हाक मातीची... अॅग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८

हाक मातीची...
अॅग्रोवनने यंदाचे वर्ष हे जमीन सुपीकता वर्ष २०१८ म्हणून जाहिर केले आहे. 
ते नेमके काय आहे, याविषयी सांगत आहेत अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण
--------------------------------------------
माती जिवंत ठेवा...
माणसाला शेतीचा शोध लागला म्हणजे त्याने मारून खाण्याऐवजी पेरून खायला सुरवात केली आणि एका नव्या संस्कृतीचं बीज रोवलं गेलं. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची अद्भूत क्षमता हे शेतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. ही क्षमता निर्माण करणारा घटक म्हणजे माती. या उपजाऊ, कसदार आणि सुपीक मातीवरच शेतीचा आणि अवघ्या जीवसृष्टीचा डोलारा उभा आहे. पण या मातीलाच आज ग्रहण लागलं आहे. जमिनीचे आरोग्य बिघडल्याने माती झपाट्याने नापीक होत आहे. भारतातच नव्हे, तर जगभरातील शेतीसमोर एक मोठं आव्हान उभं आहे. महाराष्ट्रात तर या समस्येची धग भीषण आहे. जिचा आपण काळी आई म्हणून गौरव करतो, ती माती आज मरणासन्न अवस्थेेत आहे. आपण वेळीच जागे झालो नाही, तर शेती, पर्यावरण आणि समाज यांच्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. एका संस्कृतीच्या ऱ्हासपर्वाची ती सुरवात असेल.
पण हा ऱ्हास आपण थांबवू शकतो. समस्येची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपली जमीन आपण वाचवू शकतो. त्यासाठी एक नवी दिशा आपल्याला धुंडाळावी लागणार आहे. त्यासाठीचं एक पाऊल म्हणून `ॲग्रोवन`ने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. जमिनीची सुपीकता या विषयाचे विविध पैलू या वर्षभरात उलगडले जातील. त्याची सुरवात म्हणजे आजचा `ॲग्रो अजेंडा`. जमिनीच्या आरोग्याची समस्या नेमकी काय आहे, याचा सर्व अगांनी वेध घेतला आहे. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी या समस्येवर मात करता येते, हे सिद्ध करून दाखवलं आहे. आजच्या अंकातील यशकथांतून त्याची चुणूक दिसेल. जमिनीची सुपीकता या विषयावर एक कृती कार्यक्रम आकाराला यावा हा `ॲग्रोवन`चा प्रयत्न आहे. हा कृती कार्यक्रम प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शेतकऱ्यांचं सामूहिक बळ आणि सक्रिय सहभाग निर्णायक असणार आहे. त्यांच्या निर्धाराची वज्रमूठ म्हणजे नव्या पहाटेची नांदी ठरणार आहे.
--------------------------------------------
आवर्जून सहभागी व्हा, शेअर करा...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com