
औरंगाबाद : ‘‘तीन वर्षे अनुभव घेऊन शेतकऱ्यांना १०० टक्के खात्री पटल्यावरच चालू वर्षी सगुणा राइस तंत्र (Saguna Rice Technique) (शून्य मशागत) राज्यभर व्यापक प्रमाणावर राबविण्याचे धोरण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने (POCRA Project) (पोकरा) स्वीकारले. त्यानुसार ५०० अधिकाऱ्यांना आणि २००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी अभ्यास दौरे आयोजित केले जात आहेत,’’ अशी माहिती ‘पोकरा’चे कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी दिली.
कोळेकर म्हणाले, ‘‘या तंत्राच्या आधारे राज्यात खरिपात भात, कापूस, सोयाबीन व मका आणि त्याच बेडवर रब्बीत हरभरा, मका, गहू, झेंडू, वाल, भुईमूग अशी विविध पिके घेतली जात आहेत. कोल्हापूर भागात प्रताप चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस देखील घेतला जात आहे. राज्यात प्रत्येक विभागात शून्य मशागत तंत्र स्वीकारणारे शेतकरी आहेत. भातामध्ये याची सुरुवात कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे यांच्या सगुणा बाग नेरळ येथे दहा वर्षांपूर्वी झाली. कृषी विभागाने या तंत्राच्या प्रसारासाठी भात पिकविणाऱ्या सर्व जिल्ह्यांत प्रयत्न केले.’’
२०१८ पासून भाताशिवाय इतर पिकांत हे तंत्रज्ञान लागू होते किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाने ‘पोकरा’ क्षेत्रात शेतीशाळा घेतल्या. राज्यस्तरावर ‘एसआरटी’चा प्रशिक्षक गट नेमला आहे. त्यामध्ये सगुणा रूरल फाउंडेशन मार्फत चंद्रशेखर भडसावळे, अनिल निवळकर, योगेश बनसोडे, सुरेश बेडवाल, गुलाबराव खंडागळे, प्रताप चिपळूणकर, नवीनचंद्र बोऱ्हाडे, रसिका फाटक यांना प्रशिक्षक म्हणून घेतले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात प्रशिक्षक बेडवाल यांच्याकडे ९६३ शेतकरी व १०५ अधिकाऱ्यांनी भेट दिली. तर खंडागळे यांच्याकडे ६५० शेतकरी आणि १०३ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. उत्पादन खर्चातील ५०-६० टक्के बचत, मजुरांवरील अवलंबित्व संपुष्टात आणणे, दोन पिकांमधील अंतर संपणे, उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांचा ताण कमी, असे फायदे झाले.
सर्व पिकांचे मिळून मशागतीविना शेतीचे सुमारे ५००० एकर क्षेत्र आहे. अजून शून्य मशागत हा विषय कृषी विभागाच्या लक्ष्यांकामध्ये आलेला नाही. त्यामुळे कृषी सहायक पातळीवर आणि वरिष्ठ पातळीवर याचा आढावा होत नाही. परिणामी, शून्य मशागत अवलंबलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित होत नाही. त्यामुळे सध्या सगुणा रूरल फाउंडेशनकडे आणि ‘पोकरा’मध्ये नोंद होत असलेल्या माहितीच्या आधारे या तंत्राने शेतीचा क्षेत्रविस्तार होत असल्याची स्थिती आहे.
अंदाजे एसआरटी तंत्र आधारित क्षेत्र
विदर्भ...४०० हेक्टर
मराठवाडा...५०० हेक्टर
कोकण...६०० हेक्टर
पश्चिम महाराष्ट्र... ११०० हेक्टर
खानदेश...१०० हेक्टर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.