सीताफळापासून वाइन, कुल्‍फी निर्मिती

मागील काही वर्षांत राज्यात विस्तारत असलेल्या सीताफळाला चांगला भाव मिळावा, उत्पादकाला दोन पैसे जास्तीचे मिळवता यावेत यासाठी आता प्रक्रियेच्या अंगाने विचार होऊ लागला आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

अकोला ः मागील काही वर्षांत राज्यात विस्तारत असलेल्या सीताफळाला चांगला भाव मिळावा, उत्पादकाला दोन पैसे जास्तीचे मिळवता यावेत यासाठी आता प्रक्रियेच्या अंगाने विचार होऊ लागला आहे. सीताफळाचा केवळ गरच नव्हे तर त्यापासून वाइन, कुल्‍फी, शेक असे बरेच काही पेय तयार होऊ शकतात हे सिद्ध झाले. अकोल्यात रविवारी (ता. १५) झालेल्या १७ व्या सीताफळ कार्यशाळेच्या व्यासपीठावर मान्यवरांच्याहस्ते वाइन, कुल्फीचे सादरीकरण झाले. यानंतर हा विषय चर्चेत आला आहे.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी म्हणाले, सीताफळाची वाढती लागवड व उत्पादन लक्षात घेऊन सीताफळ महासंघ प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धनासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नरत आहे. सीताफळ या नाशवंत फळांच्या प्रक्रियेचे थोडेफार काम सासवड, पुणे व मुंबई भागात काही प्रमाणात सुरू होते. परंतु योग्य मिशनरी उपलब्ध नसल्याने गरापासून बिया वेगळे करण्याचे काम मजुरांकडून हाताने करण्यात यायचे. तेथे स्वच्छता व हायजिनची मोठी समस्या होती. ही बाब माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांच्या निदर्शनात आणून दिली. सतत पाच वर्षे पाठपुरावा करून सीताफळ बीज निष्कासन यंत्राची निर्मिती करून घेतली आहे. यामध्ये ७० टक्के समाधानकारक काम होत आहे. जवळपास ८० ठिकाणी सीताफळ प्रक्रिया केंद्र वेगवेगळ्या स्तरावर सुरू झालेले आहे व लवकरच ही संख्या २०० पेक्षा अधिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सीताफळ गराचा उपयोग प्रामुख्याने आइस्क्रीम, कुल्फी, सीताफळ शेक, बासुंदी यासाठी होतो. मध्यंतरी कोरोना संकटामुळे सीताफळ गराची विक्री ठप्प झाली होती. गराची साठवणूक उणे २० अंशावर करावी लागत असल्याने या प्रक्रिया उद्योजकांना जवळपास २०० कोटी रुपयाचे नुकसान झेलावे लागले. त्यामुळे या गराचा अधिक कार्यक्षम उपयोग करता यावा यासाठी सीताफळ महासंघाने पुढाकार घेऊन विंचूर (नाशिक) येथील सुला वाइन फॅक्टरीमध्ये गर पाठवत सीताफळाची वाइन करण्याचा प्रयोग सहा महिन्यांपूर्वी करण्यास सुरुवात केली. शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांचे यासाठी सहकार्य लाभले. या प्रयोगाला अपेक्षित यश प्राप्त झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार झालेल्या वाइनचे १७ व्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळेचे औचित्य साधून रविवारी लोकार्पण करण्यात आले.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. दलाल यांनी याबाबत चाचण्या घेतल्या असून अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. शासनाने या उद्योगातील क्लिष्ट परवाने व जाचक अडथळे दूर केल्यास भविष्यात सीताफळ वाइनला उज्ज्वल काळ येईल अशी खात्री श्याम गट्टाणी, अध्यक्ष व अनिल बोंडे सचिव यांनी व्यक्त केली आहे‌.

शेतकरी उत्पादक कंपनीने बनवली कुल्फी

रिसोड (जि. वाशीम) तालुक्यातील बाळखेड येथील श्री बाळनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने सीताफळ, पेरू, आंबा, जांभूळ, या फळांपासून कुल्फी, रबडी, आइस्क्रीम असे नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करण्याचे काम सुरू केले. सीताफळ कार्यशाळेत प्रामुख्याने सादर केलेल्या कुल्फीने चांगलाच भाव खाल्ला. मान्यवरांसह उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले. हा प्रयोग वाढविण्याबाबत कंपनीचे प्रमुख विलास गायकवाड यांना सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी गट शेती योजनेअंतर्गत या कंपनीने २०१८-१९ मध्ये हा प्रकल्प उभारला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com