कापसाचे उत्पादन
कापसाचे उत्पादन

TOP 5 NEWS- यंदा कापसाचे उत्पादन वाढणार?

अमेरिकेच्या कृषी खात्याचा, अर्थात युएसडीएचा कापूस अहवाल आलाय. त्यातून कापूस उत्पादकांसाठी काय बातमी पुढे येतीय, पाहा

1. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात प्रामुख्यानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. पण ही अतितिव्र उष्णतेची लाट नसून सामान्य नागरिकांना फारशी हानीकारक ठरेल, असे वातावरण नाही. असे असले तरी नवजात बालके आणि जुने आजार असलेल्या वयोवृद्ध नागरिकांनी मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात घराबाहेर निघणे टाळावे. घराच्या बाहेर पडायची गरज पडलीच, तर हलक्या रंगाचे सूती ढगळ कपडे वापरून, डोके झाकून बाहेर पडावे, असा सल्ला हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

2. हिंगोली बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात गुरुवारी २४ मार्चला हरभऱ्याची ६६५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४७११ रुपये तर सरासरी ४५५५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, मार्च एंडीगमुळे शुक्रवार (ता. २५) पासून शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याचे बाजार सूत्रांनी सांगितले. असं असलं तरी राज्यातल्या बहुतांश बाजारपेठांमध्ये हरभऱ्याला किमान आधारभूत किमतीच्या खालीच भाव मिळताना दिसतायत.

हे हि पहा : 

3. यंदा द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचे संकट होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागा साधत जिल्ह्यातून युरोप आणि आखाती देशात ८०४ कंटेनर म्हणजे ११ हजार ५६९ टन द्राक्षाची निर्यात झाली असून निर्यात हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षाची निर्यात वाढू लागली आहे. यंदाच्या हंगामात कृषी विभागाने २० हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार निर्यात वाढवण्यासाठी कृषी विभाग पुढाकार घेत असून प्रत्येक गावांत निर्यातीसाठी जनजागृती केली. निर्यात नोंदणी आणि नूतनीकरणासाठी शेतकरी पुढे आले. मात्र, डिसेंबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे द्राक्षाची नोंदणी कमी झाली.

4. ‘‘जागतिक तापमान वाढ, हवामान बदलांचे संकट जगावर असताना, जागतिक पातळीवरील पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधकांनी २०५० मध्ये मानवी अस्तित्वावर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहे. भविष्यातील येणारे संकट टाकण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबरच पृथ्वीचे तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी करण्याचे आव्हान सर्वांवर आहे. यासाठी झपाट्याने वाढणाऱ्या आणि जास्तीत जास्त कार्बनडाय ऑक्साइड शोषणाऱ्या बांबूची लागवड करणे गरजेचे आहे. हाच बांबू सर्वसामान्य शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न देणारा ठरणार आहे,’’ असे प्रतिपादन राज्य कृषमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि बांबू लागवड आणि प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाची चळवळ राबविणारे पाशा पटेल यांनी केले.

5. येत्या कापूस हंगामात, म्हणजेच ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ मध्ये भारतात कापसाच्या उत्पादनात चार टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अहवाल अमेरिकेच्या कृषी खात्यानं, अर्थात युएसडीएनं दिलाय. येत्या हंगामात भारतात २७७ लाख कापूस गाठींचं उत्पादन होईल, असा हा अहवाल सांगतो. एका कापूस गाठीचं वजन २१८ किलो असतं. यंदाच्या मॉन्सूनमध्ये पाऊस कमीत कमी सरासरीइतका तरी पडेल, असा अंदाज असून त्यामुळे कापसाखालचं क्षेत्र वाढू शकतं. परिणामी, कापसाच्या उत्पादनातही वाढ होईल, असा अंदाज युएसडीएच्या अहवालात वर्तवण्यात आलाय. तसंच उत्पादकततेत दोन टक्क्यांची सुधारणा होऊन ती हेक्टरी ४७५ किलो राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निर्यातीला वाव असल्यानं कापसाचा वापरही तीन टक्क्यांनी वाढू शकतो. भारतातून येत्या हंगामात कापसाची ५५ गाठींची निर्यात अपेक्षित आहे. जागतिक बाजारात भारतीय कापसाच्या दरांना पडतळ लागू शकते, असंही या अहवालात म्हटलंय. तर सरकारने अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या आयातीवरील शुल्क माफ केले किंवा त्यात कपात केली, तर कापसाची आयात ५० टक्क्यांनी वाढून १५ लाख गाठींवर जाऊ शकतो. आपल्याला ही बातमी आवडली असेल, तर एक लाईक करून व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि तुम्हाला या विषयी काय वाटते, आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूच, तोवर पाहात राहा, ॲग्रोवन डिजिटल!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com