भविष्यात ऊसतोडणीसाठी यंत्रमानवच लागतील

जयप्रकाश दांडेगावकर ः साखर परिषदेच्या पूर्वतयारी निमित्त पत्रकार परिषद
भविष्यात ऊसतोडणीसाठी यंत्रमानवच लागतील
SugarcaneAgrowon

पुणे ः ऊसतोडीसाठी (Sugarcane Harvesting) सध्या जाणवत असलेला मनुष्यबळाचा तुटवडा (Manpower Shortage) आणखी तीव्र होत जाईल. त्यामुळे हार्वेस्टरप्रमाणेच भविष्यात ऊस तोडणारे यंत्रमानवदेखील (Robot For Sugarcane Harvest) तयार करावे लागतील. त्यासाठी ‘व्हीएसआय’ने संशोधन केल्यास साखर उद्योगातून पाठबळ मिळेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले.

राज्यस्तरीय साखर परिषदेच्या पूर्वतयारी निमित्ताने दांडेगावकर यांनी बुधवारी (ता. १) वार्ताहरांशी संवाद साधला. ‘‘पुढील पाच-सात वर्षानंतर ऊसतोडीसाठी मजूर मिळणार नाहीत. अशावेळी यांत्रिकीकरणावरच सर्व अवलंबून असेल. त्यामुळे यंत्रमानव किंवा हार्वेस्टरवरील संशोधन मोलाचे ठरेल,’’ असे ते म्हणाले. ‘‘माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे साखर उद्योगाला दिशा मिळाली आहे. हा उद्योग आता साखर नव्हे तर ऊर्जा निर्मितीभोवती केंद्रित झालेला आहे. त्यामुळे ही साखर परिषद राज्यातील सर्व कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘गेले दोन हंगाम वगळता साखर कारखानादारीला आतापर्यंतचे सर्व हंगाम अडचणीचे गेलेले आहेत. उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत साखर विकली गेल्याने ताळेबंद अडचणीत आले व नक्तमूल्य उणे झाले. त्यामुळे कारखान्यांना बॅंकांनी कर्जे नाकारली. अशा स्थितीत कारखान्यांना इथेनॉल, हायड्रोजन अशा नव्या ऊर्जानिर्मितीकडे क्षेत्राकडे जाण्याची इच्छा असूनही कोंडी झालेली आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी तसेच विविध सवलती मिळण्यासाठी आम्ही केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करीत आहोत,’’ असेही दांडेगावकर यांनी नमूद केले.

साखर उद्योग हा सरकारला सर्वाधिक कर मिळवून देणारे क्षेत्र आहे. आतापर्यंत सरकारने या उद्योगाला भांडवल दोन हजार कोटींचे दिले; पण करसंकलन सहा हजार कोटींच्या पुढे केले आहे. कोणत्याही तालुक्यात सरकारी निर्मिती रोजगारापेक्षा जास्त रोजगार देण्याचे काम साखर कारखाने करीत आहेत. त्यामुळे या उद्योगाला प्रोत्साहन देण्याची भूमिका सरकारी धोरणांमध्ये आली पाहिजे, असे ते म्हणाले.

हार्वेस्टर, ड्रोन, पालश व सीबीजीवर संशोधन

दरम्यान, ऊस यांत्रिकीकरणात व्हीएसआयकडून वेगाने संशोधन सुरू आहे. ‘‘भारतीय ऊस शेतीला उपयुक्त ठरणारे हार्वेस्टर तसेच ड्रोन, सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) व पालश निर्मितीबाबत व्हीएसआयचे शास्त्रज्ञ संशोधन सुरू आहे,’’ असे व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले. तसेच राज्याचा साखर उद्योग आता साखरेकडून इथेनॉलकडे वळाला आहे; पण भविष्य मात्र हायड्रोजनआधारित ऊर्जा निर्मितीचे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com