‘एक गाव एक पीक’ संकल्पनेचे युग येईल

साताऱ्याच्या खंडाळा भागातील बावडा गावात राहून डॉ. सुरेश पवार यांनी शेती आणि शिक्षणही पूर्ण केले. पुणे कृषी महाविद्यालयातून विशेष प्रावीण्यासह त्यांनी पदवी घेतली व राहुरी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आचार्य पदवी मिळवली. खासगी क्षेत्रात उत्तम संधी असूनही शेतकऱ्यांसाठी संशोधन हेच आयुष्याचे ध्येय मानलेल्या डॉ. पवार यांनी ऊसशेतीत मूलभूत संशोधन केले. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना चार वाण मिळाले. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ‘डीएसटीए’मध्ये कार्यकारी सचिवपद भूषविले.
Agriculture
Agriculture Agtowon

भविष्यातील शेती आधुनिक (Modern Agriculture) असेल. अजून काही वर्षांनंतर छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना (Smallholder Farmer) वैयक्तिक शेती करणे अजिबात परवडणार नाही. पण, त्यांना सामूहिक शेती (Cumulative Farming) करण्याचा भक्कम पर्याय उपलब्ध असेल. २०५० च्या आधीच आपले शेतशिवार यंत्रमानवाच्या (Robot In Agriculture) हातात गेलेले असेल. मजूर मिळाला नाही म्हणून अमुक एक नुकसान झाले, अशी तक्रार कोणताही शेतकरी करणार नाही. कारण, यांत्रिक मजूर तसेच आयओटी प्लॅटफॉर्म (इंटरनेट ऑफ थिंग्ज) तुमची शेती सांभाळतील. शेतकऱ्यांच्या गरजा, भौगोलिक स्थिती, हवामान आणि पिकांची अवस्था या सर्व बाबी विचारात घेणारी संवेदके (सेन्सर्स) तयार केली जातील. ही संवेदके २४ तास शेतात राबतील आणि सॉफ्टवेअर व तंत्र प्रणालीला माहिती पुरवतील.

Agriculture
Fisheries Technology : नव्या मत्स्यपालन तंत्रज्ञानामुळे वाढले उत्पन्न

या माहितीचा जलद आणि अचूक वापर करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मोठ्या प्रमाणात विकसित झालेली असेल. जगप्रसिद्ध कंपन्या आत्तापासून या संकल्पनांवर कामे करीत आहेत. त्यांना अनेक आघाड्यांवर यश येत आहे. भ्रमणध्वनी आला आणि बघता बघता वेगाने बदलत गेला. त्याला शेतकऱ्यांनी स्वीकारले आणि आता त्याच्याशिवाय शेतकऱ्यांचे पानही हालत नाही. अगदी तशीच स्थिती सर्व बदलांची येईल. या सर्व गोंधळात खऱ्या माणसांना काय काम मिळणार हा चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे.

Agriculture
Food Technology : अन्नतंत्र महाविद्यालयात ‘इनक्युबेशन सेंटर’चे काम सुरू

भारतीय शेती ५०-६० टक्के जनतेला काम देते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रोजगाराची समस्या तयार होईल, असे अंदाज आत्तापासून बांधले जात आहेत. मात्र, त्यावरही काळानुसार तोडगा निघेल. मी आधी तुम्हांला म्हणालो की, एकट्याला शेती परवडणार नाही. शेतीमधील समस्या आणि खर्च इतके वाढतील की समूहाद्वारे शेती करावी लागेल. त्यामुळे शेतीमधील प्रत्येक बदल सुचवताना किंवा संशोधन करताना हा बदल अथवा संशोधन शाश्वत आहे का, असे विचारले जाईल. शाश्वत असेल तरच प्राधान्य मिळेल. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे वाण, बदलत्या हवामानाला तोंड देणारे वाण, जनुकीय परावर्तित किंवा जनुकीय संपादित वाणांचे युग यापुढे येईल.

तुम्ही पाहिलेच आधी आपल्या शेतात २०-२१ महिने ऊस उभा असायचा. ऊस बागायती पीक होते. आता १०-१२ महिन्याच्या जाती आल्या आहेत. कोरडवाहू भागासाठी जाती काढल्या जात आहेत. म्हणजेच यापुढे प्रत्येक पीक कमी दिवसात, कमी खर्चात, जास्त उत्पादन व उत्पन्न कसे देईल याचा विचार संशोधक करतील. त्याप्रमाणेच खासगी कंपन्यांचे संशोधन व विकास (आर अॅन्ड डी) विभाग काम करतील. दुसरे असे की, आंतरपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहील. कारण, मोठमोठी शेती आता केवळ एका पिकाला देणे परवडणारे नसेल. उदाहरणार्थ, केवळ ऊस न लावता त्यात सोयाबीन किंवा हरभरा पिकवला जाईल. म्हणजेच एकाच प्लॉटमधून साखर, इथेनॉल, तेल, कडधान्य अशा किती तरी पदार्थांची निर्मिती करणारा शेतीमाल काढला जाईल. भविष्याच्या शेतीत बहुतेक नगदी व मोठी पिकांची काढणी हार्वेस्टरच्या ताब्यात जाईल. ऊस तोडणी येत्या काही वर्षात पूर्णतः हार्वेस्टरच्या ताब्यात जाईल. उसाप्रमाणेच कापूस, सोयाबीनची काढणीही हार्वेस्टरकडून होईल. कोणत्याही पिकात सांगेल तशी काढणी कामे करणारी रोबोहार्वेस्टर उदयाला येतील.

हे सारे होत असताना शेतीत भांडवली गुंतवणूक प्रचंड वाढेल. त्यामुळे एका पिकाचे मोठमोठे लागवड पट्टे तयार करण्याकडे भांडवली शेतीचा कल असेल. जमीन आपली; पण पिके कंपन्यांची, हे सूत्र स्वीकारले जाईल. त्यामुळे एक गाव आणि भाराभर पिके ही आत्ताची पद्धत मोडकळीला येईल. त्याऐवजी ‘एक गाव एक पीक’ हे सूत्र व्यापारी शेतीतून उदयाला येईल. दर्जेदार निविष्ठा, यांत्रिकीकरण, हमीभाव आणि शाश्वत बाजारव्यवस्था अशी वैशिष्ट्ये असलेली शेती उदयाला येईल. अर्थात, हे काही एका रात्रीत घडणार नाही. त्यासाठी अवधी लागेल. शेतकऱ्यांची अभ्यासू नवी पिढी शासन व्यवस्थेला जाब विचारते आहे. त्यामुळे नवी व्यवस्था हळूहळू उभी राहील. पण, दिवस आपलेच असतील आणि ते चांगलेही असतील.

(शब्दांकन ः मनोज कापडे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com