Agriculture Implements : दुचाकीचलित शेती अवजारे

शेतीमध्ये यांत्रिकीकरण वेगाने वाढत चालले आहे. त्या मागे कुटुंबाचा लहान होत चाललेला आकार, मजुरांच्या उपलब्धतेची अडचण, बैलांची संख्या कमी होत जाणे अशा कारणांसोबतच वेगाने काम होण्याची आवश्यकता अशी अनेक कारणे आहेत.
Agriculture Mechanization
Agriculture MechanizationAgrowon

शेतीमध्ये यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) वेगाने वाढत चालले आहे. त्या मागे कुटुंबाचा लहान होत चाललेला आकार, मजुरांच्या उपलब्धतेची (Labour Shortage) अडचण, बैलांची संख्या कमी होत जाणे अशा कारणांसोबतच वेगाने काम होण्याची आवश्यकता अशी अनेक कारणे आहेत. बैलचलित यंत्रेही (Bullock Driven Machinery) काळाच्या ओघात मागे पडली असून, ट्रॅक्‍टरचलित यंत्रांची (Tractor Driven Implements) मागणी वाढली आहे. मात्र ट्रॅक्टर आणि त्यावरील अवजारे यांच्या किमती प्रचंड असल्याने सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर राहतात. अशा वेळी मध्य प्रदेशातील राजमल गायरी या शेतकऱ्याने उपलब्ध दुचाकीच्या साह्याने चालवण्यायोग्य अवजारे, यंत्रे यांच्या निर्मितीवर भर दिला आहे. त्यांनी दुचाकीवर चालणारी एक टन क्षमतेची हायड्रॉलिक ट्रॉलीही प्रथमच तयार केली आहे. (Two Wheeler Driven Agriculture Implements)

जेमतेम शेतीवर उपजीविका

मध्य प्रदेश राज्यातील नीमच जिल्ह्यातील नायगाव (ता. जावद) येथील राजमल गायरी यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यात सोयाबीन (Soybean), मका (Maize), गहू (Wheat), लसूण अशी पिके ते घेतात. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीमध्ये राबत असूनही उदरनिर्वाह करणे अडचणीच होत चालले होते. मग शेतीच्या उत्पन्नाला आधार म्हणून पाच गाई विकत घेत शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Based Business) सुरू केला. मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याचे लक्षात आले. अजिबात शिक्षण नसलेल्या राजमल यांना फॅब्रिकेशनची कामे (Fabrication Work), यंत्रे अवजारे (Agriculture Machinery And Implements) यामध्ये चांगली गती आहे. काही वर्षे त्यांनी एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाकडे कामही केले. त्यामुळे आवश्यक ती छोटी मोठी यंत्रे घेत त्यांनी स्वतः फॅब्रिकेशनची कामे सुरू केली.

...अशी सुचली कल्पना

ज्यांच्याकडे ट्रॅक्टर व अन्य मोठी यंत्रे आहेत, असे शेतकरी, मालक अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे सेवा देण्यापेक्षाही मोठ्या अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देतात. त्यातून सर्वच कामे उशिरा होत जातात. त्याचा फटका अंतिमतः उत्पादनाला बसतो. मात्र अलीकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे एखादी दुचाकी नक्कीच असते. तिच्या साह्याने शेतीतील काही छोटी मोठी कामे नक्कीच करता येईल, अशी कल्पना राजमल यांना सुचली.

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization : राज्यात अनुदानित अवजारे विक्रीला बंदी

दुचाकी कल्टिवेटर

शेतीमध्ये तणनियंत्रण हे एक महत्त्वाचे काम असते. त्यासाठी मजुरांची वेळेवर उपलब्धता होणे ही एक समस्याच झाली आहे. त्यात मजुरीचा खर्चही वाढत चालला आहे. त्यामुळे तणनियंत्रणासाठी काहीतरी करता येईल का, अशी सर्वच शेतकऱ्यांकडून विचारणा होत होती. दुचाकीवर चालणारे कल्टिव्हेटर तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या. कधी आरपीएम ॲडजेस्ट होत नव्हते, तर कधी डवरे जमिनीला भिडत नव्हते. वर्षभर आरेखन, निर्मिती, चाचण्या आणि सुधारणा करत राहिले. अपयश येत असले तरी हिंमत न हारता प्रयत्न सुरू ठेवले. दोन लाख रु. पेक्षा अधिक खर्च झाला. शेवटी वर्षभरानंतर अपेक्षित सयंत्र विकसित करण्यात यश आल्याचे राजमल सांगतात.

- एका दिवसाला सात-आठ एकराचे काम याद्वारे होते.

-या यंत्राचे वैशिष्टय म्हणजे याला रिव्हर्स गिअरही दिला आहे. रिव्हर्स गिअर, ९ टाइम कल्टिवेटर व सयंत्राच्या मागील बाजूस १९ नंबरचे टायर यासह हे सयंत्र ४९ ते ५० हजार रुपयांना पडते. गिअर बॉक्‍सने मागील ॲक्सलला चेनद्वारे ऊर्जा दिली जाते.

-रिव्हर्स गिअर नसलेल्या सयंत्राची किंमत ३० ते ३२ हजार रुपये राहते.

- मानवचलित सयंत्राची किंमत १५ ते १७ हजार रुपये आहे. यात दुचाकीला डवरे बांधले जाते. त्यामागे माणसे राहतात.

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization : यांत्रिकीकरण करूया गतिमान

तणनियंत्रणासोबतच फवारणी यंत्र

शेतीमधील श्रम आणि वेळेची बचत व्हावी या उद्देशाने तणनियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या डवऱ्यावरच फवारणी यंत्र बसवले आहे. हे यंत्र फवारणीचे द्रावण २०० लिटर वाहण्याची क्षमता असलेल्या ११० ते १५० सीसी बाइकला जोडता येते. एकाच वेळी आडव्या पाइपवर १५ नोझल चालू शकत असल्याने १६ फूट क्षेत्र एकाच वेळी फवारले जाते. डवऱ्याच्या माध्यमातून तण नियंत्रणासोबतच फवारणीचे कामही करता येत असल्याने वेळ व इंधन खर्च वाचतो. याच यंत्राने लॅटरल गुंडाळण्याचे कामही करता येते.

दुचाकीवरील हायड्रॉलिक ट्रॉली

राजमल यांनी अधिक पुढे जात दुचाकीशी जोडली जाणारी हायड्रॉलिक ट्रॉलीही विकसित केली. याविषयी माहिती देताना राजमल सांगतात, की सुरुवातीला दुचाकीला जुळणारी साधी ट्रॉली बनविली होती. मात्र शेतीमाल हवा तिथे उतरवण्यासाठी रिव्हर्स गिअरची गरज भासत असल्याचे स्पष्ट झाले. लोकांकडून तशी मागणी आल्यामुळे पुन्हा सुधारणा करून तशी ट्रॉली विकसित केली. शेतीमाल किंवा शेतामध्ये टाकावयाचे खते, शेणखत इ. वेगवेगळ्या ठिकाणी खाली करण्यासाठी हायड्रॉलिक ट्रॉली तयार करण्याची आणखी एक मागणी पुढे आली. शेतकऱ्यांची ही गरज भागवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. मात्र हायड्रॉलिकने ट्रॉली वर होत असताना दुचाकी उचलली जाणे, जोराचे हादरे बसणे अशा समस्या आल्या. पुन्हा पुन्हा सुधारणा करत अखेर यश आले.

ट्रॉलीची हायड्रॉलिक रचना करताना आवश्यक हायड्रॉलिक सिलिंडर, ऑइल पंप, ऑइल टॅंक, लिव्हर, गिअर बॉक्‍स यांचा वापर केला आहे. हायड्रॉलिक ट्रॉलीचा वापर करण्यासाठी दुचाकी ही १५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेची असावी लागते. या ट्रॉलीची किंमत पॉवर ब्रेक असल्यास ५२ हजार रुपये, तर मॅन्युअल ब्रेक असल्यास ५० हजार आहे. पॉवर ब्रेकमध्ये ऑइलचा सप्लाय देण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली असल्याने वाहन एकदम थांबवता येते.

फायदे ः

-कमी खर्चात ट्रॉलीद्वारे शेतीमाल बाजारापर्यंत नेणे शक्य होईल. शेतातून घरापर्यंत आणता येईल.

-हायड्रॉलिक पद्धतीने शेतीमाल वेगाने खालीही करता येतो.

-सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याला रिव्हर गिअर दिलेला असल्याने पाहिजे तिथे गाडी लावणे सोपे होते.

यू-ट्यूबमुळे होतोय प्रसार

सध्या यू-ट्यूबवरील राजमल यांचे व्हिडिओ पाहून, विविध उपकरणांना देशभरातून मागणी येत आहे. नुकतीच महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला ही ट्रॉली पाठवली आहे. तशीच नेपाळमधूनही मागणी आली आहे. अशा दूर अंतरावरील शेतकऱ्यांना यंत्रे वापरणे, देखभाल इ. चे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने दिले जाते.

कायदेशीर बाबी तपासणेही आवश्यक ः

दुचाकीवरील यंत्रे ही बाब शेतकऱ्यांसाठी खर्च वाचविणारी ठरणार असली तरी अशा प्रकारे दुचाकीमध्ये करण्यात आलेले बदल व त्यावर जोडायची यंत्रे याबाबत परिवहन खात्याची भूमिका काय, हे समजून घेण्यासाठी अकोला येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री वसे- दुतोंडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले, ‘‘परिवहन खात्याच्या नियमानुसार दुचाकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करता येत नाहीत. तसेच त्यावर कोणतेही अन्य सयंत्र किंवा अवजार बसवून त्याचा वापर करण्याचीही परवानगी कायद्यानुसार नाही.’’ ही कायदेशीर बाब शेतकऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

-----------

राजमल गायरी, ९९२६६४०६३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com