Kolambi Fish : लक्षद्वीपमध्ये शोभिवंत कोळंबी उत्पादन महिलांसाठी ठरला फायद्याचा व्यवसाय

लक्षद्वीप हे भारतातील एकमेव प्रवाळद्वीप आहे. हा अरेबियन समुद्रामध्ये दहा बेटांचा गोलाकार समूह असून, त्यात मध्यभागी खाऱ्या पाण्याने भरलेला पाणी साठा आहे.
Kolambi Fish
Kolambi FishAgrowon

Women Empowerment : लक्षद्वीप येथील स्थानिक सागरी जैवविविधता विशेषतः कोळंबीच्या नव्या प्रजातींची जपणूक करण्याच्या कामांमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (Indian Agricultural Research Institute) लखनौ येथील राष्ट्रीय मत्स्य जनुकीय स्रोत विभागाने स्थानिकांची मदत घेतली. त्यामुळे महिलांना उत्पन्नाचा एक नवा मार्गही खुला झाला आहे.

लक्षद्वीप हे भारतातील एकमेव प्रवाळद्वीप आहे. हा अरेबियन समुद्रामध्ये दहा बेटांचा गोलाकार समूह असून, त्यात मध्यभागी खाऱ्या पाण्याने भरलेला पाणी साठा आहे. त्याला इंग्रजीमध्ये अटॉल (atoll) अशी खास संज्ञा वापरली जाते.

या बेटांवरील स्थानिक लोकांची उपजीविका हा प्रामुख्याने टुना मासेमारी आणि नारळावर आधारित विविध उत्पादनांवर होते. येथील महिलांसाठी अधिक किंवा अतिरिक्त उत्पन्नांचे पर्याय फारच अल्प आहेत.

Kolambi Fish
Prawns Conservation : कोळंबी संवर्धनातील व्यवस्थापनाचे तंत्र

महिलांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या लखनौ येथील राष्ट्रीय मत्स्य जनुकीय स्रोत विभाग (ICAR - NBFGR) प्रयत्न करत आहे. त्यांनी येथील अगत्ती बेटावर शोभिवंत अपृष्ठवंशीय सजीवांच्या (मासे, कोळंबी किंवा सागरी वनस्पती इ.) वाढीसाठी खास सुविधा निर्माण केली आहे.

त्यामध्ये सागरी शोभिवंत अपृष्ठवंशीय जिवांच्या विविध प्रजाती आणि त्यांच्या समुदायाचे स्रोतांचे संवर्धन केले आहे. त्यांच्या व्यावसायिक वाढीमधून स्थानिक लोकांना उत्पन्नांचे पर्यायी मार्ग तयार होऊ शकतात.

जैवविविधता ः

खास त्यासाठी वेगवेगळ्या बेटांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून तेथील आजवर अज्ञात असलेली जैवविविधता स्पष्ट झाली. या सर्वेक्षणामध्ये कोळंबीच्या तीन नव्या प्रजाती शोधण्यात आल्या. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या बीजोत्पादनांचे तंत्र विकसित करण्यात आले.

त्याचे प्रमाणीकरण करण्यात आले असून, व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने संभाव्य दोन सागरी शोभिवंत कोळंबी निश्‍चित करण्यात आल्या. कोळंबीच्या थोर हायनानेन्सिस (Thor hainanensis) आणि अॅनसायलोकॅरिस ब्रेविकार्पेलिक (Ancylocaris brevicarpalis) या दोन जाती जागतिक पातळीवर पहिल्यांदाच व्यावसायिक उत्पादनासाठी उपलब्ध होणार आहेत.

प्रशिक्षण ः

स्थानिकांना या कोळंबीच्या उत्पादनाचे एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एकूण ८२ स्थानिकांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक (७७) होते.

नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, त्यातील बारकावे शिकविण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना या दोन जातींच्या कोळंबीचे बीज पुढील वाढीसाठी पुरविण्यात आले. हे बीज बाजारात नेण्यायोग्य आकाराचे होईपर्यंत आपल्या परिसरातील स्थानिक मत्स्य केंद्रामध्ये त्यांनी वाढवले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती स्थानिकच असून, त्यांच्या जैवविविधतेचेही संवर्धन होणार आहे. एकाच वेळी जैवविविधता संवर्धन आणि स्थानिकांच्या उत्पन्नातील वाढ असे दोन्ही उद्देश या प्रकल्पातून साध्य होणार आहेत.

Kolambi Fish
Fish Framing : तंत्र गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाचे...

अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत ः

संस्थेतर्फे अगत्ती बेटावर चार सामुदायिक मत्स्यपालन केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्याचा लाभ प्रशिक्षणार्थ्यांपैकी ४५ महिलांना घेतला. साधारणपणे एक महिने वयाची कोळंबी पिले त्यांना पुरविण्यात आली. त्यांनी विक्रीयोग्य होण्याइतपत म्हणजे २.५ ते ३ महिन्यांपर्यंत वाढवली.

त्यांच्या कोळंबीला प्रति नग १७५ ते २०० रुपये इतका दर देऊन संस्थेनेच त्यांच्याकडून खरेदी केली. या सर्व प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांमध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना तांत्रिक व आवश्यक मार्गदर्शन केले.

त्यामुळे शोभिवंत सागरी जिवाच्या (कोळंबी) उत्पादनाची एक नवा पर्याय स्थानिक उपलब्ध झाला. विशेषतः महिलांना घरगुती पातळीवर नियमित कामांसोबत अतिरिक्त उत्पन्न देणारा मार्ग मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.

(स्रोत ः राष्ट्रीय मत्स्य जनुकीय स्रोत विभाग, लखनऊ)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com