणणार नाही. पुरातन काळात आजच्यासारखी संशोधन केंद्रे नव्हती. परंतु कल्पक लोकांकडून हे काम सातत्याने चालू होते.

एखादे पीक ओळीत पेरल्याने त्याची पुढील निगराणी करणे सोपे होते. पीक उगवणीबरोबर रानात तणही उगवते. प्राचीन काळात कोणाच्या तरी असे लक्षात आले असावे की, पिकाबरोबर तणही उगविते. ते मुक्त वाढू दिले तर पिकाला झाकून टाकते. पिकाचा सूर्यप्रकाश अडविला जातो. पाणी व अन्नद्रव्यांसाठी पिकाबरोबर स्पर्धा होते. यामुळे वेळीच तण काढणे गरजेचे आहे.

हे काम सोपे करणे आवश्यक आहे. पिकाच्या दोन ओळींमधील जागा रिकामी असते. तेथे कोळप्यासारखे अवजारे फिरविल्यास बऱ्याच रानातील तण कमी होईल. पिकाच्या ओळीतील तणे फक्त हाताने भांगलणी अगर निंदणी करणे सोपे जाईल. कमीत कमी मजुरामध्ये काम करण्याची गरज प्राचीन काळापासूनही शेतकऱ्यात आहे, हे यातून दिसून येते. या कामासाठी कोळप्यांची निर्मिती झाली.

सुरुवातीला दोन ओळींमध्ये चालविण्याचा अखंड फास असणारे आणि त्यानंतर फासाला मध्ये फट असणारे कोळपे असे दोन प्रकार तयार झाले. फटाचे कोळपे पिकाची ओळ फटीमध्ये ठेवून मारल्याने पिकालगतची तणे बऱ्यापैकी काढली जात. ही कोळपी चालविण्यासाठी दोन माणसांची गरज असते. एक ओढायला व एक मागे कोळपे धरायला. धरणारा माणूस एका हाताने लुमणे धरतो व दुसऱ्या हातात हिसकी (इंग्रजी वाय आकाराची काठी) धरून कोळप्याला दिशा देण्याचे काम करतो, जेणेकरून फास पिकात जाणार नाही. अशा प्रकाराची कोळपणी खूप वर्षे चालू होती व आजही आहेत.

पुढे काही कारागिरांनी हाताने ओढावयाचा आणि उलटे मागे मागे जाण्याचे कोळपे आणि पुढे सायकलचे चाक असणारा सायकल कोळपे अशी एका माणसाने ओढण्याची कोळपी शोधून काढली. या कोळप्यांना दोन ऐवजी एकाच माणसाची गरज असते. एक माणसाची बचत होते, यासाठी मी अशी कोळपी घेतली. ही कोळपी स्वतः चालवून बघितली. एक माणसासाठी हे काम कष्टदायक होते. त्याची लवकर दमछाक होते. यापेक्षा पूर्वीची दोन माणसांची कोळपीच बरी हे अनुभवातून शिकलो. आडवे फास लावण्याऐवजी ३ ते ४ उभे दात लावलेली दातेरी कोळपीही उपलब्ध आहेत. थोडी कठीण जमीन असल्यास ही योग्य ठरतात.

१९४६ मध्ये २-४ डी या पहिल्या तणनाशकाचे आगमन झाले आणि रसायन फवारून तण नियंत्रण असे एक नवीन तंत्र उदयाला आले. सुरुवातीला शेतकऱ्यांनी त्याकडे पाहिले नाही; परंतु स्वस्त, सुलभ, जलद काम होते. मजूर टंचाईमुळे आज सर्वत्र तणनाशकाचा वापर वाढत आहे. यात पीक व तण उगवणीपूर्वीचे, उगविल्यानंतरचे निवडक, अनिवडक असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. २०११ पासून मी १०० टक्के तण नियंत्रण रसायनाकडूनच करतो. जागेला तणे मोठी जून करून मारून त्याचे रानात सेंद्रिय खत तयार करतो. मिळणाऱ्या खतातून तणनाशकाचे पैसे वसूल करतो. यावर यापूर्वी चर्चा झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com