‘झेबा’ तंत्राने १० हजार एकरांवर ऊसशेती

‘यूपीएल’ आणि ‘श्रीनाथ’मध्ये करार
‘झेबा’ तंत्राने १० हजार एकरांवर ऊसशेती
SugarcaneAgrowon

पुणे ः कृषी निविष्ठा क्षेत्रातील जगप्रसिद्ध यूपीएल कंपनीने श्रीनाथ म्हस्कोबा शुगर मिलसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, आता दहा हजार एकरांवर झेबा तंत्रज्ञानाच्या (Zeba Technique) मदतीने ऊसशेती (Sugarcane Farming) केली जाणार आहे.

‘यूपीएल लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ, प्रादेशिक संचालक आशिष डोभाल तसेच ‘श्रीनाथ म्हस्कोबा’चे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पुणे जिल्ह्यातील ७० गावांमधील चार हजार शेतकऱ्यांना या कराराचा लाभ होईल. ‘झेबा’मुळे शेतमालाच्या उत्पादनात किमान १५ टक्के वाढ होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भरीव वाढ होईल, असा दावा या दोन्ही संस्थांनी केला आहे.

श्रॉफ म्हणाले, “उसावर झेबा तंत्राच्या चाचण्या आम्ही पाच वर्षांपासून घेत आहोत. ‘व्हीएसआयर’ व राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्राचाही यात सहभाग आहे. पर्यावरणपूरक ऊस उत्पादन व शुध्द साखर निर्मिती असे दोन्ही हेतू या तंत्रातून साधले जातील. जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना उत्तम पर्याय देण्याची क्षमता या तंत्रात आहे.”

‘झेबा’द्वारे ऊस शेतीत ६०० कोटी लिटर पाणी व ५०० टन युरियाची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील दहा आणि महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामधील साडेबारा हजार शेतकऱ्यांच्या २५ हजार एकर शेतीत ‘झेबा’चा वापर करण्यात आला. “या तंत्रामुळे ऊस उत्पादनात ५० टक्के वाढ झाली. उत्पादकता एकरी ३५ ते ४० टनापासून वाढत जात थेट ५० ते ८० टनापर्यंत पोचली,” असे ‘युपीएल’चे डोभाल यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमात समावेश झालेल्या शेतकऱ्यांना कृषी सल्ला दिला जाईल. संपूर्ण पीक संरक्षण व पोषण उत्पादने, यांत्रिक सुविधा, फवारणी, पीक विमा तसेच वैद्यकीय विमा पुरवला जाईल. शेतकऱ्यांना स्वतःची ऊस बेणे रोपवाटिका तयार करण्यास व त्याद्वारे इतर शेतकऱ्यांना शुध्द बेणे विक्रीतून अधिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राऊत म्हणाले, “आम्ही प्रयोगशील शेतीतून उसाची हेक्टरी उत्पादकता ९० टनावरुन १२० टनापर्यंत नेली आहे. मात्र, ‘झेबा’मुळे हीच उत्पादकता १५० टनाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. ऊसशेतीत जादा वापर होत असल्याचा गैरसमज पसरविला जातो आहे. ‘युपीएल’च्या मदतीने आम्ही ‘कमी पाण्यात अधिक ऊस’ अशी संकल्पना राबविणार आहोत.”

काय आहे झेबा तंत्रज्ञान?

- मक्यातील स्टार्चपासून तयार उत्पादनाचा वापर

- या उत्पादनात स्ववजनाच्या ४५० पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता

- पूर्णतः पर्यावरणपूरक व जैवविघटनाची क्षमता असलेल्या या उत्पादनामुळे भूसुधारणा होते

- सहा महिन्यांपर्यंत मातीमध्ये प्रभावी व सूक्ष्मजीवांची वाढ होते

- कमी पाण्यात पिके वाढतात. सिंचन, वीज, खतांच्या खर्चात बचत

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com