Top 5 News: तुरीच्या आवकेला सुरुवात, पण बाजार भाव कसे आहेत?

शेती आणि मार्केटच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडी, वाचा सविस्तर...
tur bajar bhav
tur bajar bhav

1. दक्षिण कोकणावर गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेली चक्रवाताची स्थिती अजूनही कायम आहे. दुसरीकडे उत्तर कर्नाटकापासून उत्तर ओडिशापर्यंत पसरलेला हवेचा कमी दाबाचा पट्टाही (trough) कायम आहे. त्याच्या प्रभावामुळे मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाचे (cloudy weather) राज्य आहे. तर मध्य महाराष्ट्रातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. असे असले तरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून विदर्भाला सतावणारा पाऊस उद्यापासून उघडण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे. तर आजपासून राज्याच्या किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा हवामानशास्त्र विभागाचा (IMD) अंदाज आहे.

Next 5 days rainfall forecast for Vidarbha Dated 15.01.2022 #WeatherForecast #imdnagpur #imd pic.twitter.com/9DgFv41sQl

— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur)

2. गेल्या महिन्याच्या घाऊक किंमत निर्देशांकाचे, म्हणजेच महागाईचे आकडे केंद्राने जाहीर केले आहेत. त्यानुसार डिसेंबर महिन्यातल्या घाऊक महागाई दरात नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक अर्थात WPI 13.56 टक्क्यांवर होता. तर नोव्हेंबर महिन्यात हाच दर 14.23 टक्के होता. असे असले तरी डिसेंबर 2020 मध्ये घाऊक महागाई दर फक्त 1.95 टक्के होता. त्या तुलनेत यावर्षी माहागाई वाढली असून (rise in inflation) धातू, पेट्रोलियम पदार्थांसहित अन्न पदार्थ आणि कापडाची दरवाढ त्यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कापसाच्या वायद्यांवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी उद्या 16 जानेवारीला केंद्राने उद्योग घटकांची एक बैठक बोलवली आहे. तिच्यात काय निर्णय होतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

3. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात S.E.A. ने केंद्राला कच्च्या पाम तेलावरचा (crude palm oil) कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (agriculture infrastructure and development cess) पाच टक्क्यांनी घटवून 2.5 टक्क्यांवर आणण्याची विनंती केली आहे. असे केल्याने कच्च्या, रिफाइंड (refined), ब्लिच  (bleach) केलेल्या, आणि डिओडराइज्ड (deodorised) पाम तेलावरच्या एकूण कर आकारणीतला फरक पुन्हा 11 टक्के होईल, असे S.E.A. ने म्हटले आहे. कच्च्या पाम तेलाच्या आयातीवरून S.E.A. ने यापूर्वीच नाराजी दर्शवली असून त्यामुळे देशांतर्गत तेल उद्योगाला फटका बसेल, असे संस्थेने सरकारला कळवले होते.

4. अमेरिकेच्या कृषी खात्याने, अर्थात USDA ने यंदा भारताच्या एकूण कापूस उत्पादनात घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवलाय. ऑगस्ट 2021 ते जुलै 2022 या कालावधीत भारतात 280 लाख कापूस गाठींचे (cotton bales) उत्पादन होईल, असे USDA ने गेल्या महिन्यात म्हटले होते. पण त्यात या महिन्याच्या अहवालात बदल करत उत्पादन 5 लाख गाठींनी खालावेल, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे आता भारतात 218 किलोची एक याप्रमाणे 275 लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. USDA च्या मुंबई कार्यालयाने याआधीच उत्तरेत कापूस उत्पादन घटीचा अंदाज दिला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या दराला (cotton market rate) मिळत असलेला आधार कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

हा व्हिडिओ पाहिलात का? -   5. संक्रांतीनंतर राज्यातल्या बाजारांमध्ये तुरीची आवक वाढत जाते, हा आजवरचा आपला अनुभव. यंदाही गेल्या आठवडाभरापासून राज्यातल्या प्रमुख तूर बाजारांमध्ये तुरीची (tur or pigeon pea) आवक चालू झाली आहे. त्यात अकोला, कारंजा, अमरावती, खामगाव, मलकापूर, लातूर, जालना अशा बाजारांचा समावेश आहे. त्यातल्या अकोला बाजारात गेल्या आठवडाभराच्या काळात 5,781 क्विंटल तुरीची आवक झाली असून या मालाला दर्जानुसार किमान 4,900 तर कमाल 6,960 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण भाव 6,500 चा होता. असे असले तरी इतर बाजारांमध्ये तुरीचे भाव अजूनही किमान आधारभूत किमतीच्या खाली आहेत. जालना बाजारात येणाऱ्या पांढऱ्या तुरीची आठवडाभरात 31,836 क्विंटल आवक झाली. या मालाला 4,800 ते 6,704 च्या दरम्यान भाव मिळालाय. तर सरासरी दर 6,300 होता. यंदा तुरीला केंद्राने 300 रुपये वाढवत 6,300 रुपयांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. बाजारात मात्र अकोला, जालना असे काही अपवाद सोडले, तर बहुतांश आवक मालाला किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळतोय. अवेळी पाऊस, गारपीट, आणि ढगाळ हवामानामुळे याआधीच मराठवाडा आणि वऱ्हाडातल्या तुरीचे नुकसान झाले होते. एवढे असूनही देशाच्या एकूण मागणीच्या तुलनेत उत्पादन होऊ शकेल, असे विविध अंदाज आहेत. पण केंद्र सरकारने मात्र यंदा गरज नसतानाही तुरीची मोठी आयात केली आहे. चालू आर्थिक वर्षाचा विचार करता गेल्या डिसेंबरपर्यंत जवळपास 5 लाख टन तूर आयात झाल्याची शक्यता आहे. तर मार्च 2022 पर्यंत देशात साडेसहा लाख टन तूर दाखल होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. यापूर्वी 2020-21 मध्ये 4,42,000 हजार टन तूर आयात झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून तूर आयात वाढल्याने देशातल्या तुरीला आधार मिळत नाहीये. तोच प्रकार यावेळीही होत असल्याने सध्या तुरीचे दर जास्तीत जास्त बाजारांमध्ये किमान आधारभूत किमतीच्या खाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com