संकरित भात लागवडीचे तंत्र

संकरित भात लागवड एक काडी असल्याने हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते. प्रत्येक वर्षी संकरित जातीचे नवीन बियाणे वापरावे. कालावधीनुसार हळव्या जातीची लागवड १५ बाय १५ सेंमी आणि निमगरव्या व गरव्या जातीची लागवड २० बाय १५ सेंमी अंतरावर करावी.
संकरित भात लागवडीचे तंत्र
Paddy Agrowon

डॉ. बी. डी. वाघमोडे, डॉ. पी. बी. वणवे

-------------------------------

संकरित भात तंत्रज्ञान (Hybrid Paddy Techniques) हे एक काडी भात लागवडीचे (Paddy Cultivation) तंत्रज्ञान म्हणून प्रसिद्ध झाले आहे. एक काडी भात लागवड करून देखील संकरित जातीस भरपूर फुटवे येतात, भरघोस उत्पादन (Paddy Production) मिळते.

भात रोपवाटिका ः

१) पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची उभी आडवी नांगरट करावी. प्रति गुंठा क्षेत्रास अर्धा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून घ्यावे.

२) एक हेक्टर क्षेत्रावर लावणीसाठी १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. रोपवाटिका गादीवाफे, सपाट वाफे, ओटे करून, रहू पद्धत, दापोग पद्धत तसेच सेंद्रिय पद्धतीने तयार करता येते.

३) संकरित भात लागवड एक काडी असल्याने हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते. प्रत्येक वर्षी संकरित जातीचे नवीन बियाणे वापरावे.

४) संकरित भात बियाणे प्रत्येक वर्षी नव्याने खरेदी करावे लागते. बीज प्रक्रिया केलेली आहे याची खात्री करूनच विकत घ्यावे. बीज प्रक्रिया केलेली नसल्यास २ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.

५) रोपवाटिकेसाठी तयार केलेल्या क्षेत्रामध्ये १ ते १.२ मीटर रुंद, ८ ते १० सेंमी उंच आणि जमिनीच्या उतारानुसार आवश्यक लांबीचे गादीवाफे तयार करावेत. वाफ्यात प्रति गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया किंवा २ किलो अमोनिअम सल्फेट, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते मातीत मिसळावीत. नंतर वाफ्यावर रुंदी समांतर ७ ते ८ सेंमी अंतरावर ओळी काढून २ ते २.५ सेंमी खोलीवर बी पेरून मातीने झाकून घ्यावे.

६) रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खत द्यावे.

७) गादीवाफ्यावर पेरणी केल्यामुळे मुळाजवळील जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे रोपे पुनर्लागवडीसाठी काढण्यास सोपी पडतात. ओळीत पेरणी केल्याने तण काढण्यासाठी सोपे होते. अशा तऱ्हेने रोपवाटिका केल्यास राब भाजण्याची आवश्यकता नाही.

लागवडीचे तंत्र ः

१) जमिनीची २ ते ३ वेळा उभी आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. लावणीपूर्वी साधारण दोन आठवडे १० टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत शेतात पसरावे किंवा १० टन प्रति हेक्टर गिरिपुष्पाचा पाला चिखलणीच्यावेळी जमिनीत गाडावा. चिखलणी करण्यासाठी डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ‘पंकज’ हे अवजार वापरावे.

२) पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. या वेळी रोपांना ५ ते ६ पाने आलेली असतात. गादीवाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी दोन दिवस अगोदर भरपूर पाणी द्यावे. रोपे लावताना ती जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोपे सरळ व उभी लावावीत.

३) एका आव्यात १ ते २ रोपे लावावीत. कालावधीनुसार हळव्या जातीची लागवड १५ बाय १५ सेंमी आणि निमगरव्या व गरव्या जातीची लागवड २० बाय १५ सेंमी अंतरावर करावी.

खत व्यवस्थापन

१) प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश चिखलणीच्या वेळी द्यावे किंवा मिश्र खत १५:१५:१५ प्रति गुंठा क्षेत्रास ३.३५ किलो या प्रमाणात द्यावे. नंतर ४० किलो नत्र खताची दुसरी मात्रा फुटवे येण्याच्यावेळी आणि २० किलो नत्र खताची तिसरी मात्रा पीक फुलोऱ्यावर आल्यावर द्यावी.

पीक व्यवस्थापन ः

१) लावणीनंतर सुमारे एक आठवडा रोपे चांगली मुळे धरेपर्यंत पाण्याची पातळी २ ते ५ सेंमी ठेवावी. यानंतर दाणे पक्व होईपर्यंत पाण्याची पातळी ५ सेंमी ठेवावी. लोंब्या येण्याच्या १० दिवस पूर्वी व नंतर खाचरात १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.

२) आंतरमशागत (कोळपणी) करताना पाणी कमी ठेवावे. तसेच वरखते देण्याच्या वेळेस व अधूनमधून पाण्याचा निचरा करावा. वरखते दिल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा ५ सेंमी इतके पाणी भरावे.

३) वरखताचा पहिला हप्ता देण्यापूर्वी बेणणी करावी आणि खत दिल्यानंतर कोळपणी करावी. कोळपणी करण्यासाठी जपानी भात कोळपे अथवा कोनो विडरचा वापर करावा.

संकरित जाती

जात ---कालावधी (दिवस) ---दाण्याचा प्रकार ---उत्पादन (क्विं/हे.) ---प्रसारित विभाग

सह्याद्री ---१२५-१३० ---लांबट बारीक ---६०-६५ ---खार जमिनीसहित महाराष्ट्र राज्य

सह्याद्री २ ---११५-१२० ---लांबट बारीक ---५५-६५ ---महाराष्ट्र राज्य

सह्याद्री ३ ---१२५-१३० ---लांबट बारीक ---६५-७५ ---महाराष्ट्र राज्य

सह्याद्री ४ ---११५-१२० ---लांबट बारीक ---६०-६५ ---महाराष्ट्र, प.बंगाल, पंजाब, हरियाना, उ.प्रदेश

सह्याद्री ५ ---१४०-१४५ ---लांबट बारीक ---६५-७० ---कोकण विभाग पाणथळ क्षेत्र

------------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. बी. डी. वाघमोडे, ९४०४५८०४१६

(प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com