कृषी क्षेत्रातही वाढतोय यंत्रमानवाचा वापर

भारत रोबोटिक्स क्षेत्रामध्ये अद्याप खूप मागे आहे. भविष्यात द्राक्ष व अन्य नगदी पिकांच्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणासोबतच संपूर्ण स्वयंचलित यंत्रे, यंत्रमानव यांचा वापर वाढत जाणार आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा रोजगार न हिरावता यंत्रमानवासारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे यामध्ये संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. या संतुलनावरच भारतातील या तंत्रज्ञानाचे यश - अपयश ठरणार आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

शेतीमध्येही उच्च तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे. प्रगत देशांसोबतच भारतीय कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. कृषी तंत्र अधिक स्मार्ट बनविण्यामध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे कृषी उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढ शक्य होत आहे. कृषी क्षेत्रामध्ये यंत्रमानवाची भूमिका, जीपीएस तंत्रज्ञान आणि महाविदा (बिग डाटा) या बाबी मध्यवर्ती येत आहेत. एका अंदाजानुसार २०२३ पर्यंत जागतिक कृषी यंत्रमानवांची बाजारपेठ ही १२.५ दशलक्ष डॉलरचा टप्पा ओलांडेल. उत्तर अमेरिका आणि युरोप हे काटेकोर शेती आणि कृषी यंत्रमानवांच्या वापरामध्ये आघाडीवर असतील. आशिया पॅसिफिक पट्ट्यातील चीन आणि भारत या देशातील यंत्रमानवांचा वापर वेगवान दराने वाढेल. इंटरनेटद्वारे एकापेक्षा अधिक गॅझेट्सची जुळणीबाबत (इंटरनेट ऑफ थिंग्ज) वाढत्या जागरुकतेमुळे शेतकऱ्यांमध्ये विविध शेतीकामांसाठी आधुनिक यंत्रमानवाच्या वापराला मदत होत आहे. या यंत्रमानवामुळे मानवी चुका रोखतानाच कामांची कार्यक्षमता वाढत आहे.

ड्रोन आणि संवेदकांची भूमिका ः

आधुनिक शेतीमध्ये जमिनीची मोजणी, कीड-रोगांचे निदान, पिकांचे सर्वेक्षण अशा कामांसाठी ड्रोन्सचा वापर वेगाने वाढत आहे. आधुनिक कृषी परिस्थितिकीमध्ये, संवेदकांची भूमिका महत्त्वाची आहे. उदा. मातीतील आर्द्रता संवेदक हे सातत्याने मातीतील ओलाव्याची पातळी, आर्द्रता मोजून, ती माहिती क्लाऊड नेटवर्क मध्ये पाठवेल, त्यातून सिंचनाची गरज असल्याचा संदेश वेळेपूर्वीच शेतकऱ्यांना पाठवला जाईल. यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य होईल. न्युझीलँडसारख्या विकसित देशांमध्ये स्मार्ट एन ही प्रणाली चरणाऱ्या गाईंवर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाते. त्यातून या गाईंचे मलमूत्र ज्या ठिकाणी पडले आहे, अशा ठिकाणी अधिक नत्रयुक्त खते देण्याची आवश्यकता नसल्याचे सुचवले जाते.

कृषी उपयोगी यंत्रमानवांचे प्रकार ः

सध्या माहितीच्या आधारावर चालणारा, तंत्रज्ञानावर आधारित अशा शेती पद्धतीमध्ये वाढ होत आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे यंत्रमानव येत आहेत. त्यामध्ये आधुनिक कृषी तंत्राने कमी करण्यायोग्य कृत्रिम बुद्धीमत्ता असून, उत्तम अशी विश्लेषणात्मक क्षमताही आहेत. या कामांमध्ये डेअरी व्यवस्थापन, मातीचे सर्वेक्षण आणि संवर्धन, उत्पादन वाढ अशा कामांचा समावेश होतो.

-यंत्रमानवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स, जीपीएस वर चालणारे स्मार्ट ट्रॅक्टर, दूध काढणारी यंत्रे, मानवरहित फवारणी हेलिकॉप्टर्स आणि विविध घटकांच्या व्यवस्थापन प्रणाली यांचा समावेश होतो.

-जल व्यवस्थापन आणि सिंचन या विभागामध्येही छोटी संपूर्ण स्वयंचलित व कृत्रिम बुद्धीमत्तायुक्त यंत्रे (ॲगबोट्स) ही शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरत आहेत.

- पिकांच्या काढणीसाठी स्मार्ट यंत्रमानव आणि शेतीतील यादी व्यवस्थापनासाठी अधिक हुशार साधने तयार झाली आहेत. एजीसीओ लिल, जॉन ॲण्ड डिअर आणि क्लिअरपाथ रोबोटिक्स अशा मोठ्या कंपन्यामध्ये कृषी यंत्रमानव उद्योगांमध्ये पुढे आलेल्या आहेत.

सूक्ष्म पातळीवर पिकांचे निरीक्षण ः

अमेरिकेमध्ये शेतीचा आकार हा सरासरी ४४४ एकर इतका मोठा आहे. अशा मोठ्या क्षेत्रामध्ये पिकांचे माणसांच्या साह्याने सर्वेक्षण आणि निरीक्षण करण्यामध्ये खूप अडचणी येतात. त्यातून मिळणाऱ्या अपुऱ्या माहितीवर आधारित निर्णय घेण्यामुळे अनिश्चितता निर्माण होते. शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ होते. हा धोका कमी करण्यासाठी ॲगबोट (लहान आकाराचे रोबोट्स) आणि ड्रोन्स

अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. या घटकांवर अधिक ताकदवान नेस्सर आणि भूमापन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यातून पिकांची समग्र आणि प्रत्यक्ष वेळेवरील माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते. उदा. बोनिरोब (BoniRob) सारखे ॲगबोट्स.

कृषी रोबोटिक्स प्रणालीमध्ये पुढील पाच महत्त्वाचे घटक आवश्यक आहेत.

१) क्लाऊड नेटवर्क, २) उपग्रह प्रणाली, ३) प्रत्यक्ष कृषी यंत्रमानव, ४) स्मार्ट फोन किंवा टॅबलेट, ५) वाहक घटक

रोबोट्सचे उपयोग

कृषी क्षेत्रामध्ये अनेक कामांसाठी माणसे किंवा पशु ताकदीवर अवलंबून राहावे लागते. अशी कामे स्वयंचलितपणे करण्यासाठी यंत्रमानवांचा वापर करणे शक्य आहे.

१) पेरणी आणि पुनर्लागवड ः जगभरामध्ये पिकांच्या पारंपरिक पेरणी किंवा पुनर्लागवडीच्या कामांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे मनुष्यबळ, वेळ आणि कष्ट खर्च होतात. यात बियांचा अधिक व अनियमित वापर होण्याची शक्यता असल्याने बियांचे प्रमाण कमी अधिक होते. यात बियांच्या नुकसानीसोबतच पुढील विरळणी किंवा नांग्या भरण्याचे काम वाढते. हे सर्व आधुनिक पद्धतीच्या स्वयंचलित रोबोट्समुळे कमी होऊ शकते. हे रोबोट्स किंवा संपूर्ण स्वयंचलित यंत्रे ट्रॅक्टरला जोडूनही वापरता येतात. अगदी मोठ्या क्षेत्रामध्ये बदलणाऱ्या मातीच्या प्रकारानुसार सेन्सर यंत्राला लागवडीचे अंतर बदलण्याच्या सूचनाही देऊ शकतात. हरितगृह किंवा रोपवाटिकांमध्ये पिशव्या किंवा ट्रेमध्ये रोपे तयार करणे, त्यांची वेळोवेळी निगा राखणे आणि लागवड योग्य होताच पुनर्लागवडीसाठी पाठवणे या क्रियाही अलीकडे स्वयंचलित होऊ लागल्या आहेत. शहरी भागामध्ये संपूर्ण बंदिस्त पद्धतीने शेती करताना अॅगबोट्स महत्त्वाचे ठरत आहेत.

२) सिंचन, खते देणारे रोबोट्स ः पिकांची पाण्याची आवश्यकता जाणून घेऊन सभोवतालच्या वातावरणामुळे होणारे बदल लक्षात घेऊन सिंचनाचे प्रमाण ठरवण्यासाठी आधुनिक रोबोट्स उपयुक्त ठरू शकतात. पिकांच्या उत्तम वाढीसाठी विविध खतांचा वापरही आवश्यकतेनुसार करता येतो. यामुळे खतांची कार्यक्षमता (उदा. नत्रयुक्त खते) वाढून फायद्यात वाढ होते.

३) सूक्ष्म फवारणी ः सध्या पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारणी हे शेतकऱ्यांचे मोठे काम बनले आहे. या कामासाठी शेतकऱ्यांचा अधिक वेळ खर्च होतो. तसेच रसायनांचा वापर ही असंतुलित होऊन नुकसान वाढू शकते. कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.

४) तण नियंत्रण ः आंतरमशागतीच्या कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे किंवा महाग ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी सरसकट तणनाशकांचा वापरही वाढत चालला आहे. त्यातून मातीची सुपीकता आणि पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. अशा वेळी या कामांसाठी स्वयंचलित यंत्रे किंवा अॅगबोट्स अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हे रोबोट्स पिकातील तणांची ओळख पटवून, वेळीच उपटून काढतील. आवश्यकता असल्यास तेवढ्याच भागांमध्ये फवारणी (स्पॉट स्प्रेयिंग) करणे शक्य होते. यात अलीकडे लेसर तंत्रज्ञानाचा वापरही शक्य होत आहे. तणनियंत्रण वेळीच शक्य झाल्यामुळे पिकावरील किडीच्या प्रादुर्भावामध्ये ९० टक्क्यापर्यंत घट होऊ शकते. यामुळे कीडनाशकांच्या वापरातही ७५ टक्क्यांपर्यंत घट शक्य होते.

५) छाटणी, विरळणी ः

पिकांच्या उत्तम वाढ आणि उत्पादनासाठी दोन रोपे आणि ओळीमध्ये एक ठराविक अंतर असणे अपेक्षित असते. पूर्वी हे केवळ प्रयोगाच्या माध्यमातून ठरविणे शक्य होत असे. आता प्रत्येक रोपाची होणारी वाढ आणि त्यासाठी आवश्यक जागा याचा अंदाज विशिष्ट अशा ॲगबोट्सद्वारे घेणे शक्य आहे. त्याच प्रमाणे झाडांच्या फांद्या व अनावश्यक घटकांची छाटणी किंवा विरळणी करण्याचे कामही या नव्या रोबोट्सद्वारे करणे शक्य आहे. यासाठी यामध्ये उच्च दर्जाची संगणकीय दृष्टी तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. सध्या द्राक्ष वेली आणि ब्लुबेरी शेतीमध्ये स्वयंचलित छाटणी तंत्रज्ञान वापरले जात आहे.

६) काढणी, प्रतवारी ः

कोणत्याही पिकाची काढणी ही अत्यंत अचूक पक्वतेवर करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी अतिशय वेगवान आणि अचूक असे रोबोट्स निर्मितीवर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे योग्य पक्वतेला काढणीअभावी वाया जाणारा व शेतातच टाकून द्यावा लागणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण कमी होईल. मऊ आणि नाजूक फळांची काढणी व काढणीपश्चात प्रतवारी दरम्यान होणारी हाताळणी कमीत कमी राखता येते.

-सध्या ऑक्टिनियन कंपनीने स्ट्रॉबेरी काढणीचा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट पूर्णपणे पिकलेल्या स्ट्रॉबेरीची काढणी व प्रतवारी ७० टक्क्यांपर्यंत अचूकतेने करतो.

-स्वयंचलित सफरचंद काढणी रोबोट्समध्ये संगणकीय दृष्टी आणि हवारहित पोकळीवर सफरचंद झाडावरून तोडणारी हातासारखी यंत्रणा वापरली जात आहे. येत्या दोन वर्षात असे स्वयंचलित यंत्र सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.

- ॲगबोट्स हे फळांची पक्वता, त्यावरील माती किंवा धुळीचे प्रमाण आणि वातावरणाचाही अंदाज अचूकतेने घेऊ शकतात.

-कॅलिफोर्निया (अमेरिका) स्थित ॲबंडंट रोबोटिक्स आणि इस्राईल स्थिर एफएफ रोबोटिक्स या कंपन्यांनी सफरचंद काढणीसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित सेन्सरयुक्त रोबोट्स तयार केले आहेत.

कृषिपूरक क्षेत्रांसाठी रोबोटिक्स ः

१) डेअरीसाठी रोबोट्स - पशुपालनामध्ये जनावरांचे आरोग्य आणि स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक ती कामे करण्यासाठी यंत्रमानव उपयुक्त ठरू शकतात. जनावरे आणि गोठ्यामध्ये निर्जंतुकीकरण रसायनांची फवारणी, स्वच्छ दूध काढणी यासाठी ही यंत्रे उपयोगी आहेत. रोबोट्समुळे एकूणच गोठ्यांच्या व्यवस्थापनामध्ये अचूकता आणणे शक्य होणार आहे.

२) कळप पद्धतीने मुक्त संचार पद्धतीसाठी रोबोट्स ः शेळ्या, मेंढ्या किंवा गाईंच्या कळपांचा मुक्त संचार पद्धतीने नियोजन करण्याकडे प्रगत देशांचा कल वाढत आहे. उदा. आयर्लंड, न्यूझीलंड इ. या भागामध्ये शेळ्या किंवा मेंढ्याच्या कळपांना हाकण्यासाठी, त्यांच्यावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक मोठे शेतकरी गाईंच्या कळपांच्या नियंत्रण, नियोजनासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. या दोन्ही प्रकारामध्ये ड्रोन हा उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

निष्कर्ष ः

जागतिक लोकसंख्येमध्ये वेगाने वाढ होत असताना कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्येही अचूकता आणि उत्पादन वाढीच्या अनुषंगाने वेगाने बदल होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये यंत्रमानव, संपूर्ण स्वयंचलित यंत्रे मोलाची भूमिका निभाऊ शकतात. शेतीमध्ये कष्टाच्या तुलनेमध्ये मिळणारी कमी मजुरी माणसांना रोजगारासाठी आकर्षित करत नाही. यामुळे मजुरी वाढत चालली असली तरी मजुरांची उपलब्धता हा सार्वत्रिक समस्येचा विषय झाला आहे. अशा वेळी यंत्रमानव अवघड, एकाच प्रकारच्या वेळखाऊ कामांसाठी, अचूकतेसाठी उपयोगी ठरू शकतात. ग्रामीण पातळीपर्यंत पोचत असलेली इंटरनेटची सुविधा आणि इंटरनेट आधारित विविध यंत्रांचे नेटवर्किंग (इंटरनेट ऑफ थिंग्ज) यामुळे ॲगबोट्स अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात.

महादेव काकडे, ७८७५५५९३९१ (संशोधन व्यवस्थापक, स्टेट बँक ग्रामीण बँकिंग संस्था, हैदराबाद.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com