एकात्मिक सिंचन प्रणालीतून ​शाश्‍वत शेती शक्य: जैन

‘जैन ऑटोमेशन व ठिबक सिंचन तंत्रामुळे अचूक खतांचे व्यवस्थापन व मजूर खर्चात बचत होते आहे. आता अतिसघन आंबा लागवड (Mango Cultivation) पद्धतदेखील आणली गेली आहे.
Irrigation
IrrigationAgrowon

पुणे ः ‘‘अन्न सुरक्षेची समस्या हाताळण्यासाठी भविष्यात नैसर्गिक संसाधनांचा वापर काटेकोरपणेच करावा लागेल. अशावेळी शाश्‍वत शेती उपयुक्त ठरेल आणि ती केवळ एकात्मिक सिंचन प्रणालीतूनच शक्य होईल,’’ असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे (Jain Irrigation) सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले.

​​‘नाबार्ड’च्या पुणे विभागीय कार्यालयाच्या स्थापना दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक एस. जी. रावत, रिझर्व्ह बॅंकेचे प्रादेशिक संचालक अजय मिश्यारी, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. बी. विजय कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर उपस्थित होते.

जैन म्हणाले, “जैन इरिगेशनने सतत संशोधन केले. त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादन वाढले. त्यांचा आर्थिक विकास (Economic Development) झाला. यामुळे ८० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडून आला. दक्षिण आफ्रिकेसह भारतात एकात्मिक सिंचन प्रणालीचे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे सूक्ष्म व दीर्घ अर्थव्यवस्थेत, पायाभूत सुविधा व कृषिक्षेत्रात, भांडवल व मजुरांची उपलब्धता आणि उत्पादकता, खर्च आणि मूल्य यांच्यात ताळमेळ घातला जात आहे. शाश्‍वत विकासाचा हाच प्रयत्न आहे.”

‘‘जैन ऑटोमेशन व ठिबक सिंचन तंत्रामुळे अचूक खतांचे व्यवस्थापन व मजूर खर्चात बचत होते आहे. आता अतिसघन आंबा लागवड (Mango Cultivation) पद्धतदेखील आणली गेली आहे. ठिबकवर भात शेतीच्या (Paddy) यशस्वी प्रयोगातून ४० टक्के उत्पादनात वाढ, तर पाण्यात ७० टक्क्यांपर्यंत बचत होते आहे. स्प्रिंकलर आणि ठिबकद्वारे ऊस शेतीतून (Sugarcane Cultivation) शेतकरी समृद्धीचा मार्गावर आले आहेत,” असेही जैन यांनी स्पष्ट केले.

‘नाबार्ड’च्या कृषी विकासविषयक विविध उपक्रमांचा आढावा या वेळी रावत यांनी घेतला. बुचकेवाडीचे सरपंच सुरेश गायकवाड, सांगलीमधील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे वैभव फणसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com