
Poultry Farming News : कोंबड्यांमध्ये राणीखेत (मानमोडी, न्यू कॅसल) हा आजार सर्वाधिक आढळतो. तो होऊ नये, यासाठी ब्रॉयलर (broiler), गावरान अशा दोन्ही कोंबड्यांना (Chicken) लसीकरण केले जाते. कोंबड्यांना लसीकरण केल्यानंतर वाढलेली प्रतिकारशक्ती सामान्यतः अडीच महिन्यांत कमी होऊ लागते.
त्यामुळे पहिल्या लसीकरणानंतर दोन ते अडीच महिन्यांनी बूस्टर लस देण्याची शिफारस केली जाते. मात्र ॲन्टीबॉडी टायटर (रोग प्रतिकारशक्ती) न तपासताच लसीकरण केले जाते. कोंबड्यांमध्ये प्रतिकारशक्ती असताना त्याचा वापर निरर्थक आणि नाहक खर्चिक ठरतो.
ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कुक्कुटपालन शास्त्र विभागाने कोंबड्यांचे रक्त नमुने घेण्याच्या तंत्रामध्ये काही बदल करून छोटेसे किट तयार केले आहे.
असे आहे किट
या किटमध्ये काही फिल्टर पेपर आणि रक्त काढण्यासाठी एक सुईसारखी पिन इतकेच आहे. शेतकरी ही सुई टोचून कोंबडीचे बाहेर येणारे रक्त एका फिल्टर पेपरने शोषून घेतो.
आपल्या फार्ममधील सुमारे पाच टक्के इतक्या कोंबड्यांच्या रक्तांचे फिल्टर पेपर सामान्य वातावरणामध्ये प्रयोगशाळेत पाठवता येतात.
प्रयोगशाळेमध्ये हे फिल्टर पेपर ‘ब्रीज-३५’ किंवा ‘पीबीएस (फॉस्फेट बफर सलाइन)’ या रसायनात टाकले जातात.
त्यानंतर त्यावरील रक्तपेशी पुन्हा मूळ अवस्थेत येतात. त्यांचे विश्लेषण आपल्या सामान्य द्रवरूप रक्ताप्रमाणे केल्यानंतर रक्तातील प्रतिपिंडांचे (ॲन्टिबॉडीज) प्रमाण मोजता येते.
- ही प्रतिपिंडे प्रमाणित पातळीपेक्षा कमी असल्यास लसीकरणाचा सल्ला दिला जातो.
- जर योग्य प्रमाणात प्रतिपिंडे आढळल्या तर लसीकरणाची आवश्यकता नसते.
- तपासणीसाठी पाच टक्के (म्हणजे १०० पैकी ५) कोंबड्यांचे रक्त घेऊन तपासणी केली, तरी आपल्याला व्यवस्थित अंदाज येऊ शकतो.
- या तंत्राला ‘ड्राइड ब्लड स्पॉट टेक्निक’ असे म्हणत असल्याचे विभाग प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांनी सांगितले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डॉ. सिद्धार्थ पवार व डॉ. अर्चना पाटील यांनी हे संशोधन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.