तंत्र कांदा साठवणुकीचे...

कांद्याची योग्य वेळी काढणी करून चांगला सुकविल्यास त्याची प्रत उत्तम राहते. शास्त्रीय पद्धतीने कांद्याची साठवणूक केल्यास नुकसान कमी होते. चांगला सुकविलेला कांदा चाळीमध्ये साधारण ५ ते ६ महिने चांगला राहतो.
Onion
OnionAgrowon

डॉ. कल्पना दहातोंडे, डॉ. मधुकर भालेकर, धनश्री पाटील

महाराष्ट्रात तीनही हंगामांत कांद्याची लागवड केली जाते. मुख्यतः रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. सध्या बऱ्याच ठिकाणी कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. लागवडीनंतर साधारण ११० ते १४० दिवसांत कांदा काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाल्यानंतर नवीन पात येण्याची क्रिया थांबते. पातीचा रंग पिवळसर होतो. वरच्या पातीचा भाग मऊ होऊन आपोआप वाळतो आणि पात कोलमडते. यालाच ‘मान पडणे’ असे म्हणतात. साधारण ५० टक्के कांद्याच्या पाती पडल्यानंतर कांदा काढणीस सुरुवात करावी. या काळात कांदा पक्व होऊन त्यात साठवणुकीसाठी आवश्यक असलेले बदल घडून येतात. तसेच या काळात कांद्याच्या मानेची जाडी कमीत कमी असते.

बाजारातील चढउतारामुळे कांद्याच्या दरात कायम अस्थिरता असते. त्यासाठी काढणीनंतर कांद्याची योग्यप्रकारे साठवणूक करून चांगला बाजारभाव असताना विक्री करणे फायद्याचे ठरते. यासाठी कांदा काढणी आणि साठवणुकीदरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

काढणीनंतर पातीसह कांदा वाळविणे ः

- काढणीनंतर कांदा शेतात पातीसह ३ ते ५ दिवस वाळवावेत. या कालावधीत कांदा पातीमध्ये निर्माण झालेले, साठवणुकीत कांद्याला सुप्तपणा देणारे जीवनसत्त्व हे हळूहळू पातीमधून कांद्यामध्ये उतरत असते. त्यामुळे पात सुकेपर्यंत कांदा शेतात वाळविणे गरजेचे असते.

- वाळविताना शेतामध्ये कांद्याचे ढीग करून ठेवू नये. जमिनीवर एकसारखे पसरवून वाळवावेत. पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल याची काळजी घ्यावी.

कांद्याची मान ठेवून पात कापणे ः

- कांदा पात शेतामध्ये चांगली वाळविल्यानंतर कांद्याच्या मानेला पिळे देऊन ३ ते ५ सेंमी (एक ते दीड इंच) मान ठेवून कांदा पात कापावी. त्यामुळे पुढील काळात कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहून सूक्ष्म जिवाणूंच्या शिरकावामुळे कांदा सडणे, कांद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन वजनात घट होणे, कांद्याच्या तोंडातून मोड येणे यासारखे साठवणुकीतील नुकसान टाळले जाते.

- कांद्याला अजिबात मान न ठेवता, कांद्याचे तोंड उघडं ठेवून कांद्याची पात पूर्णपणे कापली, तर कांदे साठवणुकीत टिकत नाहीत व मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवते.

Onion Storage Techniques
Onion Storage TechniquesAgrowon

तीन आठवडे सावलीत वाळविणे ः

- या काळात कांद्यामध्ये साठलेली उष्णता हळूहळू बाहेर पडते. आणि कांद्याच्या बाहेरील सालीमधील पाणी पूर्णपणे आटून त्यांचे पापुद्र्यात रूपांतर होते. हे पापुद्रे किंवा पत्ती साठवणुकीत कांद्याचे सर्व प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण करते.

- अतिरिक्त उष्णता व पाणी निघून गेल्यामुळे असा कांदा सडत नाही. कांद्याभोवती पापुद्र्याचे आवरण तयार झाल्यामुळे वातावरणातील आर्द्रता व रोग-किडीपासून बचाव होतो. साठवणुकीत बाष्पीभवन रोखल्यामुळे वजनातील घट रोखली जाते. तसेच श्‍वसनाची क्रिया मंदावल्यामुळे कांदा सुप्त अवस्थेत जातो. त्यामुळे किमान ४ ते ५ महिने कांद्याला मोड फुटत नाहीत. या सर्व साठवणुकीतील फायद्यांसाठी कांदा सावलीत पातळ थर देऊन २१ दिवसांकरिता वाळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

साठवणुकीपूर्वी कांद्याची प्रतवारी ः

कांदा योग्यरीत्या वाळविल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी. प्रतवारी करताना आकाराने एकदम लहान किंवा एकदम मोठे कांदे, गोंडे फुटलेले, जोड दुभाळके कांदे, सडलेले व मोड आलेले कांदे निवडून बाजूला काढावेत. फक्त मध्यम आकाराचे (४.५ ते ७.५ सेंमी व्यासाचे) एकसारखे कांदेच साठवणुकीसाठी वापरावेत.

महत्त्वाच्या बाबी ः

- साठवणुकीच्या सुरवातीच्या काळात म्हणजे मे ते जुलै महिन्यात वातावरणातील तापमान व आर्द्रता जास्त असते. तेव्हा वजनातील घट व सडण्याची क्रिया यामुळे कांद्याचे नुकसान जास्त होते. साठवणुकीनंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत तापमान खाली येते व आर्द्रता वाढते. या काळात कांद्यांना कोंब येण्याचे प्रमाण वाढते.

- एन-२-४-१ यासारख्या कांद्याच्या सुधारित जाती साठवणुकीसाठी उत्तम आहेत. साठवणुकीत कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लागवडीसाठी जात, लागवड तंत्र, काढणी, सुकविणे, हाताळणी, साठवण पद्धत तसेच तापमान आणि आर्द्रता या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. मध्यम वजन, गोलसर आकार, घट्ट बारीक मान, सलग घट्टपणे चिकटलेला पापुद्रा हे गुणधर्म असलेल्या कांदा जाती साठवणुकीत चांगल्या टिकतात.

- कांद्याचा आकारदेखील साठवणुकीवर परिणाम करतो. फार लहान किंवा मोठ्या आकाराच्या कांद्यांना लवकर कोंब फुटून ते खराब होतात. त्यामुळे मध्यम आकाराचे कांदे (४.५ ते ५.५ सेंमी व्यास) साठवणुकीसाठी उत्तम असतात. साठवणुकीसाठी मध्यम आकाराचा, घट्ट मिटलेल्या मानेचाच वापरावा. जाड मानेचे व मोठ्या आकाराच्या कांद्यामध्ये नासाडीचे प्रमाण जास्त असते.

सुधारित पद्धतीने कांदा साठवणूक ः

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा उत्पादकांसाठी कमी खर्चात उभारणी करता येईल अशी सुधारित लाकडी चाळ विकसित केली आहे.

- या चाळीमध्ये लाकडी पट्ट्या व मंगलोरी कौलांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आगे. चाळीची लांबी १३ मीटर असून चाळ दोन भागांत (दोन पाखी) बांधण्यात आली आहे.

- जमिनीपासून उंचावर सिमेंटचा ओटा तयार करून त्यावर लाकडी पट्ट्याच्या फ्रेमच्या साह्याने प्रत्येक पाखीची उंची १.५० मी. व रुंदी १.७५ मी. इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये तळाच्या व मध्य भागात २० सेंमी. अंतर ठेवून हवा खेळती राहील याची काळजी घेण्यात आली आहे.

- दोन पाखीच्या मध्यभागी १.५० मी. अंतराची मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. चाळीची मध्यभागी उंची ५.३० मीटर असून, चाळीच्या दोन्ही बाजूंनी छत १ मीटर लांबीने वाढविण्यात आले आहे. जेणेकरून ऊन व पावसापासून कांद्याचा बचाव व्हावा. अशा प्रकारच्या चाळीत रब्बी हंगामातील कांदा ६-७ महिने व्यवस्थित साठवता येऊ शकते.

- डॉ. मधुकर भालेकर, ९८५०८९२७८२

- डॉ.कल्पना दहातोंडे, ९४२३४ ५८१७३

(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com