Farm Equipment: पारंपरिक ते अद्ययावत शेती अवजारे

जागतिक पातळीवर इ.स. १६०० पासून पारंपरिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणामुळे (Farm Mechanization) सुधारणा सुरू झाल्या. इंग्लंड मधल्या जमीनदारांनी लाकडी नांगरामध्ये बदल करायला सुरुवात केली. १८१४ मध्ये लाकडी फाळावरच लोखंडी तुकडा लावून जेथ्रेवूड याने लोखंडी नांगराचे पेटंट इंग्लंडमध्ये घेतले होते. नांगरताना मोठा दगड लागला व नांगर तुटला तर लगेच नांगर बदलणे सोपे होते.
Farm Equipment
Farm EquipmentAgrowon

शेखर गायकवाड

बदलत्या ग्रामीण महाराष्ट्राचा (Rural Maharashtra) अभ्यास करताना शेती आणि शेती मधल्या अवजारे आणि यंत्रांमध्ये कसा बदल होत गेला हे पाहणे सुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्वी बहुसंख्य अवजारे ही शेतातच असणाऱ्या बाभूळ, खैर, सागवान, निंब अशा झाडांच्या लाकडापासून बनवले जात. स्वत:च्याच रानातले लाकूड कापून, काही घरासाठी, काही अवजारे बनविण्यासाठी सुताराकडे बैलगाडीतून नेऊन शेतकरी टाकत असे.

बैलगाडी सुताराने बनवायची, त्याची धाव लोहाराने बनवायची आणि कुऱ्हाड लोहाराकडून आणि त्याचा दांडा सुताराकडून घ्यायचा अशी पद्धत होती. त्यामुळे भारताच्या पारंपरिक शेतीमध्ये सर्व शेतकरी एकाच प्रकारची अवजारे बनवत. अवजारांमधली सुधारणा ही मुख्यतः सुतार किंवा लोहार यांच्या कल्पकतेवर अवलंबून होती. याचा परिणाम म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लाकडी नांगर, कुळव, फेणी, पहार, कोळपे, कुदळ, टिकाव, खुरपे, कोयते, मळणीची अवजारे यामध्ये त्या त्या भागामध्ये आकारामध्ये तफावत आढळते.

जागतिक पातळीवर इ.स. १६०० पासून पारंपरिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणामुळे (Farm Mechanization) सुधारणा सुरू झाल्या. इंग्लंड मधल्या जमीनदारांनी लाकडी नांगरामध्ये बदल करायला सुरुवात केली. १८१४ मध्ये लाकडी फाळावरच लोखंडी तुकडा लावून जेथ्रेवूड याने लोखंडी नांगराचे पेटंट इंग्लंडमध्ये घेतले होते. नांगरताना मोठा दगड लागला व नांगर तुटला तर लगेच नांगर बदलणे सोपे होते.

शेतीची नांगरणी या सर्वांत महत्त्वाच्या मशागतीसाठी पूर्वी लाकडी नांगराचा वापर व्हायचा. जमिनीनुसार व वेगवेगळ्या भागानुसार नांगराचे आकार होते. धारवाडी नांगर, सोलापुरी नांगर, पंचमहाल नांगर, चरोचर नांगर, पुणेरी नांगर हे देशी नांगराचे प्रकार मानले जायचे. ट्रॅक्टर आल्यानंतर बैलाचा नांगर व ट्रॅक्टरने चालवला जाणारा नांगर असे मुख्य दोन भाग पडले.

१९१० मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडी येथे माळरानावर किर्लोस्कर ब्रदर्स (Kirloskar Brothers) नावाचा कारखाना उघडला व शेतीसाठी लागणारा नांगर, मोटार, चरक व राहाट या वस्तूंचे उत्पादन सुरू केले. १९३४ मध्ये महात्मा गांधी यांनी किर्लोस्कर - काळे चरखा स्वतः चालवून पाहिला तर १९४० मध्ये पं. नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करांचा लोखंडी नांगर हातामध्ये धरला. त्या काळी करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये ‘‘शेतकरी बंधूंनो! नांगरणीसाठीची मेहनत, खर्च व वेळ वाचवून उत्पादनात भर घालणारा किर्लोस्कर बंधूंचा सुधारलेला लोखंडी नांगर नं. ९ वापरा.’’ असा मजकूर होता.

शेत जमीन नांगरल्यानंतर मोठ मोठी ढेकळं फोडण्यासाठी आणि त्याच्यात अडकलेल्या गवताच्या मुळ्या फोडण्यासाठी कुळवाचा वापर होतो. फासेचा कुळव, तव्याचा कुळव व ड्रॅग कुळव असे कुळवाचे प्रकार आहेत. जमीन सपाट करणासाठी केणी वापरली जायची. शेतातला खड्ड्यातला भाग मातीने भरून सपाट करण्यासाठी केणीचा वापर सुरू झाला. पेरणीसाठी पाभरीचा वापर करताना बी पेरणाऱ्याच्या हाताची मूठ त्यावर व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने रचना केलेली असते. मिश्र पीक म्हणून दुसऱ्या पिकाची मध्येच एखादी ओळ पेरायची असल्यास मोघन हे अवजार पाभरीच्या मागे जोडून वापरले जाते.

गेल्या काही वर्षांत शेती अवजारामध्ये (Farm Equipment) अतिशय आधुनिकीकरण झाले असून, सारा यंत्र, टोकण यंत्र, तणनाशक यंत्र, फवारणी यंत्र, रोटाव्हेटर, हॅरो, कल्टीव्हेटर, फवारणी यंत्र, भात मळी यंत्र, गहू कापणी यंत्र, उसासाठी हार्वेस्टर अशी अद्ययावत यंत्रसामग्री आली आहे.

शेती मालाची वाहतूक, दुधाच्या व्यवसायासाठी शीत वाहने पाणी उपसण्यासाठी मोटार, खत व बियाणे पेरणीयंत्र, टोकणयंत्र, शेंगा सोलणी यंत्र, भातसडीचे हलर यंत्र, सरकी काढायचे यंत्र, मका सोलणी यंत्र, हळद प्रक्रिया यंत्र, सौर मोटार, मळणी यंत्र, सूक्ष्म सिंचन सेट, रेन गन इत्यादींचा वापर केला जात आहे. मानवी श्रम कमी करत कमीत कमी माणसांमध्ये शेतीचे कामे करता येईल याचा सर्रासपणे विचार केला जात आहे.

१८३३ मध्ये ओतीव घडीव पत्र्यापासून पोलादी नांगर अमेरिकेत तयार केला गेला. १८०० सालानंतर अमेरिकेत व युरोप खंडांमध्ये प्रमाणित यंत्रांचा विकास सुरू झाला. विशेषतः भारतामध्ये शेती अवजारे पारंपरिकरीत्या हाताने वापरली जायची किंवा जनावरांकडून ओढली जात होती. बैल हा स्वतःच्या वजनाच्या एक दशांश एवढी ताकद ओढण्याच्या कामी येतो असे मानले जाते.

शेतीमाल तयार झाल्यानंतर काढणीपश्‍चात तंत्रज्ञानात देखील अद्ययावतीकरण आले आहे. फळे व भाजीपाला साठवण्यासाठी साठवणगृह, शीतगृह, कांद्यासाठी चाळी, प्रक्रिया करून हवाबंद करण्याची यंत्रणा, पावडर करण्याचे तंत्र आदींचा वापर होत आहे. पाणी उपसण्यासाठी सबमर्सिबल मोटार, सोलर पंप, पॅकेजिंग व बॉटलिंग यंत्रणा, अद्ययावत वाहतूक साधने आदींमुळे ग्रामीण भाग बदलत आहे. सर्वांचा परिणाम म्हणून शेती जास्त भांडवली खर्चाची झाली आहे.

नांगरताना ट्रॅक्टरवर बसून यू-ट्यूबवर गाणे पाहणारा शेतमजूर आता भारतामध्येही दिसू लागला आहे. अवजारे अद्ययावत होत असताना शेतकऱ्यांच्या जीवनात डिजिटलायझेशन (Digitization) पण येत आहे. इस्राईलचा आणि आता नाशिकचा पण शेतकरी आता फळझाडांना द्रव्यखते देताना कोणत्या क्रमांकाच्या झाडाला ते देण्याची आवश्यकता आहे हे ठरवू लागला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील ही स्थित्यंतरे मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवत आहे असेच म्हणावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com