नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती

नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती
नारळ

नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत.

दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर ३.२५ ते ३.५ मीटर असते. म्हणून दोन झाडात ७.५ मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. झाडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते.

उंच जाती     वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली)  या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात.      लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा)  पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते.      प्रताप   नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून १५० नारळ मिळतात.     फिलिपिन्स ऑर्डिनरी  नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी २१३ ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन ९४ ते १५९ असून, सरासरी १०५ नारळ आहे.

ठेंगू जाती ः     या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.

संकरित जाती     टीडी (केरासंकरा)   या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून सरासरी १५० नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण ६८ टक्के इतके असते.     टीडी (चंद्रसंकरा)  फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रतिवर्षी ५५ ते १५८ फळे असते, तर सरासरी उत्पादन ११६ फळे आहे.

  - ०२३५२- २३५३३१ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.