Trolley Business : महाजनांची बहुपयोगी ट्रॉली राज्यभर प्रसिद्ध

वाघोदा बुद्रुक (ता. रावेर, जि. जळगाव) येथील संतोष महाजन यांनी विविध शेतीमाल व निविष्ठा वाहून नेणाऱ्या ट्रॉलीनिर्मितीत आपले नाव प्रसिद्ध केले आहे. सुमारे ३० ते ३२ वर्षे सातत्य व कौशल्यातून ट्रॉलीसह तयार केलेली शेतीपयोगी अन्य यंत्रेही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
Trolley Business
Trolley BusinessAgrowon

जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) गावाला सातपुड्यातील गारबर्डी धरणाचा लाभ होतो.काळी कसदार जमीन व मुबलक जलसाठे यामुळे परिसरात समृद्धी आली. केळी व अन्य फळपीक (Fruit Crop) शेतीही वाढली. काही शेतकरी देशी कापसाचेही जोमदार उत्पादन घेतात.

महाजन यांचा संघर्ष

गावातील संतोष बाजीराव महाजन हे मूळचे मध्य प्रदेशातील लोणी (ता.जि. बऱ्हाणपूर) येथील रहिवासी आहेत. लोणी व वाघोदा खुर्द येथे त्यांची प्रत्येकी दोन एकर शेती आहे. लोणी येथील घरी आर्थिक परिस्थिती कमजोर स्थिती होती.

शालेय जीवनात सुट्टीच्या दिवशी ते आईसोबत शेतीकामे करायचे. मजुरीच्या पैशातून चरितार्थ चालविण्यासाठी ते लहानपणापासून कुटुंबीयांना मदत करायचे. शेतीत अनेक कष्टाची कामे केली. सर्व अडचणींचा सामना केला. यामुळे शिक्षण अर्धवट राहिले.

पुढे त्यांनी वाघोदा बुद्रुक येथे स्थलांतर केले. तेथे मावसभाऊ प्रल्हाद चौधरी व वीज मंडळातील अभियंता रावसाहेब चौधरी यांची मदत झाली. महाजन यांनी लोणी येथे काकांच्या शेती अवजारे कार्यशाळेत अनुभव घेतला होता.

त्याच जोरावर वाघोदा बुद्रुक येथे शेती अवजारे व गृहोपयोगी यंत्रसामग्रीची कार्यशाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. सन १९८९ मध्ये १३ फूट बाय १८ फूट क्षेत्रफळात पत्र्याचे शेड उभारून लोखंडी खाटा, किरकोळ अवजारे, गृहोपयोगी सामग्री निर्मिती सुरू झाली.

Trolley Business
Onion : लासलगाव बाजार समिती परिसरात कांद्याची ट्रॉली उलटली

पहिल्या ट्रॉली निर्मितीचा अनुभव

एकदा गावातील शेतकऱ्याने ट्रॉली तयार करून देण्याविषयी विचारले. तीस हजार रुपयांत ती तयार करून देण्याचे ठरले. त्यासाठी १० हजार रुपये आगाऊ घेतले. पण संबंधित शेतकऱ्याने पैसे बुडविणार नाही याची हमी देण्याची अट ठेवली.

गावातील ज्येष्ठ नागरिकाला जामीनदार म्हणून आणले आणि व्यवहार यशस्वी झाला. पुढे याच प्रकारे महाजन शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादित करीत गेले. ट्रॉलीची मागणी वाढू लागली. मग कामगारही नियुक्त केला.

ट्रॉलीची वैशिष्ट्ये

मागील एकाच बाजूला तसेच मागे आणि उजव्या-डाव्या बाजूलाही ‘फोल्डिंग’ अशा ट्रॉलीची निर्मिती केली जाते. हे काम बारमाही सुरू असते. दहा बाय ६ बाय २.५ फूट, १० बाय ६ बाय २ फूट व १२ बाय ६ बाय २ फूट अशा आकारातील या ट्रॉलीज चार टन क्षमतेच्या आहेत.

दरवर्षी २५ ते ३० ट्रॉलींची निर्मिती होते. पुढे मिनी ट्रॅक्टर बाजारात आल्यानंतर मिनी ट्रॉलीची निर्मिती सुरू केली. सन १९८९ मध्ये पहिली ट्रॉली ३० हजार रुपयांत तयार करून दिली होती. त्याची किंमत आज दोन लाख ८० हजार रुपये आहे. ट्रॉलीसोबत पांजरही देतात.

ट्रॉली निर्मितीची सामग्री जळगाव, अहमदाबाद येथून मागविण्यात येते. मका, ज्वारी, धान्य, केळी, खते वा अन्य निविष्ठा वाहून नेण्यासाठी या ट्रॉलींचा उपयोग होतो.

अलीकडे केळीचे थेट शेतात बॉक्स पॅकिंग केले जाते. त्यासाठी शेतात पाणी, बॉक्स, क्रेट आदी सामग्री न्यावी लागते. यासाठी उपयुक्त ठरणारा ‘ट्रॉली कम टॅंकर’ ही तयार केला आहे.

ब्रॅण्ड तयार केला

महाजन यांनी ट्रॉलीचा अंकित ट्रेलर हा ब्रॅण्ड तयार करून तो प्रसिद्ध केला. सुमारे ३३ वर्षे ते या व्यवसायात आहेत. परंतु ट्रॉलीचा दर्जा कायम टिकावू आहे. जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यांत ट्रॉलीची विक्री होते.

यावल तालुक्यातील काही गावांत तर ५० च्या संख्येपर्यंत ट्रॉली या महाजन यांच्याच पाहण्यास मिळतात.

अन्य यंत्रसामग्री

वाघोदा परिसरात माती, शेणखताची वाहतूक अधिक प्रमाणात होते. अनेकदा उंच भागात ट्रॅक्टर चढताना मागील वजनामुळे ते उलटतात. ही समस्या लक्षात घेऊन ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस मजबूत वजन असलेली रचना केली आहे. त्यातून ट्रॅक्टर उलटण्याचा धोका कमी केला आहे.

केळीच्या सऱ्या पाडण्याचे फाडही तयार केले जातात. मिनी ट्रॉली दीड लाख, तर ट्रॉली कम टँकर दोन ८० हजार रुपये दराने तयार करून देण्यात येतो.

ट्रॅक्टरचलित ब्लोअर, वजनाने हलकी वाहतूकगाडीही तयार केली आहे. लाकडी बैलगाड्यांना ती पर्याय ठरली असून किंमत ३५ हजार रुपये आहे.

मेहनतीने समृद्धी आली

सुरवातीच्या काळात बिकट स्थितीत अहोरात्र कष्ट उपसले. त्याचे फळ महाजन यांना आज मिळाले आहे. जेथे पत्र्याच्या शेडमध्ये कार्यशाळा सुरू केली ती व नजीकची जागाही त्यांनी खरेदी केली. त्यात मजबूत ‘आरसीसी’ बांधकाम करून दोन हजार चौरस फूट आकाराची कार्यशाळा उभी केली आहे.

पाच जणांना रोजगार दिला आहे. आज वर्षाला ३५ ते ४० लाखांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत महाजन यांनी मजल गाठली आहे. कोविड काळात अनेक महिने कार्यशाळा बंद राहिली. त्या काळात उलाढालही कमी झाली.

कार्यशाळेच्या वरच्या बाजूला सुंदर दुमजली इमारत बांधली आहे. थोरला मुलगा अंकित आयटीआयचे शिक्षण घेऊन वडिलांना व्यवसायात मदत करीत आहे. तर धाकटा अक्षय पुणे येथे कंपनीत नोकरीस आहे.

Trolley Business
कांदा चाळीला आग लागून २५ ट्रॉली कांदा, दोन दुचाकी खाक

कार्याचा गौरव

महाजन यांच्या कार्याची दखल घेत जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेशकुमार मीणा व प्रशासनाने घेतली. म्हणूनच यशस्वी कृषी यंत्र निर्माते व उपक्रमशील उद्योजक म्हणून त्यांचा जळगाव येथे सत्कारही झाला आहे.

शेतकऱ्यांना अडचण आल्यास थेट शेतात जाऊनही ती दूर करण्याची वृत्ती महाजन यांनी जोपासली आहे.

संतोष महाजन, ९४२३७६८९०७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com