Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन वाढणार?

उत्तरभारतात हरियाणा हे कापसाच्या उत्पादनातलं आघाडीचं राज्य. तिथं कापसाचं उत्पादन किती राहील, वाचा सविस्तर...
cotton production estimates
cotton production estimates

1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून विदर्भातल्या काही ठिकाणी थंडीची लाट आलीय. तर इतर ठिकाणीही पारा सरासरीच्या (average temperature) खाली घसरलाय. त्यामुळे एकूण विदर्भच गारठलाय. आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्येही हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजाप्रमाणे विदर्भातल्या काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहिली. विदर्भातल्या काही ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त घसरण झाली होती. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तांत्रिकदृष्ट्या थंडीची तीव्र लाट ओसरली असली तरी थंडीचा जोर मात्र कायम आहे. दुसरीकडे कोकणात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत थंडी कमी असल्याचं आढळून आलं. येते 24 तास विदर्भात थंडीची लाट (cold wave) कायम राहणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला असून त्यानंतर मात्र थंडी काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.

2. ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशननं (AISTA) यंदाच्या हंगामात देशात 319 लाख टन साखर उत्पादनाचा (sugar production) अंदाज वर्तवलाय. परिणामी, एकूण देशाचा विचार करता साखर उत्पादनात जवळपास 3 टक्क्यांची वाढ होण्याची चिन्हं आहेत. गेल्या गाळप हंगामात देशांतर्गत साखर उत्पादन 310 लाख टन राहिलं होतं. यंदा 60 लाख टन साखर निर्यातीची शक्यताही असोसिएशननं व्यक्त केलीय. गेल्या हंगामात 72 लाख टन साखर निर्यात झाली होती. असोसिएशनच्या मते, यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात (Maharashtra) उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखर उत्पादन होऊ शकतं. गेल्यावर्षी महाराष्ट्रात 107 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. तर यंदा महाराष्ट्रातलं साखर उत्पादन 115 लाख टनांवर जाऊ शकतं.

3. देशातल्या प्रमुख बाजारांमध्ये जिऱ्याच्या (cumin seeds) भावाला सध्या आधार मिळताना दिसतोय. देशात राजस्थान आणि गुजरातमध्ये जिऱ्याचं सर्वाधिक उत्पादन होत असतं. पण यंदाच्या रब्बीत या दोन्ही राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी जिऱ्याखालचं क्षेत्र काही प्रमाणात मोहरी (mustard crop) आणि एरंडी पिकाखाली (castor crop) वळतं केलंय. त्यामुळे निर्माण झालेल्या सप्लाय गॅपमुळे जिऱ्याला चांगला भाव मिळतोय. स्पाइसेस बोर्डच्या (spices board of India) सुत्रांनुसार एकट्या राजस्थानमध्येच जिऱ्याचा पेरा 30 टक्क्यांनी घटला असून सध्या तिथं 5.39 लाख हेक्टर क्षेत्रावर जिऱ्याची लागवड आहे. तर गेल्या वर्षी जिऱ्याचं राजस्थानमध्ये 7.7 लाख हेक्टर क्षेत्र होतं. यंदा मोहरीला सातत्यानं चांगला भाव मिळाल्यामुळे देशात मोहरीचं क्षेत्र विक्रमीरित्या वाढलंय.

4. अकोला बाजार समितीत (Akola APMC) गेल्या आठवडाभराच्या काळात सोयाबीनची आवक घटताना दिसली. गेल्या 21 तारखेला अकोला बाजारात 3093 क्विंटल सोयाबीन आलं होतं. तर त्या तुलनेत आवक सातत्यानं घटून आज 1858 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सर्वसाधारण भावपातळी 5800 ते 6000 च्या दरम्यान स्थिरावलीय. अकोला बाजारात गेल्या आठवडाभरात सोयाबीनला किमान 5000 तर कमाल 6955 रुपयांचा भाव मिळालाय. तर एकूण आवक 12,705 क्विंटलची राहिलीय.

हा व्हिडिओ पाहिलात का? :  

5. उत्तर भारतात हरियाणात कापसाचं सर्वाधिक उत्पादन (Haryana cotton prodcution) होतं. त्यामुळे तिथलं कापसाचं पीक कसंय आणि त्याचं उत्पादन किती होणार, हे पाहणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. हरियाणाच्या कृषी विभागानं (agriculture department) नुकताच दुसरा आगाऊ अंदाज प्रसिद्ध केलाय. त्यात राज्याचं कापूस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.9 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. असं असलं तरी पहिल्या आगाऊ अंदाजाच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याचं सरकारी अधिकाऱ्यानं इन्फॉर्मिस्ट या वृत्तसंस्थेला सांगितलं. यंदा कापसाच्या 19 लाख गाठींचं (cotton bales) उत्पादन होईल, असं हा अहवाल सांगतो. पहिल्या आगाऊ अंदाजात हरियाणात 20 लाख कापूस गाठींचं उत्पादन होईल, असं म्हणण्यात आलं होतं. नोव्हेंबरमध्ये हरियाणातल्या कापसाचा मोठा वेचा पूर्ण होतो. पण याच महिन्यात हरियाणात पाऊस (unseasonal rains) झाला. परिणामी, हिसार, फतेहाबाद, सिरसा, आणि भिवाणी या मुख्य उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापसाचं नुकसान झालं होतं. त्यामुळेच उत्पादनाच्या अंदाजाचा फेरविचार करण्यात आलाय. हरियाणाचं कापूस उत्पादन जवळपास चार टक्क्यांनी वाढणार असलं तरी एकूण देशाचा विचार करता त्यामुळे कापसाच्या पुरवठ्यावर फार मोठा परिणाम होईल, अशी कुठलीही चिन्हं दिसत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com