Top 5 News: तुरीची आवक वाढली, दरांची स्थिती काय?

राज्यातल्या प्रमुख तूर बाजारांमध्ये तुरीच्या आवकेची आणि दरांची सद्यःस्थिती काय आहे, वाचा सविस्तर...
Tur Arrivals
Tur Arrivals

1. राज्यात पारा वाढू लागलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात त्याची प्रचिती विशेषकरून येतीय. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातलं किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त (higher than normal temperature) होतं. तर त्याउलट मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचं नोंदवण्यात आलंय. उद्या 10 फेब्रुवारीला राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं (IMD) वर्तवलाय.

Daily Weather Video (Hindi) Dated 09.02.2022 You Tube Link: https://t.co/fN8WDF6lOV Facebook Link: https://t.co/F9MFJiVLjO

— India Meteorological Department (@Indiametdept)

2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून कृषी क्षेत्राचा वेगळा अर्थसंकल्प आणण्याची गरज नसल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister) यांनी म्हटले आहे. लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तोमर बोलत होते. तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या मते वेगळ्या कृषी अर्थसंकल्पाचा शेतकऱ्यांना आणि पर्यायानं देशाला विशेष असा काहीही उपयोग होणार नाही. रेल्वेसाठी वेगळ्या अर्थसंकल्पाची पद्धत मोडून मुख्य अर्थसंकल्पात (Union Budget) तो जोडला गेला, ही सुधारणा होती, असं सांगत त्याचप्रमाणे कृषी अर्थसंकल्पाची गरज नसल्याचं ते यावेळी म्हणाले.

हे देखील वाचा :  कापूस बाजार तेजीतच

3. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत (Non-Basmati rice export) 53 टक्के वाढ झालीय. अपेडाच्या (APEDA) माहितीनुसार या काळात भारतातून 109 लाख टन बिगर बासमती तांदळाची (Basmati rice) निर्यात झाली. तर दुसरीकडे बासमती तांदळाची निर्यात मात्र 21 टक्क्यांनी घटली असल्याचंही ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. केंद्र शासनाच्या माहितीनुसार निर्यातदार नवीन बाजारांचा शोध घेत असल्यानं भरडधान्यांच्या निर्यातीतही येत्या काळात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारनं भरडधान्यांच्या शेतीला आणि त्यापासून बनलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय.

4. साखर कारखान्यांचं अर्थकारण एका वेगळ्या स्थलांतराच्या दिशेनं झुकत असून, साखरेपेक्षाही आता इंधन निर्मिती भोवती साखर उद्योग केंद्रित होतोय. नव्यानं उभारल्या जाणाऱ्या 75 पेक्षा जास्त आसवनी प्रकल्पांमुळे (distillary plants) राज्याची इथेनॉलमधील आर्थिक उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. राज्यात सध्या 117 आसवनी प्रकल्प असून, त्यांची निर्मितीक्षमता 164 कोटी लिटर आहे. आसवनींमधून रेक्टिफाइड स्पिरिट, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल, इथेनॉल (ethanol) अशी विविध उत्पादनं तयार होतात. भविष्यात सर्व आसवनी इथेनॉलवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता असून, साखर कारखानेही इथेनॉल निर्मिती प्रकल्प असल्याशिवाय नफ्यात चालणार नाहीत, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

हा व्हिडिओ पाहिलात का? : 

5. संक्रांतीनंतर राज्यातल्या बाजारांमध्ये तुरीची आवक सुरू होते. आणि फेब्रुवारी सुरू झाल्यावर मोठी आवक होते, हा आजवरचा अनुभव. त्याचाच प्रत्यय याहीवर्षी येत असून फेब्रुवारी महिना सुरू झाला तशी राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये तुरीची आवक (tur arrivals) वाढलीय. पण मराठवाड्यातल्या तुरीचं यंदा पावसानं अतोनात नुकसान झाल्यानं लातूर आणि उदगीर बाजार सोडले, तर इतरत्र मोठी आवक झालेली दिसत नाही. याउलट विदर्भातल्या, त्यातल्या त्यात वऱ्हाडातल्या बाजारांमध्ये तुरीची आवक जोरात सुरू आहे. अकोला, अमरावती, दर्यापूर, हिंगणघाट, खामगाव, मलकापूर, नागपूर या बाजारांमध्ये तुरीची आवक गेल्या आठवडाभरात सातत्यानं 2000 क्विंटलच्या वर राहिलीय. तर लातूर, उदगीर, आणि दुधनी बाजारांमध्ये आवक एक हजार क्विंटलच्या वर राहिलीय. गेल्या सहा फेब्रुवारीला गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं. त्यामुळे सात तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परिणामी, राज्यातल्या बहुतांश बाजारपेठा बंद होत्या. म्हणून सात तारखेला नागपूर आणि सावनेर वगळता इतर महत्त्वाच्या बाजारांमध्ये तुरीचे व्यवहार झाले नाहीत. एक तारखेपासून आजपर्यंत बाजारात झालेल्या तुरीच्या आवक मालाचे सर्वसाधारण भाव 5800 ते 6675 रुपयांच्या दरम्यान राहिले. तर या कालावधीत उदगीरला चार तारखेला 6776 रुपयांचा कमाल भाव मिळाला होता. यंदा तुरीला 6300 रुपयांची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर झालीय. पण केंद्राच्या कडधान्य आयातीच्या धोरणांमुळे सध्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये तुरीच्या भावांवर दबाव दिसून येतोय. याचंच उदाहरण दर्यापूर बाजार असून इथं किमान भाव सातत्यानं 4500 च्या आसपास राहत असल्याचं ॲगमार्कनेटच्या माहितीवरून स्पष्ट होतं. शेतकऱ्यांनी माल रोखला की दरात सुधारणा होते हा अनुभव कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत आलाय. त्यामुळे शेतकरी तुरीची विक्रीही विचारपुर्वक करत असल्याचं सध्या दिसतंय. देशातलं घटलेलं उत्पादन, शिल्लक साठा, आणि आयातीचे गणित पाहून स्टाॅकिस्ट खरेदी करत असल्याचा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com