तंत्रज्ञानाविना देश पुढे जाणार नाही ः डॉ. मायी

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे कै. वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जन्मदिनी व कृषी दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी (ता.१) वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
Dr. Mayee
Dr. MayeeAgrowon

मुंबई ः ‘‘सरकार जो डरता है ना, वो भुखे को डरता है,’’ त्यामुळेच अन्न सुरक्षितता (Food Security) हा मुद्दा देशात प्राथमिक आहे. म्हणून आता पुन्हा तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) जोड द्यावी लागणार आहे. आजही हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचे नाव घ्यावे लागते. तंत्रज्ञानाविना हा देश पुढे जाऊ शकणार नाही. तो सर्व प्रगतीचा पाया आहे,’’ असे मत दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली व कृषी वित्तीय मंडळ मुंबईचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी (Dr. Charudatta Mayee) यांनी मांडले.

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे कै. वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जन्मदिनी व कृषी दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी (ता.१) वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यंदाचा १ लाख रुपयांचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार खोज संस्था, अमरावतीच्या संस्थापिका पौर्णिमा उपाध्याय यांना प्रदान करण्यात आला. तर वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार यंदा दै. ‘ॲग्रोवन’चे नाशिक प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांना प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील, आमदार सर्वश्री निलय नाईक, इंद्रनील नाईक, संजय दौंड, राजेश राठोड, सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार गोविंद राठोड, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे आदी उपस्थित होते.

डॉ. मायी म्हणाले, ‘‘आज देशात पुन्हा तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित होत आहे. कृषिमंत्र्यांनी सांगितले होते की, १११ दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. मात्र केवळ एक उष्णतामान मार्चमध्ये २ अंश सेल्सिअसने वाढल्याने ८ दशलक्ष टन उत्पादन कमी झाल्याने पडसाद उमटले. निर्यात थांबविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सरकार सर्वाधिक जास्त घाबरत असेल तर अन्न सुरक्षिततेला होय.’’

‘‘अमेरिका, जर्मनी,जपान हे देश तंत्रज्ञानाच्या भरवशावर पुढे चालले आहेत. म्हणून तंत्रज्ञानाला अडवू नका. तंत्रज्ञानात अनेक प्रकारच्या संधी आहेत. वाढते उष्णतामान, कमी होत असलेले पाऊसमान हे वातावरण बदलाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. अशा वेळी शेती टिकवायची असेल, तर तंत्रज्ञानाची कास धरावीच लागेल,’’ असेही त्यांनी नमूद केले.

शेतीक्षेत्रात संघटितपणे काम आवश्‍यक

‘‘शेती आता एकट्याची राहिलेली नाही. जोपर्यंत संघटित होऊन कामकाज होत नाही, तोपर्यंत उत्पन्नवाढ अशक्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी राजकारणात पडून अमूल्य वेळ वाया घालवू नये. संघटितपणे शेती क्षेत्रात काम केल्यास नक्की जिंकाल,’’ असा विश्वास डॉ. मायी यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com